काही पदार्थ हे त्यावर प्रकाशकिरण पडल्यास विद्युतप्रवाहाची निर्मिती करतात. ‘प्रकाशविद्युत’ (फोटो इलेक्ट्रिक) या नावे ओळखल्या जाणाऱ्या या परिणामाचा आज अनेक साधनांत वापर केला जातो. एखादे साधन एखाद्या व्यक्तीच्या हालचालीनुसार चालू व बंद करणे, हे या परिणामामुळे शक्य झाले आहे. (उदाहरणार्थ, नळासमोर हात धरल्यास नळातून पाणी येणे, दरवाजासमोर उभे राहिल्यास दरवाजा उघडणे, इत्यादी.)

प्रकाशविद्युत परिणामाचा शोध जर्मन संशोधक हाइन्रिश हर्ट्झ याला १८८७ साली मॅक्सवेलच्या सिद्धांताची पडताळणी करताना लागला. रेडिओलहरींद्वारे विद्युत स्फुल्लिंगाची (स्पार्क) निर्मिती करताना, हर्ट्झच्या लक्षात आले की दुसऱ्या बाजूच्या स्फुल्लिंगामुळे या बाजूच्या स्फुल्लिंगाची तीव्रता वाढते आहे. जर दोन्ही स्फुल्लिंगांच्या दरम्यान एखादी काच ठेवली तर स्फुल्लिंगाची तीव्रता वाढत नव्हती; परंतु काचेच्या ठिकाणी क्वार्ट्झचा वापर केला तर पुन्हा ही तीव्रता वाढलेली असे. सर्वसाधारण काच ही अतिनील किरण शोषून घेते, तर क्वार्ट्झमधून अतिनील किरण सहजी पार होतात. याचा अर्थ स्फुल्लिंगाची तीव्रता वाढवण्यात, दुसऱ्या स्फुल्लिंगातून निर्माण होणाऱ्या अतिनील किरणांचा सहभाग होता. हर्ट्झचा सहकारी असणाऱ्या विल्हेल्म हालवाश याने १८८८ साली असाच एक प्रयोग सोप्या प्रकारे केला. जस्ताच्या ऋण विद्युतभारित पट्टीला त्याने विद्युतभारमापक (इलेक्ट्रोस्कोप) जोडला. त्यानंतर आर्क लॅम्पद्वारे निर्माण केलेल्या अतिनील किरणांचा या पट्टीवर त्याने मारा केला. या माऱ्यामुळे या पट्टीवरील ऋण विद्युतभार कमी होत जाऊन ती धन विद्युतभारित होत असल्याचे त्याला आढळले.

सन १८९९च्या सुमारास इंग्लंडच्या जे.जे.थॉमसन आणि जर्मनीच्या फिलिप लेनार्ड या दोघांनी या परिणामाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला. कॅथोड किरणांच्या अभ्यासासाठी जी निर्वात नलिका वापरली होती, काहीशी त्याच प्रकारची नलिका या संशोधनासाठी त्यांनी वापरली. या नलिकेतील धातूच्या दोन पट्टय़ांवर त्यांनी बॅटरीद्वारे विद्युतदाब निर्माण केला. त्यानंतर यापैकी एका पट्टीवर त्यांनी अतिनील किरणांचा मारा केला. या माऱ्यामुळे त्या पट्टीतून विद्युतभारित कण उत्सर्जति होत असल्याचे त्यांना आढळून आले. या कणांचे गुणधर्म तपासल्यावर, हे कण म्हणजे इलेक्ट्रॉन असल्याचे स्पष्ट झाले. इलेक्ट्रॉनची ही निर्मिती म्हणजे प्रत्यक्षात विद्युतप्रवाहाची निर्मिती होती. सन १९०५ साली नोबेल पारितोषिक देऊन लेनार्डचा गौरव करण्यात आला.

– डॉ. राजीव चिटणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org