थोर गणिती आर्किमिडीज (इ.स.पूर्व २८७-२१२) यांनी एरॅतोस्थेनस यांना पत्राद्वारे पाठवलेले महाकाय कोडे गोथोल्द एफ्रीम लेसिंग (इ.स. १७२९-८१) यांना एका हस्तलिखितात सापडले. त्यांनी ते सन १७७३ मध्ये प्रसिद्ध केले. ते ४४ ओळींत पद्यरूपात असलेले कोडे आता ‘आर्किमिडीजची पशुसमस्या’ किंवा ‘आर्किमिडीजचा सूड’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात आर्किमिडीज यांचा प्रश्न आहे :

सूर्यदेवाकडे किती पांढरे (प), काळे (क), ठिपके असलेले (ठ) आणि तपकिरी (त) बैल आणि तशाच रंगांच्या क्रमश: (पा, का, ठा, ता) गाई असतील, जेव्हा त्यांच्या संख्यांवर पुढील अंकगणिती बंधने असतील?

(१) प = (१/२ + १/३) ७ क + त

(२) क = (१/४ + १/५) ७ ठ + त

(३) ठ = (१/६ + १/७) ७ प + त

(४) पा = (१/३ + १/४) ७ (क + का)

(५) का = (१/४ + १/५) ७ (ठ + ठा)

(६) ठा = (१/५ + १/६) ७ (त + ता)

(७) ता = (१/६ + १/७) ७ (प + पा)

आर्किमिडीज यांच्या मते, या प्रश्नाचे पूर्णांकात उत्तर काढणारा साधारण गणितज्ञ मानावा; मात्र त्याशिवाय पुढील दोन बंधने पाळून उत्तर काढणारा प्रज्ञावंत गणितज्ञ मानावा-

(८) (प + क) ही वर्ग संख्या आहे; उदाहरणार्थ, १, ४, ९,…; आणि

(९) (ठ + त) ही त्रिकोणी संख्या आहे; उदाहरणार्थ, १, ३, ६,…

इथे पहिल्या सात समीकरणांत आठ चल असल्यामुळे ती अनिश्चित समीकरणे या प्रकारात मोडतात. त्यांची अनेक उत्तरे मिळू शकतात. पण ती सोडवणे तुलनेत सोपे आहे. त्यातील किमान उत्तर आहे : प = १,०३,६६,४८२; क = ७४,६०,५१४; ठ = ७३,५८,०६०; त = ४१,४९,३८७; पा = ७२,०६,३६०; का = ४८,९३,२४६; ठा = ३५,१५,८२०; ता = ५४,३९,२१३. त्यावरून सूर्यदेवाकडे एकूण किमान ५,०३,८९,०८२ गुरे होती, असे उत्तर आहे. मात्र, अतिरिक्त बंधने (८) व (९) पाळणारे उत्तर काढणे अतिशय अवघड आहे. त्याचे २,०६,५४५ अंकी एकूण किमान गुरांबाबतचे उत्तर संगणकाच्या मदतीने काढले गेले आहे, मात्र संशोधन सुरूच आहे.

हे कोडे वेगळ्या प्रकारे सोडवण्यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करू शकता! आर्किमिडीज यांना सदर प्रश्नाचे उत्तर माहीत होते किंवा नाही याबाबत विविध मते आहेत. काही निमित्ताने आर्किमिडीज अतिशय संतापले असल्यामुळे त्यांनी ही समस्या मांडून आपला राग तर नाही व्यक्त केला?

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल :  office@mavipamumbai.org