आदर्श जमीन वापर आकृतिबंधात (लॅण्ड-यूज पॅटर्न) भौगोलिक क्षेत्राच्या किमान एकतृतीयांश जमीन वनांखाली असावी असा संकेत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतातील प्राचीन ग्रंथांत वनांचे तीन प्रकार वर्णिले आहेत :

Konkan Planned Policy Continuity Major lack of enforcement Maharashtra Day 2024
कोकण: अभाव नियोजनबद्ध धोरण सातत्याचा..
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

(१) अत्यंत घनदाट, निबीड अरण्य असलेले महावन : यामध्ये माणसांना शिरकाव करणे केवळ अशक्य असे.

(२) थोडे विरळ अरण्य असलेले श्रीवन : इथे माणसांना मुक्त प्रवेश असे. माणसे त्यातून जळाऊ लाकूड, घर-गाडे-वस्तू बनविण्याचे लाकूड, फळे, फुले, कंदमुळे, मध, राळ, रंगद्रव्ये, औषधी, चारा तसेच शिकार व इतर जीवनावश्यक गोष्टी मिळवत असत.

(३) अतिशय शांत, निसर्गरम्य असलेले तपोवन : यामध्ये ध्यान व तप करण्यासाठी माणसे जात. येथे शेती करणे व प्राण्यांची शिकार करणे निषिद्ध होते.

एकूणच कमी जनसंख्या व विपुल वनक्षेत्रे असल्याने त्या काळात वनशास्त्राची आवश्यकता नव्हती. तरीदेखील ‘वृक्षायुर्वेद’सारख्या दहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ग्रंथात विविध वृक्षांचे संगोपन, जीवनचक्र, पर्यावरणीय महत्त्व व त्यांपासून माणसास होणारे फायदे विशद केलेले आहेत.

पुरातन काळातील मानवाला नैसर्गिक आपत्ती म्हणजे तथाकथित ‘निसर्ग देवतेचा कोप’ किंवा ‘शाप’ आहे असे वाटत असे. हाच धागा पकडून आधुनिक मानवाने ‘वृक्षतोड केली, वनांची नासधूस केली तर देवाचा कोप होईल’ अशी एक प्रकारची भीती समाजात उत्पन्न केली. त्यामुळे आपसूकच अशा वनांचे संरक्षण झाले. शास्त्रज्ञ व लेखकांनी देवरायांना ‘वृक्षांचे नैसर्गिक संग्रहालय, संकटग्रस्त प्रजातींचे भांडार, औषधी वनस्पतींचे कोठार, मौल्यवान प्रजातींची जनुकपेढी, पर्यावरण शास्त्रज्ञांची प्रयोगशाळा, निसर्ग अभ्यासकांचे-प्रेमींचे नंदनवन, निसर्गाच्या जलचक्राचे व पाणलोट क्षेत्रांचे तसेच जैव-भू-रसायनचक्रांचे नियंत्रक त्याचप्रमाणे अनन्यसाधारण करमणुकीचे अधिवास’ म्हणून वाखाणले आहे.

समाजाधारित नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन कसे होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे या देवराया ठरतात. वैयक्तिक वा सामाजिक अल्पकालीन फायद्यांसाठी होणारी जंगलतोड टाळून आणि वृक्षलागवड करून दीर्घकालीन पर्यावरणीय फायदे मिळवण्यासाठी देवराया निर्माण करून राखण्याचा उपाय जागृत समाजाने स्वीकारावा. लोकसहभाग व डोळस श्रद्धा ठेवून देवरायानिर्मिती प्रकल्प अधिकाधिक संख्येने प्रत्येक राज्याने राबविले, तर जागतिक हवामान बदल रोखणे भविष्यात शक्य होईल.

– डॉ. पुरुषोत्तम गो. काळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org