वेगवेगळय़ा कालखंडात गुन्हेगारांसाठी वेगवेगळय़ा शिक्षा प्रचलित होत्या. तसेच विलक्षण स्वाभिमानी व्यक्ती कधी आत्मसन्मानार्थ स्वत:ला शिक्षा करूनही घेत असत. वाक्प्रचार वाचताना अशा काही शिक्षांचे प्रकार कळतात. सांस्कृतिक अभ्यासाच्या दृष्टीने त्यांना महत्त्व येते.
‘गाढवाचा नांगर फिरवणे,’ हा जुन्या काळातील शिक्षेचा प्रकार आहे. एखाद्याची अप्रतिष्ठा करणे, सूड घेणे असा त्याचा अर्थ आहे. पूर्वी जिंकलेल्या गावावरून किंवा गुन्हेगाराचे घर पाडून त्या जागेवरून गाढवाचा नांगर फिरवून ती जागा ओसाड करत असत. ‘पांढरीवर गाढवाचा नांगर फिरवला’ हा वाक्प्रचार बखरीत आढळतो. आपल्याकडे मध्ययुगात अंगभंगाच्या शिक्षा असत. ‘चौरंग करणे’ हा त्यातलाच एक कठोर शिक्षेचा प्रकार आहे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, गुन्हेगाराचे हातपाय तोडून त्याला अपंग करणे.
‘अग्निकाष्ठ भक्षण’ करणे, हा वाक्प्रचार ज्या शिक्षेविषयी आहे, ती शिक्षा म्हणजे प्राचीन काळात घेतला जाणारा एक प्रकारचा देहदंड आहे. अग्निकाष्ठ म्हणजे पेटलेले लाकूड. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे स्वत:ला जाळून घेणे. आपण केलेली प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही, तर पूर्वी काहीजण प्राण द्यायची शपथ घेत असत. उदा. महाभारतात अर्जुनाने म्हटले होते, की ‘दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथाचा वध करीन अथवा अग्निकाष्ठ भक्षण करीन.’
‘दिव्य करणे,’ हा वाक्प्रचार प्राचीन काळातील कठोर शिक्षेची पद्धत सांगतो. पूर्वी कधी पंचायतीचा निकाल मान्य नसेल, तर उकळत्या तेलात हात घालणे वगैरे प्रकारचे दिव्य करायला सांगत असत. काही वेळा स्वत:च्या सत्यनिष्ठेची ग्वाही देण्यासाठी स्वाभिमानी व्यक्ती दिव्य करून दाखवत. सीतेने आपले शील पवित्र आहे, हे पटवून देण्यासाठी अग्निदिव्य केले होते.
‘धिंड काढणे’ हा वाक्प्रचारही पूर्वीची कठोर शिक्षा सांगतो. यात गुन्हेगार व्यक्तीची गाढवावर बसवून शेपटीकडे तोंड करून वाजतगाजत मिरवणूक काढत असत. गुन्हेगाराची सार्वजनिकरीत्या अप्रतिष्ठा करण्याचा हेतू त्यात असे! प्रशासन आणि शिक्षा या दोन्हीसाठी ‘शासन’ हा एकच शब्द असण्याचा योगायोग अशावेळी बोलका वाटू लागतो.
डॉ. नीलिमा गुंडी