अठराव्या शतकात दक्षिण प्रशांत महासागरातील फिजी बेटांवर  प्रथम युरोपीय व्यापारी यायला सुरुवात झाली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या युरोपीयांपैकी अनेकांनी या बेटांवर आपापली घरे बांधली. १८२० मध्ये ब्रिटिश आणि अमेरिकन व्यापाऱ्यांनी फिजी बेटावर युरोपीय पद्धतीचे गाव वसवले. पुढे  ख्रिस्ती मिशनरींनी मोठय़ा प्रमाणात धर्मातरे करून या नवधर्मातरितांना युरोपीय जीवनशैलीची सवय लावली.

डच संशोधक सतराव्या शतकात फिजी बेटांवर आले, परंतु त्यांनी तेथे वसाहत स्थापन केली नाही. मात्र या बेटांवर आपले नियंत्रण प्रस्थापित करून १८७४ साली ब्रिटिशांनी आपली वसाहत स्थापन येथे केली. त्यासाठी ब्रिटिशांनी फिजीच्या स्थानिक राजांशी आणि टोळीप्रमुखांशी हितसंबंध जमवून त्यांच्याशी करार केले. १८७५ साली ब्रिटिश वसाहतीचा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नर फिजीच्या आदिवासींचा राजा आणि त्याच्या मुलांना ऑस्ट्रेलियात सिडनी येथे घेऊन गेला. हे लोक ऑस्ट्रेलियात पोहोचले त्या दिवसांमध्ये सिडनी आणि प्रदेशात एका संसर्गजन्य आजाराची साथ पसरलेली होती. सिडनीहून परतलेला तो आदिवासी राजा, त्याची मुले आणि जहाजातली चाळीस माणसे यांना त्या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आणि पुढे फिजीवरच्या लोकांमध्ये हा आजार वणव्यासारखा पसरत गेला. या महासाथीत फिजीतले ३५ टक्के लोक मृत्यू पावले. सिडनीहून फिजीला परतताना ब्रिटिश गव्हर्नर, इतर उच्चाधिकारी हे आदिवासी राजा आणि त्याच्या मुलांबरोबर न येता तीन आठवडय़ांनी परत आले. त्यामुळे ब्रिटिशांनी हा आजार फिजीमध्ये हेतूपूर्वक आणल्याची भावना सर्व रहिवाशांमध्ये होऊन ब्रिटिशांविरोधी जनमत एकत्र होऊ लागले.

ब्रिटिशांनी फिजी बेटावर उसाची लागवड आणि साखर उत्पादन यांच्या वाढीबरोबरच कापसाच्या लागवडीलाही उत्तेजन दिले. या काळात जागतिक बाजारपेठेत कापसाला चांगला भाव येऊ लागल्यामुळे अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन व्यावसायिक मोठय़ा संख्येने फिजीत येऊन स्थायिक होऊ लागले. याच काळात १८७६ साली फिजी बेटावरच्या सर्व आदिवासी राजांनी एकत्र येऊन येथे ‘ग्रेट कौन्सिल ऑफ चीफ्स’ तयार केले.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com