‘युगांडाचा प्रदेश एखाद्या परिकथेतल्या अद्भुत प्रदेशाप्रमाणे आहे. एका परिकथेत पावट्याच्या वेलावर चढून जॅक हा मुलगा पोहोचतो तो एका अद्भुत दुनियेत! पावट्याच्या वेलाऐवजी तुम्ही रेल्वेत बसून युगांडाला जा, तुम्ही पोहोचाल एका अद्भुत दुनियेत!’ हे उद्गार आहेत सर विन्स्टन चर्चिल यांचे! युगांडातील ब्रिटिश सत्ताकाळात चर्चिल त्या प्रदेशात फिरले तेव्हा तिथले ज्वालामुखींचे डोंगर, घनदाट जंगले, सुपीक जमीन आणि व्हिक्टोरियासारखी सरोवरे पाहून चर्चिल यांनी युगांडाला ‘द पर्ल ऑफ आफ्रिका’ म्हटले!

युगांडा व इतर पूर्व आफ्रिकेतले जर्मनांचे स्वारस्य कमी झाले व त्यांच्यासह झालेल्या समझोत्याप्रमाणे ब्रिटिश तिथे आले. त्या काळात युगांडामध्ये बुगांडा आणि अन्य दोन राज्यांची सत्ता होती. या राज्यांची आपसात नेहमीच काही तरी कुरबुर चालू असे. १८८७ साली ब्रिटिश कप्तान एफ. डी. लुगार्ड याने बुगांडाचा तत्कालीन राजा मेन्गा (म्वान्गा) याच्याशी त्याच्या प्रदेशाचे संरक्षण आणि विकास करण्याची जबाबदारी घेऊ पाहणारा करार केला. परंतु ब्रिटिश राजवटीने हे काम स्वत: हातात न घेता, १८८८ साली ‘इम्पिरियल ब्रिटिश ईस्ट आफ्रिका कंपनी’ची स्थापना करून त्यांच्यावर हे काम सोपविले.

युगांडाच्या या भागातील विकासकामे करण्यासाठी त्या प्रदेशात रेल्वे सुरू करणे आवश्यक होते. डोंगराळ व जंगलाच्या प्रदेशात रेल्वेमार्गाचे बांधकाम करण्यासाठी इम्पिरियल कंपनीने १८९० मध्ये ब्रिटिश भारतातून ३२ हजार कुशल कामगार युगांडात नेले. या कामगारांपैकी बहुतेक सर्व गुजराती होते. मात्र, तिथे आलेल्या साथरोगामुळे यातील बरेच कामगार काम अर्धवट सोडून भारतात परतले. परंतु साधारणत: सात हजार कामगार मात्र युगांडातच काम संपेपर्यंत राहिले. पुढे ही गुजराती मंडळी युगांडातच स्थायिक झाली. युगांडातील या गुजराती लोकांच्या पुढच्या पिढ्यांनी पूर्व आफ्रिकेतील कॉटन जिनिंगचा व्यवसाय पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली आणला!

इम्पिरियल कंपनीने आपले काम सुरू केले त्याच काळात तिथे यादवी युद्धांस सुरुवात झाली होती. ही युद्धे धार्मिक द्वेषांमधून उद्भवली होती. पहिली यादवी माजली ती बुगांडा राज्यातील मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मीयांत १८८७ मध्ये, तर दुसरी यादवी १८९० साली प्रोटेस्टंट ख्रिस्ती आणि कॅथॉलिक ख्रिस्ती समाजांमध्ये. या यादवींमुळे युगांडात सर्वत्र हिंसक दंगली माजल्या होत्या. याशिवाय विकासकामांचे आर्थिक गणित आवाक्याबाहेर गेल्याने ब्रिटिश राजवटीच्या परवानगीने इम्पिरियल कंपनीने गाशा गुंडाळला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com