हायड्रोजन आणि कार्बन या मूलद्रव्यांचे अणू संयोग पावून ‘हायड्रोकार्बन’ रसायने तयार होतात. नाना तऱ्हेच्या हायड्रोकार्बन्स रसायनांची संख्या प्रचंड असून त्यांच्यापासून रसायनशास्त्रात एक वेगळा विभाग तयार होतो. पेट्रोलियम पदार्थ हे या भिन्न हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणांनी बनलेले असतात. त्या संयुगातील कार्बनची संख्या जेवढी जास्त त्यावरून त्यापासून मिळणाऱ्या पदार्थाची वर्गवारी केली जाते. हे पदार्थ ऊध्र्वपातन पद्धतीने वेगळे केले जातात. सुमारे ७५०० पदार्थ पुरविणाऱ्या खनिज तेलाला विविध तापमानाला तापवून त्यांची वाफ वेगळी केली जाते. पुन्हा थंडावा देऊन त्यांचे द्रवात रूपांतर केले जाते. पेट्रोलियम खनिज तेलातील एक आणि दोन कार्बनयुक्त रसायने बाहेर काढली की त्यापासून नसíगक वायू मिळतो. या वायूत मिथेन आणि इथेन ही वायुरूप संयुगे असतात. घरेदारे, कार्यालये उबदार ठेवण्यासाठी या वायूंचा वापर होतो. अलीकडे हा वायू पाइपद्वारा स्वयंपाकघरात पोहोचवला जातो. तीन ते चार कार्बनयुक्त हायड्रोकार्बन संयुगांच्या मिश्रणाने स्वयंपाकघरात सर्रासपणे वापरला जाणारा एल.पी.जी. (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) मिळतो. पाच ते दहा कार्बनयुक्त हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणातून खते व पेट्रोकेमिकल्स तयार करण्यासाठी लागणारे नॅफ्था हे द्रावण, पेट्रोलसारखे मोटारगाडय़ांचे इंधन, तसेच बेंझिन, टोल्वीन, झायलीनसारखी उपयुक्त रसायने प्राप्त होतात. दहा ते बारा कार्बनने बनलेली संयुगे विमानासाठी वापरले जाणारे ए. टी. एफ. (एविएशन टर्बाइन फ्युएल) तयार करण्यासाठी वापरली जातात. तेरा ते सोळा कार्बनच्या हायड्रोकार्बन संयुगांच्या मिश्रणातून दिव्यात व स्टोव्हमध्ये जळणारे केरोसीन मिळते. रेलगाडय़ा, जहाजे, ट्रक, बसगाडय़ांसाठी लागणारे डिझेल तेल सोळा ते बावीस कार्बनयुक्त संयुगांच्या मिश्रणाने प्राप्त केले जाते, तर घर्षण कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वंगणतेलात बावीस ते अठ्ठावीस कार्बनपासून बनलेली रसायने असतात.    शेवटी जो घनरूप चोथा उरतो, त्याला डांबर म्हणतात. अनेक क्लिष्ट रसायनांनी व्यापलेला डांबर हा बहुपयोगी पदार्थ असून तो रस्ते, विमानतळावरील धावपट्टय़ा, नदीचे बांध यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी उपयोगास येतो.

प्रबोधन पर्व: चिकित्सेचे पहिले अंग
‘चांगल्यास चांगले आणि वाइटास वाईट’ म्हणण्याचा बाणा रुजला पाहिजे, असा आग्रह विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी धरला होताच, पण बोलके सुधारक आणि कर्ते सुधारक या दुहीला सांधणारा, दोषदिग्दर्शन हेही चिकित्सेचे पहिले अंग मानणारा विचार त्यांनी मांडला. ते म्हणतात-  ‘‘एका गोष्टीला जो कोणी नांवें ठेवील त्यानें ती सुधारावी कशी हेंही पण जरूर सांगितलें पाहिजे, नाहींतर नांव ठेवण्यास त्यास अकत्यार नाहीं- हा मुद्दा किती पोकळ आहें हें बहुधा कोणालाही कळणार आहे. अमका मनुष्य असा आहे असें कोणी म्हटल्याबरोबर त्याचें नाक ‘चांपेकळी’सारखे करून देण्याचा बोजा लागलीच त्याच्या डोक्यावर येऊन आदळतो काय?  वैद्यानें आपली नाडी पाहून अमुक अमुक विकृती आपल्याला जडली आहे असें सांगितल्याबरोबर आथेल्लोनें जशी यागोची गचांडी धरली त्याप्रमाणें वैद्यराजांवर प्रयोग केला असतां चालेल काय? .. तेव्हां  एकंदरीत हाही कोटिक्रम अगदी शुष्क आहे. अमुक अमुक गोष्ट गैर आहे असें सांगण्याचा सर्वास अधिका आहे व ती सुधारण्याचा उपाय सांगण्याची जबाबदारी वरील दूषकावर नियमानें येतेंच असें कांहीं नाहीं. दूषकानें दोषाचें आविष्करण कतांना त्याच्या प्रतिक्रियेचाही उपाय सांगितल्यास चांगलेंच. तसें केलें असतां त्यास तें विशेष करून श्रेयस्कर होणार आहे हें उघडच आहे. पण या वरच्या पायरीपर्यंत जरी त्याची मजल न पोंचली, तरी लोकांचा भ्रम दवडून त्यांस सावध केल्याचें तरी श्रेय त्याजकडे येणार आहे हें उघड आहे. रोगापासून मुक्त करण्याचें सामथ्र्य थोडय़ांसच असतें, म्हणून आपल्या दृष्टीस जी विकृतीची भावना येईल ती कोणाच्या किंवा त्याच्या स्नेह्यांच्या लक्षांत आणून दिल्याने दौर्जन्य प्रगट होतें असें नाहीं. वरील भावना लक्षांत येणें हेंच पुढील चिकित्सेचे पहिलें अंग होय!’

मनमोराचा पिसारा: प्रेमाची केमिस्ट्री
गंमत म्हणजे कवी आणि कलाकाराना जितकं मोकळेपणानं आपले विचार आणि मत मांडायचं स्वातंत्र्य लाभतं, तितकं काटेकोर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांना मिळत नाही. त्यामुळे एखाद्या अद्ययावत, क्रांतिकारी शोधाची माहिती देणाऱ्या शोधनिबंधाची सुरुवात शेक्सपिअर शेली, कालिदास, उपनिषद आदींमधील वचनानी करतात. पूर्वसुरींनी सहज उद्गारानं मांडलेल्या विचारांतून जे सत्य मांडलं ते सिद्ध करायला शास्त्रज्ञांना भरेच द्राविडीप्राणायाम करावे लागतात. उदा. मेलंकोलिआ म्हणजे मनावर दुष्ट काजळी पसरविणारं तीव्र नैराश्य आणि आता अशा तीव्र नैराश्याला कारणीभूत ठरणारी बिघडलेली जीवरसायनं वैज्ञानिकांनी शोधली आहेत, पण मूळ लॅटीन शब्दाचा अर्थच बिघडलेली जीवद्रव्य असा आहे. आता रोगावर इलाजाकरिता औषधी रसायनांचा शोध घेणं योग्यच आहे, पण ‘प्रेम’ या भावनेची रसायनं शोधणं, प्रेमाच्या विविध अवस्थांची मेंदूमधली स्थानं निश्चित करणं म्हणजे टू मच. हा शोध फंक्शनल एमआरआयच्या मदतीने घेतात आणि त्या विचारांची दिशा तर फारच अंतरंगी म्हणजे प्रेम ही भावना रोगासारखीच जालीम. आता चला मागे, आठवा गालिबयांची शेरोशायरी. हं. ते झुरणं, उसासणं, निकम्या होणं! (म्हणजे इथेही कवींनी बाजी मारली.) गालिब यांचं प्रेम म्हणजे प्रेमाचं ऑब्सेशन. प्रेमानं पछाडलं जाणं. प्रेम सोडून आणखी काही न सुचणं. कितीही मिळालं तरी पुरे न पडणं, प्रेमाची आस दाबून टाकली तर ती दुप्पट असोशीनं पुन्हा मनात थैमान घालणं. हे आलंच. इतकंच काय, अशा प्रेमपछाडण्यातून सुटका झाली तर त्याची/ तिची याद आली की पुन्हा प्रेम सुरू!!
ही सारी प्रेमाची लक्षणं जशीच्या तशी व्यसनाला लागू पडतात. प्रेमाच्या ऐवजी इथे दारू (मदिरा, साकी जाम) वगैरे शब्द वापरून बघा म्हणजे काडीचा बदल झालेला आहे असं वाटणार नाही.
म्हणजे प्रेम हा प्रेमरोग की, लव्हेरिआच!! असं नुसतं म्हणणं नाही तर वैज्ञानिकांनी प्रेमरोगी आणि व्यसनी माणसांच्या मेंदूत एकाच प्रकारच्या जीवरसायनांनी ठरावीक ठिकाणी ठाण मांडलेलं असतं. म्हणजे हा शास्त्रीय सिद्धांतच झाला म्हणा ना.
प्रेमाच्या ऑब्सेशनची ही रसायन कथा तर तिकडे प्रेमाच्या आकंठरसपानाचं जीवरसायन शोधून काढलंय. ते आहे ऑक्सिटोसिन. रतिसुखाच्या अत्युच्च क्षणी (ऑर गॅझम) पाझरणाऱ्या या रसायनाला आलिंगन रसायन (हग्केमिकल) म्हणतात आणि परस्परांच्या सहवासाच्या अतीव ओढीच्या वेळी हेच रसायन पाझरतं. अगदी तान्ह्य़ा बाळाला पाजतानादेखील. म्हणजे रसायन तेच पण त्यावर शिक्कामोर्तब होतं कधी जिव्हाळ्याचं तर कधी रतिसुखाचं, शंृगाराचं!
डोपामिन हे रसायन त्यातलं बरंच जुनं आणि जाणितं. त्याचाही संबंध आनंद आणि रोमांचकारी ओढ वाटण्याशी जोडलेला आहे. ही तर तीन-चार केमिकल्सची गोष्ट झाली. प्रेमामुळे अंगावर मूठभर मास चढतं. कारण त्या सेन्स ऑफ वेल बिईंगमुळे शरीरातली पेशींची वाढ करणारी रसायनं पाझरतात. कधी वाटतं, विज्ञानानं या प्रेमाची फारच चिरफाड केलीय. उत्कट भावनांची पावती, अशी जीवरसायनांच्या नावानं फाडली तर प्रेमातली गूढरम्यता संपलीच म्हणायची आणि जोवर प्रेमात रहस्य आहे तोवर गंमत आहे ना!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com