मॉल्सच्या दुकानांची दारं आपलं पाऊल पडताच उघडतात, आणि दारापासून लांब जाताच आपोआप बंदही होतात. अर्थात हे घडतं ते त्यात असणाऱ्या फोटो कंडक्टरमुळे. या फोटो कंडक्टरमध्ये जम्रेनिअम या मूलद्रव्याचा वापर होतो. टीव्हीचे रीमोट, एलईडी दिवे, सौर घट यातही जम्रेनिअमचा वापर होतो. आवर्तसारणीतील चौथ्या आवर्तनातील आणि चौदाव्या गणातील ३२ अणुक्रमांकाचे हे धातुसदृश मूलद्रव्य. दिमित्री मेंडेलीव्ह ह्य़ांनी जम्रेनिअमचे तात्पुत्रे नामकरण इका-सिलिकॉन असे केले होते. १८८५ मध्ये क्लेमेन्स विंकलर या जर्मन रसायनशास्त्रज्ञाने आर्गिरोडाइट या खनिजामधून इका-सिलिकॉन मिळवले. मेंडेलीव्हच्या कल्पनेनुसार व चाचण्यांनुसार या

मूलद्रव्याची घनता ५.५ तर अणुवस्तुमानांक ७२.६४ असेल अशी नोंद होती. प्रत्यक्षातही जम्रेनिअमची घनता ५.३५ आणि अणुवस्तुमानांक ७२.५९ अशी मेंडेलीव्हच्या नोंदीच्या जवळपास होती. त्यामुळे इका-सिलीकॉन व मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीवर विश्वास वृद्धिंगत झाला. विंकलरने त्याची मातृभूमी जर्मनीचे लॅटिन भाषेतील नाव जम्रेनिया यावरून या मूलद्रव्याचं नामकरण जम्रेनीअम केलं.

पांढरट-राखाडी रंगाचे, चकाकणारे हे धातुसदृश मूलद्रव्य दुसऱ्या महायुद्धात अल्प प्रमाणात वापरण्यात आले. रडारमधील डायोड्ससाठी आणि १९४८पासून ट्रान्झिस्टरमध्ये याचा वापर होऊ लागला.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ऑप्टिक्स, दळणवळण यंत्रणेतील फायबर ऑप्टिक्स (तंतूप्रकाशकी) क्षेत्रात अर्थात काचेच्या किंवा प्लास्टिकच्या अतिसूक्ष्म तंतूच्या साहाय्याने प्रकाश किरणांचे लवचीक नळीद्वारे वहन करणाऱ्या केबल्ससाठी जम्रेनिअमचा वापर होतो.

सध्या अलास्का, चीन, टेनेसी, यूक्रेन, रशिया, बेल्जियम आणि यूके हे देश खाणींमधून मिळणाऱ्या जम्रेनिअमच्या बाजारपेठेचे मोठे मानकरी आहेत. फायबर ऑप्टिक्स आणि क्वांटम कम्प्युटिंगच्या क्षेत्रात त्यास उत्तम मागणी आहे. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा, स्पेक्ट्रौनिक्स, वायरलेस यंत्रणा, जलदगतीने कार्यरत असणारी इंटिग्रेटेड सर्ट्स, सिलिकॉन-जम्रेनिअमच्या चीप्स व जम्रेनिअम पारदर्शक असल्यामुळे सूक्ष्मदर्शकाचे लेन्स, स्पेक्ट्रोमीटर्स इत्यादींमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांत जम्रेनिअम उच्च स्थानावर आहे. अवरक्त तरंगलांबीसाठी जम्रेनिअम हे पारदर्शी असल्याने महत्त्वाचे अवरक्त प्रकाशीय संसाधन आहे. उष्ण-प्रतिमा छायाचित्रणातील भिंग बनविण्यासाठी त्याचा वापर होतो. त्याचा अपवर्तनांक अधिक (४.०) असल्याने त्यावर डायमंड-लाइक-कार्बन (DLC)चे  लेपन करून त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स २.० पर्यंत खाली आणला जातो. आणि पर्यावरण शोषणापासून मुक्त असे हिऱ्यासारखे कठीण भिंग तयार होते.

श्वेता चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२  

office@mavipamumbai.org