‘काच’, ‘फूल’, ‘चादर’, ‘आनंद’, ‘पाचशे एकोणतीस’ अशा शब्दांची एक यादी आहे. आणि ‘दप्तर’, ‘पेन’, ‘पुस्तक’, ‘वही’, ‘पट्टी’ अशा शब्दांची एक यादी केली. या याद्या पाठ करायला सांगितल्या, तर कोणती यादी पटकन पाठ होईल?

अर्थातच दुसरी यादी. कारण या दुसऱ्या यादीतले शब्द एकाच विषयाशी संबंधित आहेत. तर पहिल्या यादीतल्या शब्दांचा एकमेकांशी संबंध असतो. ही पहिली यादी पाठ नक्कीच होईल; पण त्याला तुलनेनं जास्त वेळ लागेल.

अशा प्रकारचा अभ्यास हेर्मन एबिंगहॉस या शास्त्रज्ञांनी फार पूर्वीच करून ठेवलेला आहे. पूर्वी- म्हणजे १८८५ मध्ये. ज्या शब्दांना काहीही अर्थ नाही, असे शब्द पाठ करण्याचा एक प्रयोग त्यांनी केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की असे निर्थक शब्द पाठ करणं ही अवघड गोष्ट आहे. त्याऐवजी अर्थपूर्ण माहितीचं पाठांतर सोपं आहे. कारण मेंदूचा नेहमीच अर्थपूर्ण माहिती लक्षात ठेवण्याकडे कल असतो. जे अर्थपूर्ण नाही, ते लक्षात राहत नाही.

एक- समजेल अशा भाषेत सांगितलं गेलं; दोन- अर्थ लक्षात आला; तीन- पूर्वी मिळालेल्या माहितीशी नव्या माहितीची सांगड घालता आली; चार- संबंध जोडला गेला, तर त्यावर मेंदू चिंतन करतो. त्या विषयावर दुसऱ्या कोणाशीही बोलून ही माहिती दृढ होते. याचाच अर्थ अभ्यास होतो. यातली एक जरी साखळी जोडली गेली नाही, तर आकलन होत नाही. शिकवलेल्या गोष्टी निर्थक वाटतात. एकदा निर्थक वाटायला सुरुवात झाली, निर्थक गोष्टींवर काम झालं नाही, प्रयत्न केले गेले नाहीत, तर सगळ्यातून लक्ष उडतं.

‘लक्षातच राहत नाही’ अशी ज्यांची तक्रार असते, त्यांनी या गोष्टी निश्चितच तपासून पाहाव्यात : आपल्याला जे पाठ करायचंय ते आधी समजलंय का, हे बघणं आवश्यक आहे. आपल्याला निर्थक माहितीही पाठ करता येते. परंतु त्याला जास्त कष्ट पडतात आणि दुसरं म्हणजे, ते कधीही कायमस्वरूपी लक्षात राहत नाही. अवघ्या काही तासांत, काही दिवसांत विसरून जातं. समजलेलं सगळं लक्षात ठेवायलाही नियमित सराव लागतो. अभ्यास तयार आहेच, फक्त त्यावरची धूळ झटकून तो उजळवून ठेवायचाय, असा त्याचा अर्थ. तेवढं मात्र आपल्याच हातात; नव्हे मेंदूत आहे!

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com