पाणी हे निसर्गाचे अतिशय स्वच्छ, देखणे स्वरूप आहे. जल हे रंग, वासविरहित असते तरीही त्याला एक हवीहवीशी चव असते. ही चव असते ती त्यात विद्राव्य असलेल्या मूलद्रव्ये आणि खनिजांमुळे, म्हणूनच तहानलेली व्यक्ती तांब्याभर पाणी प्यायल्यावर तृप्तीचा ढेकर देते. निसर्गाचे हे सुंदर देणे आपल्यासाठी जीवन आहे, म्हणून तर ते अमृतासमान आहे. निसर्ग आपल्याला मूलद्रव्ये आणि खनिजमिश्रित पाणी देतो, मात्र त्याचा वापर करताना आपल्याकडून अक्षम्य हेळसांड होऊन त्यात अनेक घातक पदार्थ, प्रदूषके मिसळली जातात आणि अमृतासम असलेले जल नंतर विषसमान होते. अशा वेळी विज्ञान आपल्या मदतीला धावून येते आणि तेच पाणी आपल्याला पुन्हा मूळ स्वरूपात नसले तरी शुद्ध रूपात उपलब्ध होते. पिण्यासाठी योग्य असलेल्या पाण्याचे पुढीलप्रमाणे सहा प्रकार आहेत.

१.  नळाचे पाणी – संरक्षित जलाशयातील पाण्याचे शुद्धीकरण करून नळाद्वारे घरोघरी पोहोचवले जाणारे हे पाणी स्वच्छ तसेच पिण्यास योग्य असते, त्याचबरोबर ते स्वच्छतेसाठीसुद्धा वापरले जाते.

२.  नैसर्गिक पाणी – हे पाणी आपल्याला घनदाट जंगल, डोंगर-दऱ्या, पर्वतांत वाहत्या स्वरूपात पाहावयास मिळते.

३.  झऱ्याचे पाणी – पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यावर काही काळाने ते झऱ्याच्या रूपात पृष्ठभागावर येते.

४.  विहिरीचे पाणी – पावसाचे पाणी जमिनीत झिरपते आणि त्याचा संचय भूगर्भात होतो. यांत्रिक पद्धतीने उपसा केल्यावर हे पाणी प्राप्त होते.

५.  अतिशुद्ध पाणी – नळाचे पाणी शुद्धीकरण यंत्रांतून शुद्ध होऊन येते, तेव्हा ते जिवाणू, प्रदूषके आणि विषाणूमुक्त असते. घरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्र असणे, ही आता काळाची गरज झाली आहे.

६.  ऊध्र्वपातित पाणी –  जे पाणी बाष्पीभवन अथवा व्युत्क्रमी परासरणाद्वारे (Reverse Osmosis) प्राप्त होते, त्याला ऊध्र्वपातित पाणी म्हणतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची खनिजे अथवा प्रदूषके नसतात, म्हणूनच हे बेचव असते. याचा उपयोग वैद्यकीय क्षेत्र, बॅटरीज, विज्ञान प्रयोगशाळा आणि संशोधन क्षेत्रात होतो. नैसर्गिक पाण्याचे हे सकारात्मक विज्ञानरूप आहे. ऊध्र्वपातित पाण्याचा वापर पिण्यासाठी न करता इतर मानवी कल्याणकारी योजनांसाठी होऊ शकतो, एवढे मात्र खरे.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org