रेणू भालेराव, मराठी विज्ञान परिषद
समुद्रगायी (डय़ुगाँग डय़ुगाँन) डय़ुगाँगिडीया कुलातील एकमेव जिवंत प्रजाती. मांस, तेल, त्वचा, हाडे आणि दात यांसाठी शिकार केली जाणाऱ्या या सागरी सस्तन प्राण्याचा अधिवास उथळ पाण्यात असल्यामुळे तो सहज शिकाऱ्यांच्या तावडीत सापडतो. या प्रजातीच्या जवळची प्रजाती स्टेलर समुद्रीगाय अठराव्या शतकातच अस्तंगत झाली. आक्र्टिक प्रदेशाचा शोध लागल्यावर केवळ ३० वर्षांत मानवाने ही प्रजाती संपवली. अनिर्बंध शिकारीमुळे मॉरिशस, मालदीव, कंबोडिया अशा देशांतून ती नामशेष झाली आहे. आंतरराष्ट्रीय वन्यजीव संवर्धन संस्थेने (आययूसीएन) ती आता संवेदनशील प्रजाती म्हणून घोषित केली आहे.
समुद्र गवतावर चरणारा हा प्राणी खरेतर गायीपेक्षा हत्तीच्या अधिक जवळचा. पुनरुत्पादन गती अत्यंत सावकाश म्हणजेच जवळजवळ दोन ते सात वर्षांत एखादे पिल्लू जन्माला घालणे, विलंबाने येणारी प्रजननक्षमता, गर्भधारणेचा मोठा कालावधी यामुळेही यांची नामशेष होण्याची शक्यता वाढते. हसमुख चेहरे, फेंदारलेल्या नाकपुडय़ा, नाकाखालचे मिशाळ केस हे यांचे वैशिष्टय़. प्रौढ नरामध्ये दिसणारे सुळे मादीमध्ये मात्र दिसत नाहीत. दर चार-पाच मिनिटांनी श्वास घेण्यासाठी यांना समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागते. यांच्या चरण्यामुळे समुद्रगवताच्या वाढीलाही मदत होते. रेमोरा माशाबरोबरच्या सहजीवनामुळे यांच्या अंगावरचे परजीवी नष्ट होतात शिवाय रेमोरालाही खाद्य आणि संरक्षण मिळते.
भारतात समुद्रगायी कच्छचे आखात, पाल्क आणि मन्नारची सामुद्रधुनी, अंदमान, निकोबार द्वीपसमूह, लक्षद्वीप येथे मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. सध्या त्यांची संख्या कमी असली तरी त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक तसेच स्थानिक पातळीवर वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. अंदमान, निकोबारमध्ये याला राज्य प्राणी म्हणून घोषित केला आहे. समुद्रगायींच्या शिकारी होऊ नयेत, मासेमारीच्या जाळय़ांपासून त्यांचे संरक्षण करण्याच्या हेतूने प्रयत्न सुरू आहेत. तमिळनाडू राज्याने मन्नार सामुद्रधुनी प्राधिकरण यांचे संकेतचिन्ह म्हणून समुद्रगायीची निवड केली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये तमिळनाडूने पाल्क सामुद्रधुनी भागात ४४८ किमी क्षेत्रफळाला समुद्रगायींचे भारतातील पहिले संवर्धन क्षेत्र म्हणून राखीव केले आहे. अशा अनेक योजनांमुळे समुद्रगायींचे संवर्धन अवघड असले तरी अशक्य नाही असा विश्वास वाटतो.