व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता असे ऐकले की प्रत्येक प्रसंगात अशी बुद्धिमत्ता योग्य निर्णय घेऊ शकेल का, याविषयी शंका मनात येते. माणूस समाजात वावरताना काही नियम पाळतो. त्यामागे कायदे असतात तशी त्याची नैतिक जडणघडण आणि सामाजिक चौकटदेखील असते. मानवी बुद्धिमत्तेत नैतिक आणि सामाजिक भान अतिशय महत्त्वाचे आहे. ते व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेत शक्य आहे का?

या संदर्भातला ट्रॉली प्रॉब्लेम फार रोचक आहे. रेल्वे रुळांवरून एक ट्रॉली जात आहे. पुढे मुख्य मार्गावरील रुळांवर पाच व्यक्ती बांधलेल्या आहेत आणि ही ट्रॉली त्या दिशेने जात आहे. तुम्ही ट्रेनच्या यार्डमध्ये आहात. तिथला एक खटका ओढून तुम्ही ट्रॉलीला दुसऱ्या मार्गावर वळवणार तोच तुमच्या लक्षात येते की दुसऱ्या रुळांवर एक व्यक्ती पडलेली आहे. आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे काहीही न करता मुख्य मार्गावरील पाच जणांचा मृत्यू होऊ देणे. दुसरा म्हणजे खटका ओढून ट्रॉली दुसऱ्या मार्गावर वळवून एकाचा मृत्यू होऊ देणे. यातली त्यातल्या त्यात योग्य निवड कोणती असेल?

हेही वाचा >>> कुतूहल : व्यापक बुद्धिमत्तेच्या चाचण्या

एकाचा जीव महत्त्वाचा की पाच जणांचा? त्यातल्या कोणाला आपण ओळखत असू तर काय निर्णय घेऊ? त्यातली एखादी व्यक्ती अतिमहत्त्वाची असेल तर निवड काय असेल? एका व्यक्तीच्या जागी लहान मूल असेल तर कोणता पर्याय उचित होईल? किंवा त्या व्यक्तीकडे स्फोटके असतील तर ट्रॉली तिकडे गेल्यावर स्फोटात किती जणांचे प्राण जातील? पाच व्यक्ती मरणासन्न परिस्थितीत तिथे आलेल्या आपल्याला माहीत असेल तर काय? यासारख्या अनेक शक्यता इथे उद्भवतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत निर्णय आणि त्यामागील कारणमीमांसा वेगळी असेल. अशा वेळी व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता कशी वागेल? तिला या सगळ्या पैलूंचे आकलन होईल का?

आपण हजारो वर्षे समाज म्हणून शिकत आलो ते एका प्रणालीला शिकवणे अतिशय आव्हानात्मक आहे. पण ते आवश्यकही आहे. देहबोली समजून घेणे, बोलण्यातील उपहास किंवा सूचकतेचा अर्थ लावणे, वैयक्तिक निवडींचा आदर करणे, कोणताही पूर्वग्रह वा आकस न बाळगणे, समाजातील विविध वर्गांपैकी कोणावरही अन्याय न करणे, प्रत्येक प्रसंगी सामाजिक आणि नैतिक चौकटीचे भान ठेवणे हे सर्व काही जमेल तेव्हाच कृत्रिम बुद्धिमत्ता खऱ्या अर्थाने व्यापक होऊ शकेल.

– डॉ. मेघश्री  दळवी   

मराठी विज्ञान परिषद

ईमेल: office@mavipa.org  

संकेतस्थळ: http://www.mavipa.org