– डॉ. यश वेलणकर

माणसे ठरावीक चाकोरीत विचार का करतात याचे कोडे मेंदूच्या संशोधनातून उलगडू लागले आहे. मेंदूत अब्जावधी पेशी असतात. प्रत्येक पेशी इतर हजारो पेशींना जोडलेली असते. यातील ठरावीक जोडण्या सक्रिय असतात त्या वेळी मनात एक विचार असतो. वेगळ्या जोडण्या सक्रिय झाल्या की दुसरा विचार असतो. हे स्पष्ट करणारा एक प्रयोग केला गेला. त्यामध्ये माणसांना एक चित्र दाखवले. या चित्राला ठरावीक पद्धतीने पाहिले की तरुणी दिसते आणि तेच चित्र वृद्ध स्त्रीचेदेखील दिसते. एकच वास्तव कसे वेगवेगळे दिसू शकते हे समजून सांगण्यासाठी हे चित्र वापरतात. प्रयोगातील व्यक्तीला हे चित्र दाखवून त्याला तरुणी दिसते आहे का, हे विचारून त्या वेळी मेंदूतील कोणत्या पेशींच्या जोडण्या कार्यरत असतात हे पाहिले. नंतर त्याला वृद्ध स्त्री कशी दिसते हे सांगितल्यानंतर त्याच चित्रात वृद्ध स्त्री दिसू लागली. गंमत म्हणजे त्या वेळी मेंदूतील पेशींच्या जोडण्या बदललेल्या होत्या. चित्र कसले आहे हे ओळखणे म्हणजेच विचार, तो बदलला की मेंदूतील जोडण्या बदलतात. मेंदूतील ज्या पेशी अधिक काळ एकमेकांच्या संपर्कात राहतात, त्यांच्या जोडण्या अधिकाधिक दृढ होऊ लागतात. गवत असलेल्या टेकडीवर ठरावीक मार्गाने चालत राहिलो की तेथे पाऊलवाट तयार होते, तसेच मेंदूतही होते. मेंदूत खरीखुरी चाकोरी तयार होते आणि त्याच पेशींच्या जोडण्या पुन:पुन्हा होत राहिल्याने तेच चाकोरीबद्ध विचार मनात येत राहतात. ही चाकोरी मोडायची असेल तर वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा. असा वेगळा विचार शक्य होण्यासाठी ध्यान म्हणजे अटेन्शन महत्त्वाचे असते. वरील प्रयोगात, एकाच चित्रात दोन वेगवेगळ्या स्त्रिया दिसतात हे समजू शकणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूत दोन्ही विचारांच्या जोडण्या ‘असतात’. मात्र पाहताना तो ज्या विचारावर लक्ष देतो ती जोडणी मेंदूत सक्रिय झालेली दिसते. ही सक्रियता कायम ठेवायची असेल तर मनात तोच विचार अधिक वेळ ठेवायला हवा. पण असे होत नाही. विशेषत: दुसरी चाकोरी अधिक खोल असेल तर दुसरे विचार, ज्यांना माणूस टाळायचा प्रयत्न करतो, ते पुन:पुन्हा येत राहतात. या चाकोरीतून बाहेर पडायचे असेल तर मनात तो विचार आला तरी त्याला महत्त्व द्यायचे नाही. त्याच्याकडे लक्ष न देता शरीरावर लक्ष न्यायचे. असे केल्याने मेंदूतील वेगळ्याच भागात नवीन जोडण्या तयार होतात. त्रासदायक विचारावरील लक्ष पुन:पुन्हा शरीरावर नेले की त्या विचाराची चाकोरी क्षीण होते.

yashwel@gmail.com