सिग्मंड फ्रॉइड यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी मानसोपचार सुरू केले. त्यात अनेक बदल होत आजवर अनेक मानसोपचार पद्धती विकसित झाल्या आहेत. मात्र, आपल्या देशात याविषयीची जाणीव खूप कमी आहे. एखाद्याला चिंता, भीती, औदासीन्य असा त्रास होऊ लागला की, एकतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्रास खूप वाढल्यास मनोरोगतज्ज्ञ डॉक्टरांना भेटून औषधे घेतली जातात. याच्या मधे मानसोपचार हाही एक पर्याय आहे, याची जाणीव अनेकांना नाही. ती विकसित करण्यासाठी गेले वर्षभर आपण मानसोपचार कसे विकसित होत गेले याचा धावता आढावा ‘मनोवेध’मध्ये घेतला.

मानसोपचाराविषयी सुशिक्षित व्यक्तींमध्येही अनेक गैरसमज आहेत. ‘आर्ट थेरपी’ ही एक मानसोपचार पद्धती आहे. मात्र तिचा उपयोग मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे गरजेचे असते. अस्वस्थता असताना चित्रे काढणे याचा एक उद्देश मनातील विचारांच्या प्रवाहातून बाहेर पडणे हा असतो; पण त्यानंतर मानसोपचारतज्ज्ञांशी संवाद, समुपदेशन गरजेचे असते. कॅनव्हासवर मनाला वाटतील तसे रंग ओतणे ही ‘थेरपी’ नसते; त्रासदायक भावनांना दडपण्याचा तो एक घातक मार्ग ठरू शकतो. डान्स, प्ले अशा विविध ‘थेरपी’ आहेत; पण त्यांतही मानसोपचारतज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. मानसोपचारतज्ज्ञांकडे काही विशेष कौशल्ये असतात. केवळ ऐकून घेणे म्हणजे समुपदेशन नसते, तर भावनिक त्रास असलेल्या व्यक्तीला काही कौशल्ये शिकवणे मानसोपचारात अपेक्षित असते. वर्तन चिकित्सा, विवेकनिष्ठ चिंतन चिकित्सा व ध्यानाचा उपयोग करून केल्या जाणाऱ्या मानसोपचारांमध्ये मनात येणाऱ्या त्रासदायक भावना-विचार यांना कसे सामोरे जायचे याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या जातात.

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
lokmanas
लोकमानस: वारसा कर हा वैचारिक संघर्ष
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

रेकीसारखे ‘हीलिंग’ आणि मानसोपचार यांमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. ‘हीलिंग’मध्ये शारीरिक किंवा मानसिक त्रास असलेल्या व्यक्तीने काहीही करणे आवश्यक नसते. तिने हीलरवर केवळ श्रद्धा ठेवणे अपेक्षित असते. हीलर वैश्विक ऊर्जा रुग्णांना देतो. मानसोपचारतज्ज्ञ त्याच्या रुग्णाला कौशल्य शिकवतो. त्या कौशल्याचा सराव करणे आणि आयुष्यात वापरणे हे ज्याला त्रास आहे त्याने करावे लागते. ते केले तरच फायदा होतो.

आपल्या समाजात आरोग्याची जबाबदारी स्वत: घेणे म्हणजे ‘औषधे घेणे’ हाच समज असल्यानेही मानसोपचार सर्वत्र पसरले नसावेत. मात्र चिंता, औदासीन्य, ओसीडी, भीतीचे झटके, आघातोत्तर तणाव असे भावनिक विकार व तणावामुळे होणारे शारीरिक आजार वाढत असल्याने मानसोपचारांची योग्य माहिती सर्वाना असणे ही काळाची गरज आहे.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com