– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

सिएरा लिओनचा बहुतेक प्रदेश १९२४ साली अंमलाखाली आल्यावर ब्रिटिश सत्तेने त्याची दोन प्रशासकीय व्यवस्थांमध्ये विभागणी केली. वसाहत व संरक्षित अशी. त्यामुळे असंतुष्ट झालेल्या संरक्षित येथल्या लोकांमध्ये ब्रिटिशविरोधी व त्यांच्या बाजूचे असे दोन मतप्रवाह तयार झाले. या प्रदेशातील लहान लहान राज्यकर्तेही असंतुष्ट संरक्षित प्रजेबरोबर ब्रिटिशविरोधी गटात होते. या दोन गटांमधील संघर्षांने काही वेळा उग्ररूप धारण केले.

पुढे १९५१ मध्ये काही सुशिक्षित संरक्षित गटाचे तरुण व काही प्रबळ राज्यकर्ते यांनी ‘सिएरा लिओन पीपल्स पार्टी (एसएलपीपी)’ हा राजकीय पक्ष स्थापन केला. या संघटनेचे प्रमुख मिल्टन मार्गाई यांनी ब्रिटिश वसाहत सरकारविरोधी वातावरण तापवत सिएरा लिओनच्या हजारो तरुणांना आपल्या संघटनेत घेऊन सशस्त्र चळवळ उभी केली. या आंदोलनाला प्रतिसाद देऊन ब्रिटिशांनी सिएरा लिओनची पूर्वी केलेली विभागणी रद्द करून स्थानिक लोकांना काही राजकीय अधिकार दिले. पुढे १९६० मध्ये मिल्टन मार्गाई यांच्या नेतृत्वाखाली २४ स्थानिक नेत्यांचे शिष्टमंडळ लंडनमध्ये जाऊन ब्रिटिश मंत्रिमंडळाला भेटले आणि त्यांनी सिएरा लिओनची वसाहत बरखास्त करून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. त्यानंतर चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन ब्रिटिश सरकारने २७ एप्रिल १९६१ रोजी सिएरा लिओनला त्यांच्या वसाहतीतून मुक्त करून स्वातंत्र्य प्रदान करीत असल्याचे जाहीर केले.

नव्याने अस्तित्वात आलेल्या सिएरा लिओन या देशाचे पहिले नियुक्त पंतप्रधान मिल्टन मार्गाई यांनी १९६२ मध्ये निवडणुका घेऊन आपले निर्वाचित सरकार सत्तेवर आणले. इतर आफ्रिकी देशांप्रमाणेच स्वातंत्र्यानंतर सिएरा लिओनमध्येही वर्षांनुवर्षे चाललेली हिंसक सत्तास्पर्धा व त्यासाठी झालेले हत्याकांड, त्यानंतर १९९१ ते २००२ या काळात झालेले लष्करी उठाव आणि यादवी युद्धे यांनी संपूर्ण प्रशासन कोलमडले होते. यादवी युद्धात ५० हजारांवर लोक मारले गेले. २००२ साली संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेने यात हस्तक्षेप करून शांतता निर्माण केली. पुढील काळात खुल्या वातावरणात अध्यक्षीय निवडणुका झाल्या. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले ज्यूलियस माडा बिओ हे सध्या सिएरा लिओनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. तिथे संपूर्ण अध्यक्षीय प्रणालीचे प्रजासत्ताक सरकार कार्यरत आहे.