कुतूहल : मूलस्थानी जलसंवर्धन

जमिनीचा वापर केवळ पिकाच्या उत्पादनासाठी न करता जलसंवर्धनासाठीही करायला हवा. एक हंगामी पीक घेता येईल इतका जलसाठा शेतजमिनीतच करता आला पाहिजे. म्हणजे, शेततळेच तयार करायचे असे नाही.

जमिनीचा वापर केवळ पिकाच्या उत्पादनासाठी न करता जलसंवर्धनासाठीही करायला हवा. एक हंगामी पीक घेता येईल इतका जलसाठा शेतजमिनीतच करता आला पाहिजे. म्हणजे, शेततळेच तयार करायचे असे नाही. कोणताही अतिरिक्त खर्च न करता गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वाना हे जलसंवर्धनाचे तंत्र वापरता आले पाहिजे. पावसाच्या पाण्याचा थेंब ज्या ठिकाणी पडेल, त्या ठिकाणीच तो जमिनीत साठविणे, असे या तंत्राचे स्वरूप आहे.
सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढविल्यास जमिनीची जलधारण शक्ती वाढते, हा एक भाग. उन्हाळ्यात जमिनी मोठय़ा प्रमाणात भेगाळतात. मशागत न करून त्या भेगा तशाच ठेवल्यास पाणी आडवे न वाहता जमिनीत जास्त मुरेल. बिना नांगरणीच्या शेतात पडलेला पाऊस जमिनीत जास्त मुरेल. अतिरिक्त पाणी निचरून जाईल व लवकर वापसा येईल. अपुरा पाऊस झाल्यासही जास्त काळ ओलावा टिकून राहील. त्यामुळे पिकांची उगवण व वाढ चांगली होईल. यानंतर जमिनीच्या काही भागांचा वापर केवळ जलसंवर्धनासाठी करावा.
 पाऊस अपुरा झाला तरी तणे मोठय़ा प्रमाणावर माजतात. पिकाच्या ओळीतील अंतर वाढवून एक पट्टा पिकाचा व एक पट्टा तणाचा असे करावे. पिकाचा पट्टा तणमुक्त ठेवून पिकाच्या वाढीला व्यवस्थित जागा द्यावी. दोन पिकांच्या ओळीत ३० सेंमीपासून १२० सेंमीपर्यंतच्या पट्टय़ात तणे वाढू द्यावीत व योग्य वेळी पाऊस संपताच तणनाशकाने मारावीत, ग्रासकटरने कापून आच्छादन करावे अगर तणे झोपवावी व त्याची वाढ खुंटवावी. तणे मोठी झाल्यास त्याच्या मुळांचा पसारा जमिनीत खोलवर वाढलेला असेल. या मुळांच्या जाळ्यात एका पिकाच्या गरजेइतके पाणी आपल्याला साठविता येणे शक्य आहे. पुढील वर्षी तणांच्या पट्टय़ात पीक व पिकांच्या पट्टय़ात तण असा फेरपालट करावा. या तंत्राचे अनेक फायदे आहेत. धूप १०० टक्के बंद होते. जमिनीला दरवर्षी मुबलक सेंद्रिय पदार्थ मिळतात. जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वमशागत व आंतरमशागत खर्चात बचत होते. शेवटी एक हंगामी पिकाच्या अगर कापूस, तूरसारख्या दीर्घ मुदतीच्या पिकाच्या गरजेइतका जलसाठा पिकाच्या मुळाजवळच होतो.
– प्रताप चिपळूणकर (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..:     मायकेल टेम्पेस्ट
या लेखमालेतला हा भाग लिहिताना मला माझी टिमकी थोडी फार तरी वाजवावी लागेल ही कल्पना सुरुवातीपासून अस्वस्थ करत असे. त्या काळात आणि आजही ही टिमकी नव्हे तर एका उपेक्षित रुग्णालयातल्या तरुण मराठी माणसाच्या हातून काळाच्या ओघात घडलेली मर्दुमकी होती एवढीच भावना आहे. काळाच्या ओघात मुद्दामच लिहिले कारण हा काळ १९८० ते १९९५ पर्यंत टिकायचा होता. आणि यातले काही निबंध आता केवळ जुन्या नोंदी म्हणूनच उरले आहेत. एका निबंधाने भारतीय प्लास्टिक सर्जन्सच्या न्यूनगंडाच्या धरणाला खिंडार पाडले. या काळात ब्रिटिश जर्नलच्या इतिहासात जगभरातून सर्वात जास्त निबंध आमच्या विभागाच्या नावावर नोंदवले गेले आहेत. या ओघात झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमुळे उत्तमोत्तम विद्यार्थी आमच्या विभागात दाखल झाले. अनेकांना इंग्लंडमध्ये शिकण्याची संधी मिळाली आणि सर्वात महत्त्वाचे सगळेच्या सगळे परत आले आणि मी आणि डॉ. डायस यांच्यापेक्षा त्यांनी किती तरी जास्त नाव केले. अनेकांनी राष्ट्रीय स्तरावरच्या परिषदांच्या निवडणुका जिंकल्या. आजमितीला राष्ट्रीय कार्यकारिणीवर दहापैकी चार लोक महाराष्ट्राचे तर आहेतच पण आमच्या विभागाचे आहेत. मी आणि डॉ. डायस यांनी कधीही निवडणुका लढवल्या नाहीत. ते आमचे कामच नव्हते. आमच्या दोन पणत्या इतर पणत्या पेटवत होत्या. इंग्लंडमधला एक प्लास्टिक सर्जन आमच्या एका विद्यार्थ्यांला म्हणाला, ‘तू एवढा कामसू आहेस याचे नवल वाटत नाही कारण तुमच्या विभागाची वंशावळच तशी आहे.’ त्या माणसाचे नाव मायकेल टेम्पेस्ट. ब्रिटिश जर्नलचे तत्कालीन संपादक. त्यांच्या आधीच्या पिढीत भारतीय वंशाचे रजनी पाम दत्त नावाचे मजूर पक्षाचे एक मोठे पुढारी इंग्लंडमधे होऊन गेले. टेम्पेस्टचे वडील या पाम दत्त यांचे मित्र. दोघेही साम्यवादाकडे झुकलेले. टेम्पेस्ट स्वत: मेहनती, सरळ स्वभावाचे आणि राष्ट्रीय आरोग्य योजनेचे खंदे समर्थक. अपेक्षित सहा तासांच्या ऐवजी दहा तास देणारे. स्वत: थोर दर्जाचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या एका संशोधनाला अमेरिकेत मोठे बक्षीस मिळाले. स्वारी बॅग घेऊन बोटीत चढणार तेवढय़ात यांच्या वडिलांचा साम्यवादाशी असलेला संबंध उकरून काढून यांचे जाणे थांबवले गेले. यांनी उपेक्षा बघितली होती. विकसशील देशांबद्दल यांना कणव होती. मुंबईतले गुरू डॉ. डायस आणि परदेशातले गुरू डॉ. टेम्पेस्ट. खरे तर मी आता चाळिशी ओलांडली होती. परंतु फाजील ऊर्जा असलेल्या मला लगामाची आणि संगोपनाची गरज होती. ते काम या दोघांनी केले. देव आहे किंवा कसे याबद्दल मी अनभिज्ञच पण फक्त भाग्यवान माणसांनाच चांगले गुरू लाभतात हे नक्की. अर्थात हे सोन्याचे दिवस टिकायचे नव्हते. माझ्या आणि माझ्या बायकोच्या आयुष्यात एक त्सुनामी होऊ घातली होती. त्याबद्दल पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस :    मधुमेह : भाग ३
शरीर व परीक्षण – मधुमेही माणसांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा मलीनपणा, निस्तेजता, सुरकुत्या व काही न्यून असल्यासारखे सहजपणे लक्षात येते. त्याकरिता चाळिशीच्या वरच्या रुग्णांचे चेहऱ्याचे परीक्षणाचा अभ्यास ठेवावा. एकूण काळवंडलेली त्वचा, कमी झालेले वजन, मुंग्या येतात का? थकवा, खाज यासंबंधीचे प्रश्न विचारून मधुमेहाचा अंदाज घ्यावा.
उपचारांची दिशा – स्थूल रोग्यांनी लंघन करावे. बटाटा, साखर, तूप, तेल, मीठ, गहू, भात, पोहे, चुरमुरे हे कटाक्षाने कमी करून, वजन व मधुमेह कमी होतो का हे पाहावे. पांडुता असणाऱ्यांनी लोह कल्पाच्या उपाययोजनेने थकवा कमी होतो का, हे पाहावे. मनोरुग्णांचे मधुमेहाकरिता मानस दृष्टिकोनातून उपचार करावेत.
अनुभविक उपचार – रसायन चूर्ण रोज सकाळ, सायंकाळ १ चमचा पाण्याबरोबर घ्यावे. मधुमेहवटी, चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि गुग्गुळ ३-३ गोळ्या सकाळ सायंकाळ घ्याव्यात. दोन्ही जेवणानंतर मधुमेह काढा चार चमचे समभाग पाण्याबरोबर; रुची कमी असल्यास जांभुळासव चार चमचे घ्यावे. काढा घरी करण्याची तयारी असल्यास बेडकीपाला, जांभूळ बी, शतावरी, आस्कंद, वाकेरी, भुईकोहळा, त्रिफळा, असाणा, पाषाणभेद, वर धारा, बाहवामगज, जिरे, सप्तकपी, सोनामुखी, बाळहिरडा, पहाडमूळ प्रत्येकी तीन ग्रॅम असा प्रत्येक पुडीचा चार कप व दोन कप पाण्यात अनुक्रमे सकाळ सायंकाळ काढा, निकाढा घ्यावा. एक सागरगोटा फोडून त्यातील बी सहाणेवर पाण्यात संपूर्ण उगाळून ते गंध रोज सकाळी घेणे. वर्षभर नियमाने गंध पोटात घेतल्यास मधुमेह सिस्टिम मधून जातो असा अनुभव आहे. बेलाची १० छोटी पाने, १ कप पाण्यात उकळून तो काढा अर्धा कप उरवावा. रोज सकाळी घ्यावा. किमान ३ ते ५ किलोमीटर रोज चालावे. मातीमध्ये शरीरातील फाजील दोष शोषून घेण्याचे सामथ्र्य असल्याने मातीवर चालावे. असाणा किंवा बिबळा या झाडांच्या गाभ्याच्या लाकडाचा तुकडा पाण्यात १२ तास भिजत ठेवावा. ते पाणी सकाळ  सायंकाळ प्यावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २३ मे
१८९६ > मराठी नाटय़संगीतात शब्दप्रधान गायकीचे मन्वंतर घडविणारे संगीत  (नाटक: आंधळय़ांची शाळा) देणारे संगीतकार केशवराव वामन भोळे यांचा जन्म. एकलव्य आणि शुद्धसारंग या टोपणनावांनी त्यांनी लेखन केले, त्याची संगीताचे मानकरी, आवाजाची दुनिया, अस्ताई, अंतरा, माझे संगीत, वसंतकाकांची पत्रे आणि जे आठवते ते अशी विपुल पुस्तके प्रसिद्ध झाली होती.  
१९०९ > कवी, ललितगद्य लेखक नारायण माधव संत यांचा जन्म. ‘सहवास’ हा त्यांचा काव्यसंग्रह कवयित्री-पत्नी इंदिरा संत यांच्यासह होता. ‘उघडे लिफाफे’ हा त्यांचा लघुनिबंध संग्रह सौंदर्यवादी वृत्तीचे दर्शन घडवतो. ३७व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले.
१९४० > राज्यशास्त्राचे अभ्यासक, लेखक रामचंद्र गणेश प्रधान यांचे निधन. राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले असता तेथील वृत्तपत्रांत त्यांनी भारतीय राजकारणाविषयी लिखाण केले, त्यानंतर ‘इंडियाज स्ट्रगल फॉर स्वराज’ हा ग्रंथ गाजला. मराठीत ‘प्रतिनिधीसत्ताक राज्य पद्धती’, ‘प्लेटो व त्याचे राजकीय विचार’ ही पुस्तके त्यांनी लिहिली व ‘मोनाव्हेना’ या नाटकाचे ‘विमलादेवी’ हे रूपांतरही केले (पुढे याच नाटकाचे वि. वा. शिरवाडकरकृत ‘वैजयंती’ हे रूपांतर रंगभूमीवर गाजले!)  
– संजय वझरेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water conservation

ताज्या बातम्या