22 January 2021

News Flash

परिसर विज्ञानाची संस्कृती आणि साक्षरता!

१९७१ मध्ये मोना आणि तिचा नवरा पिटर यांनी ही उंच-सखल अशी ओबडधोबड दगडांनी भरलेली जागा घरासाठी विकत घेतली

मोना पेत्राव

उष:प्रभा पागे  ushaprabhapage@gmail.com

पाचगणी आणि महाबळेश्वर या पश्चिम घाटातील दोन गिरीस्थानांच्या मध्ये ‘रेड स्टोन इको पार्क’ वसले आहे.  या पार्क मुळे इथल्या जमिनीमध्ये सेंद्रिय शेती रुजली आहे. हे पार्क सुरू करणारी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली मोना पेत्राव शाश्वत निसर्गस्नेही जीवनशैलीचे आदर्श प्रतिमान आहे. आपल्याबरोबर आपल्या भोवतीचा समाजही प्रगत व्हावा याची तिला कळकळ आहे.

महाबळेश्वरकडे जाताना पाचगणीपासून ६ किमी. अंतरावर रस्त्याच्या डावीकडे, लाल फाटक आणि रस्त्याला काटकोनात ‘रेड स्टोन इको सेंटर’ची लाकडी पाटी आहे तिथून जांभ्याच्या लाल दगडांची वाट वळत, पायऱ्या चढून जुन्या वळणाच्या इंग्लिश बंगलीकडे जाते, पायऱ्या चढताना उजवीकडे गोठय़ातील गाय हंबरते, कुत्र्याला जणू ती वर्दी मिळते, वर गेले की तेही अंगावर लाडाने झेप घेते, तोवर मोना हसतमुखाने पुढे येऊन स्वागत करते. पाहुणा कोणीही असो मोनाचे घर स्वागतशीलच आहे. तिने शाश्वत ‘शेती आणि जीवन शैलीचा’ वसा घेतला आहे.

येणाऱ्या कोणाही जिज्ञासूला इथल्या निसर्गस्नेही घरात, लगतच्या शेतात याचा प्रत्यय येतो. १९७१ मध्ये मोना आणि तिचा नवरा पिटर यांनी ही उंच-सखल अशी ओबडधोबड दगडांनी भरलेली जागा घरासाठी विकत घेतली. स्थानिक निसर्गसामग्रीचाच उपयोग करायचा हे मूल्य उराशी बाळगून, जोडप्याने दगड, माती, लाकूड आणि काच या सामग्रीतून प्रशस्त घर बांधले. या ओसाड जागेवर झाडे लावली आणि शेतीची आवड असल्याने दोघांनी शेती सुरू केली. ‘रेड स्टोन इको पार्क’मुळे इथल्या जमिनीमध्ये सेंद्रिय शेती रुजली आहेत.

पाचगणी आणि महाबळेश्वर या पश्चिम घाटातील दोन गिरीस्थानांच्या मध्ये ते वसले आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आकाराने मोठ्ठे पठार या घर-शेताच्या पाठीशी पसरले आहे. तिथे काही भागांत जंगल आहे, झाडी आहे, तळे आहे, झरे आहेत खाली नदीचे खोरे आहे, गवताळ  कुरणे आहेत, उतारावर टुमदार खेडी आहेत, शेते आहेत, पावसाळ्यात जमिनीवर विविध वनस्पतींची श्रीमंती आणि वर ढगांचे आच्छादान, शिरशिरी आणणारा गारठा, पक्षी आणि प्राणीसृष्टीचा अभय प्रदेश असलेला हा भाग स्वप्नभूमी बनतो, विविध परिसर प्रणाली इथे नांदताहेत आणि मोनाच्या बंगलीत उबदार वातावरण आहे. इथली घर बांधणी निसर्गाशी नाते जोडते. इथले अन्न, फळे, भाज्या, पेये आरोग्यपूरक आहेत. इथली सेंद्रिय स्ट्रॉबेरी भले आकाराने लहान असेल पण चव विसरत नाही आपण तिची! तीच गोष्ट सॅलड, भाजीपाला, शेंगा, मटार, टोमॅटो, बटाटे यांची. शेताला कुंपण तेही जिवंत! शिकेकाईच्या वेलांचे. कारण त्यावरही प्राणीसृष्टी जोपासते. शिवाय शिकेकाई औषधी, निर्मलकाचे काम करते. त्यातील रसायने बाजारातील कृत्रिम घातक रसायनांच्या तुलनेत सरस, कारण ती घातक नाहीत. मोना वर्षांनुवर्षे संडास, मोऱ्या, बेसिन यांच्या स्वच्छतेसाठी शिकेकाईचे द्रावण वापरते. स्वावलंबन हा तिचा मंत्र आहे. आपल्या गरजा शक्यतो शेतीतून पूर्ण होणे तिला आवश्यक वाटते. आंबा, पेरू, पपई, जांभूळ, अ‍ॅवाकाडो, जाम, लिंबू यांची झाडे तिने लावली आहेत. देशी गुलाब तिच्याकडे आहे, ती त्याचा गुलकंद करते. पॅशन फ्रुट, रानजाई अशा कितीतरी लतावेली तिने लावल्या आहेत. देशी झाडे लावण्याकडे तिचा कल आहे.

आज ओला आणि सुका कचरा-प्लॅस्टिक वेगळे करणे अनिवार्य झाले आहे. मोना कितीतरी वर्षे कचरा वेगळा करून त्याचे खतात रूपांतर करते आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके वापरणे ती टाळते. त्याऐवजी ती जैविकखते, शेणखत वापरते. यामुळे जमिनीची सुपिकता टिकून राहते. या शाश्वत शेतीमध्ये निसर्गातील अन्य जीवसृष्टीची म्हणजे कीटक, बेडूक, कोळी, पक्षी यांचीही वाढ होते. त्यामुळे कीड नियंत्रण होतेच की. विशेष म्हणजे मोनाने शेणखतासाठी गेली काही वर्षे गाय पाळली आहे. शेणखतही मिळते आणि जैविक इंधन-बायोगॅसही मिळतो. घर मोठे, खोल्या अनेक त्यामुळे तिने घरात अतिथिगृह- ‘होम स्टे’ केले आहेत. त्याचा मुख्य उद्देश पैसे मिळवणे हा नसून लोकांपुढे शाश्वत जीवनशैलीचे, सेंद्रिय शेतीचे अभिरूप-मॉडेल ठेवणे हाच आहे. आपल्याबरोबर आपल्या भोवतीचा समाजही प्रगत व्हावा याची तिला कळकळ आहे.

कचऱ्याचे नियोजन कसे करायचे, नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर संयमाने कसा करायचा, जबाबदार नागरिक बनणे अशा अनेक गोष्टी सुरुवातीला ती शाळांमध्ये जाऊन आवर्जून सांगत असे. जवळच्या शेतकऱ्यांना ती सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे याविषयी सांगायची. स्त्रियांमध्ये जाऊन पर्यावरणाविषयी जाणीव जागृती करायची. त्यांच्या कलांना ती नेहमीच उत्तेजन देते. खेडय़ातील लोकांमध्ये असलेल्या परंपरागत ज्ञानाचा ती आदर करते. त्यांच्याकडूनही शेती, जमीन, पाणी याविषयीचे त्यांचे अनुभव ऐकण्याची त्यातून चांगल्या गोष्टी शिकण्याची तिची तयारी असते. म्हणूनच शेतकरी दरवर्षी रान जाळतात त्यामागचा कार्यकारणभाव ती समजून घेते. रान न जाळता चारा पिके घ्यायला ती सांगते. तिची भूमिका सकारात्मक असते. तोडण्यावर नाही तर जोडण्यावर तिचा भर आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरात लोक तिचा आदर करतात.

या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणे हा मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी मातृरोप हे देशी असायचे आणि जैविक खते शेतकरी घालायचे. पण मधल्या काळात अमेरिकेतून मातृरोपे येऊ लागली, त्याचे उत्पादन भरघोस येते, फळ ही मोठे असते. मात्र त्याला भरपूर रासायनिक खते लागतात आणि मातृरोपांसाठी  शेतकरी आता विदेशी कंपन्यांवर अवलंबून आहेत, या गोष्टी तिला खटकतात. मोना स्ट्रॉबेरीसाठी देशी वाण वापरते आणि पिके बदलून लावते. त्यामुळे जमिनीची प्रत खालावत नाही.

लग्न झाले तेव्हा मोना होती फक्त १८ वर्षांची. पिटरच्या प्रेमात बुडालेली. तो तिच्याहून १४ वर्षांनी मोठा होता. मोना त्याच्या छायेखाली होती. तो म्हणेल ते तिला मान्य असे. कालांतराने मोनाला शेतीतून अनुभव मिळाला. तिचे विचार पक्व झाले. त्यामुळे सेंद्रिय शेती करण्यावर ती ठाम राहिली.

शिक्षण हा त्याचा आवडीचा विषय होता तसा मोनाच्याही आवडीचा. पण संदर्भहीन आणि मुलांच्या स्वतंत्र कल्पनांना वाव न देणारे प्रचलित शिक्षण दोघांनाही मान्य नव्हते. मोनाने तर स्वत:पुरते याविरुद्ध बंड केले. प्रचलित कॉलेज शिक्षण सोडून देऊन शेती करण्यासाठी ती घरी परतली. ‘जीवन आणि शिक्षण’ किंवा ‘जीवनाभिमुख शिक्षण’ याविषयी गांधीजीचा ‘मूलगामी शिक्षण विचार’ आणि टागोरांनी केलेले निसर्गातून शिक्षणाचे प्रयोग याचा अभ्यास मोनाने केला. लहान मुलांचे शिक्षण याविषयी तिने अभ्यासक्रम पूर्ण केला. पाश्चिमात्य शिक्षणतज्ज्ञांचे अनौपचारिक शिक्षणाविषयीचे विचार जाणून घेऊन मोना आणि पिटर दोघांनी ‘होम स्कूल’ ही कल्पना प्रत्यक्षात आणली. त्यामागील उद्देश होता मुलांचे बालपण आनंदी आणि मजेचे असावे. मुलांच्या प्रयोगशीलतेला आणि नावीन्याचा शोध घ्यायच्या वृत्तीला अनुकूल वातावरण देणे, लहानांना आणि मोठय़ांनाही मोकळेपणा देणे, त्यांच्यावर कोणतेही बंधन नको. मूल केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यामध्ये अनुभवातून शिकत जायचे संस्कार रुजवणे. परिसर विज्ञानाला पोषक असणारी मूल्ये विकसित करणे. यातूनही विद्यापीठीय उत्तमता मिळवता येते हे सिद्ध करणे. असा हेतू यामागे होता. एव्हाना त्यांची मुलगी शाळेत घालायच्या वयाची झाली होतीच. १९९८ पासून ३ वर्षे त्यांनी घरात शाळा म्हणजे ‘होम स्कूिलग’चा प्रयोग केला. ‘परिसर शास्त्र’ हा मुख्य धागा पकडून शेती, इतिहास, भूगोल, प्रयोगातून विज्ञान आणि मानव्याच्या पातळीवरचे सुयोग्य तंत्रज्ञान हे आणि अनुषंगिक विषय मुले भवतालातून आणि शेतीतील कामातून शिकतात हे महत्त्वाचे. मुलांच्या निर्मिती क्षमतेला, त्यांना अभिव्यक्त व्हायला यात वाव होता. सर्व थरातील मुलांना यात समान संधी असावी हाही मोनाचा कटाक्ष होता. परिसराविषयी अंतर्बाह्य़ संवेदना निर्माण करणे हे यामागील सूत्र होते.

सामाजिक न्यायाविषयी मोना कमालीची जागरूक आणि संवेदनशील आहे. शोषितांविषयी तिला विशेष जिव्हाळा आहे. काच, कचरा, कागद गोळा करणाऱ्या कष्टकरी मुलांचे, बोरिवली नॅशनल पार्क लगत राहणाऱ्या वारली लोकांचे प्रश्न तिने अभ्यासले. त्यातून अनेक सामाजिक राजकीय विरोधाभास तिच्या लक्षात आले. मेधा पाटकर यांच्या नर्मदा आंदोलनात ती पर्यावरणीय हितासाठी काही काळ सामील झाली होती. अणुमुक्ती आंदोलनात आणि झोपडपट्टीतील लोकांनी घरांसाठी केलेल्या ‘निवारा हक्क’ चळवळीतही ती होती. पण काही काळाने तिच्या मनाने कौल दिला की सांप्रदायिक आणि राजकीय चळवळी हा आपला प्रांत नाही. यातली नकारात्मकता तिला आवडली नाही. तिने आपली मर्यादा आखून घेतली- आपल्या भोवतीचे पर्यावरण आणि सेंद्रिय शेती! शेतीच्या अनेक पद्धतींचा तिने अभ्यास केला. प्रयोग केले. ैढी१ें ू४’३४१ी पद्धतीची शेती तिला पटते कारण ती निसर्गानुकूल आहे. आरोग्य हाही तिचा आवडीचा विषय.. तिने आहारशास्त्र, होमिओपॅथी, आयुर्वेद यांचाही अभ्यास केला.

आधीच्या काळात जेव्हा कचरा प्रश्नाची लोकांना आणि शासनाला निकड वाटत नव्हती तेव्हापासून ती पाचगणीच्या नगर परिषदेत जाऊन ओला-सुका कचरा वेगळा करा, खत करा, प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्याविषयी सातत्याने पाठपुरावा करत होती. शाळेतील मुलांच्या, खेडय़ातील स्त्रियांच्या मेळाव्यात ती कचऱ्याचे नियोजन कसे करायचे हे सांगायची. स्वच्छ भारत अभियान असे तिच्या पातळीवर ती करत होती. तिचे प्रयत्न रुजत होते. काही वर्षांनी त्याला गोमटे फळ मिळाले-यंदा पाचगणी नगरपरिषदेला पंतप्रधांनांचा स्वच्छता पुरस्कार आणि पुढील योजनांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मिळाला.

मोनाच्या सेंद्रिय शेती आणि निसर्गस्नेही, शाश्वत जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी अनेक होतकरू तरुण तिच्याकडे येतात, काही काळ राहून शेतात काम करतात. या कामामुळे त्यांना एक वेगळी दिशा मिळाली असे आवर्जून कळवतात. सेंद्रिय शेतीतील कार्यानुभव घ्यायला तर परदेशातूनही तरुण-तरुणी येतात. मोना त्यांच्या राहण्या-जेवणाची सोय स्वखर्चाने करते. मोनाचे पारशी आई-वडील तिच्या लहानपणीच मुंबई सोडून महाबळेश्वरला आले. वेण्णा लेकमध्ये प्रथमच नौका चालविण्याचे कंत्राट त्यांनी घेतले. वेण्णा काठाची वन खात्याची जमीन त्यांनी दीर्घ मुदतीच्या कराराने घेतली. मोनाला तीन मोठे भाऊ, मोना धाकटी. या सर्वाचे बालपण वेण्णा तलावाकाठी जंगलात गेले. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीचा सर्व परिसर, निसर्ग-स्थळे तळहातावरील रेषांसारखी तिला पाठ आहेत. ती निसर्ग शिबिरे, सेंद्रिय शेती शिबिरे घेते. पिटर यांचे २०१२ मध्ये निधन झाले. पण मोनाचा कर्मयोग सुरू आहे. ती स्वत: गायींना चरायला सोडते, संध्याकाळी परत आणून गोठय़ात बांधते. आल्यागेल्यांचे अगत्य, अभ्यासूंना मार्गदर्शन, शेतकाम, योग, चिंतन-मनन, भवताल यात रमते. तिच्या दोन मुली अधूनमधून येऊन जातात. ६५ वर्षांची, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली मोना पेत्राव शाश्वत निसर्गस्नेही जीवनशैलीचे आदर्श प्रतिमान आहे.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 1:01 am

Web Title: article on mona patrao pioneered of organic farming in panchgani
Next Stories
1 अनामलैचा निसर्गठेवा
2 संशोधन उपद्रवी वनस्पतींचे!
3 बंधाऱ्यांनी केली किमया!
Just Now!
X