जोय निसर्गप्रेमी, चित्रकार आणि लेखक होती. जोय अ‍ॅडमसनचे ‘बोर्न फ्री’ हे पुस्तक १९६० मध्ये प्रसिद्ध झालं आणि त्याला उदंड लोकप्रियता मिळाली. या पुस्तकाने जंगलातील प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. आफ्रिकेतील वन्यप्राण्यांच्या संरक्षण संवर्धनाचा पायाच तिने घातला. तिचे काम हा आफ्रिकेतील वन्यजीव संवर्धनातील मैलाचा दगड आहे.

‘बोर्न फ्री’ ही आफ्रिकेच्या जंगलातील एका सिंहिणीची गोष्ट आहे. कल्पित नव्हे, सत्य. जोय अ‍ॅडमसनचे ‘बोर्न फ्री’ हे पुस्तक १९६० मध्ये प्रसिद्ध झालं आणि त्याला उदंड लोकप्रियता मिळाली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या लोकप्रिय पुस्तकांच्या यादीत ते वर्षभर होते. ३५ हून अधिक भाषांत त्याचा अनुवाद झाला. त्यावरील चित्रपटही लोकप्रिय झाला. या पुस्तकाने जंगलातील प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. आफ्रिकेतील वन्यप्राण्यांच्या संरक्षण संवर्धनाचा पायाच तिने घातला. ‘बोर्न फ्री’ चित्रपटात काम केलेल्या बिल ट्रावर्स आणि त्याची पत्नी हे दोघे जोयच्या वन्यप्राण्यांवरील प्रेमाने एवढे प्रभावित झाले की त्यांनी वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी ‘बोर्न फ्री फाऊंडेशन’ची स्थापन केली. तर डग्लस हॅमिल्टनने आफ्रिकेतील जंगली हत्तींची शिकार आणि तस्करीविरोधात लढा दिला.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

जोय निसर्गप्रेमी, चित्रकार आणि लेखक होती. २० जानेवारी १९१० मध्ये ऑस्ट्रिया देशातील सिलेसियामध्ये तिचा जन्म झाला.. तिचे वडील वास्तुविशारद होते. त्यांच्या ३ मुलींमधली फ्रिडरिक- (जोय) मधली. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर १०व्या वर्षी ती आजीकडे आली आणि तिथे मोठी झाली. तरुण वयात एकदा खेळ म्हणून तिने एक हरीण मारले खरे पण त्याचे तिला फार दु:ख वाटले आणि प्राण्यांच्या जीवाशी असा खेळ न करण्याचे तिने ठरवून टाकले. त्याच वेळी नियतीने जणू काही वन्यजीवांची कैवारी अशी तिची प्रतिमा पक्की केली असावी. १९३५ मध्ये तिचे लग्न एका ज्यू तरुणाशी झाले. ऑस्ट्रियामध्ये त्यावेळी नाझी चळवळीचा जोर होता. त्याची झळ लागू नये म्हणून तिच्या नवऱ्याने आफ्रिकेत जायचे ठरवले. तिला आधी पुढे पाठवून नंतर तो येणार होता. दरम्यान, बोटीवरच्या प्रवासात तिची ओळख पीटर बालीशी झाली. पीटर वनस्पतीशास्त्रज्ञ होता. त्यांचे सूरही जुळले. शिवाय आफ्रिका देश, तिथले जीवन तिला आवडू लागले होते. नवरा आफ्रिकेला आला की त्यापासून विभक्त होऊन पीटरशी लग्न करायचे तिने नक्की केले. त्याप्रमाणे १९३७ मध्ये ती पीटरशी विवाहबद्ध झाली. केनियात वनस्पती सृष्टीचा अभ्यास करण्यासाठी, फुलापानांचे नमुने गोळा करण्यासाठी पीटर खूप हिंडायचा, जोय त्याला साथ द्यायची, या काळात तिने ७०० चित्रे काढली. पीटर तिला ‘जोय’ म्हणायचा. तेच नाव कायम झाले.

एव्हाना आफ्रिकेतील बहुविध वन्यप्राण्यांचे आकर्षण तिला वाटू लागले होते. तिची ओळख जॉर्ज अ‍ॅडमसन या केनियाच्या जंगलातील वन्यजीव संरक्षकाशी झाली. पीटरपासून वेगळी होऊन तिने जॉर्जशी १९४५ मध्ये लग्न केले. सुरुवातीची काही वर्षे जॉर्ज काम करत असलेल्या पूर्व आफ्रिकेतील जंगलात त्यांनी खूप भटकंती केली. या काळात रानटी प्राणी आणि जंगलातील मूळ आदिवासी आणि प्राण्यांची बेकायदा शिकार करणारे तस्कर यांचा प्रदीर्घ असा अनुभव जोयला मिळाला. आफ्रिकेच्या जंगलात वन्यप्राण्यांना सर्वात जास्त धोका तस्करांचा होता.

१९५६ मधील तो दिवस मनुष्य आणि सिंहासारख्या रानटी प्राण्यांच्या परस्पर नात्याला नवे वळण देणारा ठरणार होता. जंगलात गस्त घालणाऱ्या जॉर्जच्या अंगावर एक सिंहीण धावून आली. जीव वाचविण्यासाठी जॉर्जने तिच्यावर बंदूक चालवली आणि सिंहीण ठार झाली. जवळच्या खडकाच्या सापटीत तिची तीन पिल्ले होती. आईशिवाय ही पोरकी पिल्लं मरणार हे दिसल्यावर जॉर्जने ती पिल्ले कॅम्पवर आणली. तीन पिल्ले सांभाळणे अशक्य असल्याने त्यातील छोटे पिल्लू सांभाळावे असे जॉर्ज आणि जोयने ठरवले. या मादी पिल्लाचे नाव ठेवले एल्सा. बाकीची दोन पिल्ले रोटरदामच्या झूमध्ये पाठवली गेली. जोय आणि जॉर्जच एल्साचे आई-बाबा झाले. एक वर्षभर एल्सा यांच्याकडे होती. त्या काळात तिला शिकार कशी करायची, आपले भक्ष्य आपण कसे मिळवायचे हे सगळे प्रशिक्षण जॉर्ज आणि जोय दोघांनी मिळून एल्साला दिले. तिची परीक्षा घेण्यासाठी तिला एक आठवडा जंगलात सोडले. एल्साने स्वतंत्रपणे हरीण मारले आणि जोयचा जीव भांडय़ात पडला.

सिंहिणीच्या या आईवेगळ्या पिल्लाची जोया आई झाली. एल्सा पुरेशी मोठी झाली, तेव्हा त्यांनी तिला जंगलात सोडले. त्यांचे काही दिवस चिंतेत गेले. एल्सा कधीतरी दिसायची, ओळख दाखवायची. मग तो आनंदाचा दिवस उगवला. एव्हाना लेकुरवाळी झालेली एल्सा आपल्या तीन बछडय़ांना घेऊन आपल्या माहेरी आईकडे- जोयकडे आली आणि पिल्लांना तिने जोय पुढे टाकले. तेव्हा जोयच्या आनंदाला पारावार राहिला नाही. वन्य जगामध्ये हा पहिलाच प्रयोग होता. एल्सा पुनर्वसन झालेली पहिली सिंहीण ठरली. दुसरे म्हणजे एल्साने मानवी भावभावनांची बूज ठेवली. एल्सा स्वत: आई झाल्यावरही तिने जोयविषयी केवढा विश्वास दाखविला. सिंहीण असलेल्या एल्साची सारी प्राणी वैशिष्टय़े जोयनी अभ्यासली होती. मानवी नात्याची जाण आणि ओळख तिने ठेवली हे जोयच्या परिश्रमाचे आणि प्रेमाचे फळ होते. जोयने एल्साच्या पिल्लांना जंगलातच वाढू दिले. फोटो काढण्यापुरती फक्त ती त्यांच्या जवळ जात असे. १९६१मध्ये पिसू चावून झालेल्या आजारामुळे एल्साचे मरण ओढवले. तिची तीन पिल्ले मोठी झाली. पण त्यांचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकऱ्यांकडून त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून त्यांना पकडून जॉर्जने टांझानियाच्या सेरेगेटी राष्ट्रीय उद्यानात सोडले.

एल्साची ही सगळी चित्रमय कथा ‘बोर्न फ्री’ या पुस्तकात जोयने सांगितली आहे. यानंतरचे तिचे पुस्तक आहे ते ‘लिविंग फ्री’. एल्सा आणि तिची पिल्ले यांची हकिगत त्यात आली आहे. पिल्लांना एल्सा कशी वाढवते हे जोय जवळून पाहत होती. तिच्यातील वात्सल्यभाव, तिची स्वभाव वैशिष्टय़े पिल्लात कशी उतरतात त्याचे वर्णन यात आहे. ‘फॉर एवर फ्री’ या तिसऱ्या पुस्तकात एल्साच्या तीन पिल्लांच्या सुरक्षित पुनर्वसनाची हकिगत सांगितली आहे. या तीन पुस्तकांमुळे वन्यजीवांच्या संवर्धनाच्या कामाला गती मिळाली. त्यानंतर या पुस्तकातून मिळालेला सर्व पैसा तिने वन्यजीव संरक्षणासाठी देऊ केला.

एल्साचे पुनर्वसन हा जोय आणि जॉर्जना जोडणारा दुवा होता. तो राहिला नाही. जॉर्जला जंगलातच वनसंरक्षक राहून सिंहांचा अभ्यास करायचा होता. दोघांचे मार्ग बदलले. मात्र शेवटपर्यंत त्यांचे संबंध मैत्रीचे राहिले. जोयला आता भाषणे देण्यासाठी अनेक ठिकाणी जावे लागे. ब्रिटिश टेलिव्हिजनवर अनेक कार्यक्रमात तिचा सहभाग असे. वन्यप्राणी संवर्धनासाठी तिने ‘एल्सा वाइल्ड लाइफ अपील’ नावाची संस्था सुरू केली. एका ब्रिटिश मेजरने आपला पाळलेला मादी चित्ता तिला भेट म्हणून दिला. या मादीच्या चार विणी झाल्या. त्याची हकिगत तिने  The spotted sphinx या पुस्तकात लिहिली आहे. बिबटय़ा पाळायचे कित्येक दिवसाचे तिचे स्वप्न होते. तेही पुरे झाले. त्या मादीला ‘पेनी’ला २ पिल्ले झाली. त्या अनुभवावर जोयने Queen of Shaba हे पुस्तक लिहिले. तिच्या मृत्यूनंतर ते प्रसिद्ध झाले. जोय उत्तम चित्रकार होती. वेळोवेळी तिने कितीतरी रेखाटणे केली, आफ्रिकेतील माणसे, लोकजीवन, निसर्गदृश्ये, एल्सा, वन्यप्राणी हे तिचे चित्रांचे विषय होते. तिच्या चित्रांचे पुस्तकही तिने केले होते.

३ जानेवारी १९८० हा दिवस जोयसाठी अत्यंत दुर्दैवी ठरला. नेहमीप्रमाणे ती संध्याकाळी ‘शाबा’च्या राष्ट्रीय राखीव पार्कच्या परिसरात फिरायला गेली ती परतलीच नाही. तिच्या एका माजी नोकराने पूर्ववैमनस्यातून तिची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याला त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा झाली. एका खंद्या वन्यप्राणी संरक्षकाचा असा दुर्दैवी शेवट झाला. सारे जग हळहळले. तिच्या मृत्यूपूर्वी १९७७मध्ये ‘ऑस्ट्रियन क्रॉस ऑफ ओनर फॉर सायन्स अँड आर्ट’ हा सन्मान तिला मिळाला होता. तिचे काम हा आफ्रिकेतील वन्यजीव संवर्धनातील मैलाचा दगड आहे हे नक्की.

उष:प्रभा पागे ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com