राचेल कार्सन लेखक होती, जल जीवशास्त्रज्ञही होती. निसर्गवादी, पर्यावरणाची कैवारी होती. तिच्या अभ्यासाचा परिणाम म्हणून अमेरिकेने डीडीटीच्या शेतीमधील उपयोगावर बंदी आणली. तिच्या कामगिरीचा गौरव म्हणून ‘वाइल्ड लाइफ रेफ्युजी’ची निर्मिती झाली त्यावरचं घोषवाक्य आहे- हिरवाई इथे जन्मली.

राचेल कार्सन ही जागतिक पर्यावरण चळवळीची उद्गाता होती. माणसाची सृष्टीतील इतर सजीवांविषयी जाणीव आणि त्याबद्दलच्या जबाबदारीचे भान तिने जागृत केले. इकॉलॉजी- द स्टडी ऑफ अवर लिविंग प्लेस- या संकल्पनेचा वेगळाच पैलू तिने सर्वसामान्यांच्या समोर आणला. समुद्रातील जीवशास्त्रीय बारकाव्यांचा अभ्यास आणि नोंद ठेवून मानवाचे निसर्ग सृष्टीशी असलेले नाते तिने संवेदनशील शैलीमध्ये आपल्या पुस्तकांमधून दाखवले. ती लेखक होती तशी जल जीवशास्त्रज्ञही होती. निसर्गवादी, पर्यावरणाची कैवारी होती.

घातक रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यामुळे निसर्गप्रणालीला कसा धोका आहे हे तिने नि:संदिग्ध शब्दात मांडले. रासायनिक उत्पादने करणाऱ्या हितसंबंधी लोकांचा टोकाचा विरोध तिला झाला. पण सामान्य अमेरिकी नागरिकाचे डोळे त्यामुळे उघडले, मुख्य म्हणजे राज्य प्रशासनाला त्यांच्या धोरणात बदल करावा लागला. त्याचा परिणाम म्हणून दोन महत्त्वाचे बदल अमेरिकेने केले. एक म्हणजे ‘युनायटेड स्टेट्स एन्व्हायर्न्मेंटल प्रोटेक्शन एजन्सी’ची स्थापना आणि डीडीटीच्या शेतीमधील उपयोगावर आलेली बंदी. मात्र हे दोन्ही चांगले बदल झाले ते तिच्या मृत्यूनंतर.

राचेल कार्सनच्या आयुष्याचा पट अतिशय वेधक आहे, पर्यावरणासाठी तिने दिलेल्या लढय़ाचा आणि जीवनाची सुरुवात जिथे झाली त्या सागराचा तो इतिहासही आहे. अमेरिकेच्या पेनसिल्वानिया राज्यातील स्प्रिंगडेल या गावी शेतावर राहणाऱ्या कुटुंबात राचेलचा जन्म २७ मे १९०७ ला झाला. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची ६५ एकर जमीन होती. शेत, नदी, जंगल, ओढे अशा नैसर्गिक वातावरणात ती वाढल्यामुळे निसर्ग आणि वन्य जीवनाविषयी तिला माहिती होती. १९२५ मध्ये वयाच्या १८व्या वर्षी ती स्त्रियांच्या कॉलेजमध्ये दाखल झाली. जीवशास्त्र हा विषय अभ्यासासाठी निवडला. उन्हाळी सुट्टीमध्ये अमेरिकन मरीन लॅब्रॉटरीची उन्हाळी शिष्यवृत्ती तसेच जॉन हापकिन युनिव्हर्सिटी बाल्टिमोरची मानाची शिष्यवृत्ती तिला मिळाली. तिला यू.एस. फिशरीज ब्युरोमध्ये अर्ध वेळ काम मिळाले. ‘रोमान्स अण्डर द वॉटर’ अशी रेडियोसाठी कार्यक्रम मालिकेची निर्मिती तिने केली. शिवाय ती वृत्तपत्र आणि मासिके यासाठी लिखाण ही करत होती. त्याचा रोख ‘विनाशकारी शोधांवर नियंत्रण असावे आणि समुद्री जीव-मासे-तसेच मच्छीमार यांच्या हिताला प्राधान्य असावे’ अशा आशयाचे असत. यथाकाळ ‘ब्युरो ऑफ फिशरीज’मध्ये जलजीव शास्त्रज्ञ म्हणून तिची नेमणूक झाली. नौदलाच्या ‘पानडुबी तांत्रिक संशोधन आणि सामग्री निर्माण’ विभागात समुद्रातील ध्वनी, सजीव सृष्टीचे जीवन आणि सागरीक्षेत्र संशोधनात तिचा सहभाग होता.

‘अण्डर द सी वर्ल्ड’ हे तिचे पहिले पुस्तक १९४१ मध्ये प्रसिद्ध झाले. ते लोकप्रिय झाले. यामुळे तिची अमेरिकेच्या नवनिर्मित ‘फिश अ‍ॅण्ड वाइल्ड लाइफ सव्‍‌र्हिस’मध्ये पदोन्नती झाली. ‘फूड फ्रॉम द सी’ या लेखमालेत तिने माशांची आहारातील उपयुक्तता आणि त्यांचे विविध खाद्यपदार्थ कसे बनवावेत याची माहिती दिली. १९५१ मध्ये राचेलचे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. ‘सी अराऊंड अस’. उत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक ८१ आठवडे राहिले होते. ३२ भाषांमध्ये याचे भाषांतर झाले. यानंतर मात्र नोकरी सोडून पूर्ण वेळ लेखनाला द्यायचे तिने ठरवले. १९५३ मध्ये अटलांटिक समुद्रकिनाऱ्याची प्राणिसृष्टी, तेथील निसर्गप्रणाली आणि पर्यावरण याचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तिने संशोधन केले. त्यावरील ‘द एज ऑफ द सी’ हे तिचे समुद्रावरील तिसरे पुस्तक १९५५ मध्ये प्रकाशित झाले. मानवेतर इतर सजीवांविषयी संवेदनशील असण्याची गरज आणि जबाबदारीची जाणीव या पुस्तकातून होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर कृत्रिम रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर होऊ लागला. १९४५ पासून डीडीटीचा शेती उद्योगात सर्रास वापर होऊ लागला. राचेल ‘फिश अ‍ॅण्ड वाइल्ड लाइफ सव्‍‌र्हिस’मध्ये काम करत होती. डीडीटी आणि एकूणच रसायनांच्या वापराचे जलचरावर काय दुष्परिणाम होतात त्याची नोंद शास्त्रज्ञ या नात्याने ती ठेवत होती. पण रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा शेतीमधे वापर करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी होती. त्या विरोधी काही सांगणे म्हणजे त्यांचा रोष ओढवणं होतं पण तिने ठरवले ‘घातक रसायनांचे पर्यावरणावर होणारे अनिष्ट परिणाम लोकांपुढे आणायचे’. अमेरिकन संघराज्याचे धोरण कीटकनाशकांच्या वापराचे होते, पण त्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर त्याची जाणीव लोकांना करून देणे तिला अगत्याचे वाटले. समकालीन शास्त्रज्ञांचा एक गट कीटकनाशकांच्या दुष्परिणामांचा अभ्यास करत होता त्याचे निष्कर्ष राचेलशी मिळतेजुळते होते. काहींचे म्हणणे असे होते की सबळ पुराव्याखेरीज कीटकनाशकांवर बंदी कशी आणायची? राचेलने याची तड लावायचे ठरविले. नोकरी सोडून ती स्वतंत्रपणे लेखन करू लागली होतीच. तिची समुद्रावरील तीन पुस्तके लोकांना आवडली होती. आर्थिक दृष्टीने ती स्वतंत्र होती. आपले निष्कर्ष पुस्तक रूपात मांडायचे ठरवून त्यासाठी तिने अमेरिका-युरोपमध्ये प्रदीर्घ संशोधन केले. लेखनाला सुरुवात केली. सृष्टीतील प्रदूषणाचा प्रश्न मोठा गंभीर आहे, ही समस्या खरे तर आपल्या नैतिक जबाबदारीची आहे. ती आपल्या पिढीपुरती मर्यादित नाही तर भावी पिढीविषयी पण आहे. हे विचार ती वेळोवेळी मांडत होती. समाजाच्या कळकळीपोटी तिने निसर्ग प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध आघाडी उघडली.

Atanantic Naturalist या मासिकाची संपादक शर्ली बिग्ज तिच्या मदतीला आली. डीडीटी वरील जे संशोधन सामान्य लोकांपासून दडवून ठेवले होते ते तिने राचेलला पुरवले. Silent Spring हे राचेलचे पुस्तक १९६२ मध्ये प्रकाशित झाले. घातक कीटकनाशकांचा निसर्गप्रणालीला कसा धोका आहे हे तिने सुस्पष्टपणे यात मांडले होते. हे सांगणे फार धाडसाचे होते. पण यात तिचा दृष्टिकोन हा विघातक नसून विधायक होता. मात्र रसायननिर्मिती आणि विक्री करणाऱ्या लोकांच्या आर्थिक हितसंबंधांना यामुळे बाधा येणार होती. रसायन कंपन्यांनी तिच्याविरुद्ध जोरदार आघाडी उघडली तिच्या वैयक्तिक चारित्र्यावर शिंतोडे उडवले, तिच्या व्यावसायिक निष्ठेविषयी शंका व्यक्त केल्या गेल्या. पण फेडरल सरकारला या पुस्तकाची दखल घ्यावीच लागली. त्यांना आपल्या धोरणांचा पुनर्विचार करणे भाग पडले. त्याचा परिणाम म्हणजे पुढे १९७० मध्ये अमेरिकेने डीडीटीच्या शेतीतील वापरावर बंदी आणली. पण राचेलच्या मृत्यूनंतरची ही घटना.

निसर्गाविषयी आणि सजीव सृष्टीविषयी राचेलला अतिशय जिव्हाळा, आत्मीयता होती. तिला हा वारसा तिच्या आईकडून मिळाला होता.  सिल्वरस्प्रिंग मेरिलंड इथे १४ एप्रिल १९६४ या दिवशी कर्करोगाने तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या हस्ते अध्यक्षीय फ्रीडम मेडल सन्मानाने तिच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यालगत मेन या ठिकाणी ५३०० एकरात राचेल कार्सनच्या स्मरणार्थ ‘वाइल्ड लाइफ रेफ्युजी’ किंवा अभयारण्याची निर्मिती केली आहे. तर तिच्या स्प्रिंगडेल या गावच्या नागरिकांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी तिचा सार्थ सन्मान म्हणून घेतलेले घोषवाक्य आहे Where green is born- निसर्गाची हिरवाई इथे जन्मली. पर्यावरण चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाचे पान म्हणजे राचेल कार्सन!

उष:प्रभा पागे

ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com