24 November 2020

News Flash

भरकटणारे क्षणभंगुर विचार..

मन अशी काही गोष्ट अस्तित्वातच नसते. अस्तित्वात असतात ते विचार! हा एक महत्त्वाचा मुद्दा.

प्रतिनिधिक छायाचित्र

मन अशी काही गोष्ट अस्तित्वातच नसते. अस्तित्वात असतात ते विचार. आपण विचारांना इतकं खोलवर स्थान देतो की हे विचार म्हणजे येणारे-जाणारे पाहुणे आहेत, हे अंतर राखणं इतकं विसरून जातो की मन ही एक समस्या होऊन जाते.  आपण कोण आहोत? केवळ एक विचार. त्यामुळे एक विचार दुसऱ्याशी लढतोय, अशा युद्धभूमीमध्ये स्वत:चं रूपांतर करणं योग्य नाही. त्यापेक्षा केवळ एक साक्षीदार व्हावं, या तरंगणाऱ्या विचारांकडे नुसतं बघत राहावं. ते थांबतात, ते थांबले की आपण अधिक जागरूक होतो.

मन अशी काही गोष्ट अस्तित्वातच नसते. अस्तित्वात असतात ते विचार! हा एक महत्त्वाचा मुद्दा.

आता दुसरा मुद्दा : या विचारांना तुमच्यापासून स्वतंत्र असं अस्तित्व असतं, ते काही आपल्या स्वभावधर्माशी एकरूप झालेले नसतात, ते येतात आणि जातात- आपण राहतो, कायम राहतो. आपण आकाशासारखे असतो : ते कधी येत किंवा जात नाही, ते कायम असतंच. ढग येतात आणि जातात; ते क्षणिक असतात, शाश्वत नसतात. आपण एखाद्या विचाराला अगदी चिकटून राहायचा प्रयत्न केला, तरी आपण तो खूप काळ धरून नाही ठेवू शकत. त्या विचाराला कधी ना कधी जावंच लागतं, त्याला स्वत:चा असा जन्मही असतो

आणि मृत्यूही. विचार आपले नसतात, ते आपल्या मालकीचे नसतातच. ते अभ्यागत असतात, पाहुणे असतात; पण यजमान कधीच नसतात.

खोलवर बघा, मग तुम्ही यजमान व्हाल आणि विचार पाहुणे होतील. पाहुणे म्हणून ते सुंदर असतात पण आपण यजमान आहोत हे पूर्णपणे विसरलो तर ते घराचा ताबा घेतात आणि मग सगळा गोंधळ होऊन जातो. नरक म्हणतात तो हाच. आपण खरे घराचे मालक, घर आपल्या मालकीचं आणि ताबा घेतलाय पाहुण्यांनी. त्यांचं स्वागत करावं, त्यांची काळजी घ्यावी पण त्यांच्या जागी स्वत:ला कधीच ठेवू नये. कारण त्यामुळे ते मालक होतात. आपण या विचारांना मनात इतकं खोलवर स्थान देतो, हे विचार म्हणजे येणारे-जाणारे पाहुणे आहेत हे अंतर राखणं इतकं विसरून जातो की मन ही एक समस्या होऊन जाते.

आपण कायमस्वरूपी आहोत, ते लक्षात ठेवा : हाच आपला स्वभावधर्म, आपला मार्ग आहे. आपण आपलं लक्ष नेहमीच आकाशासारख्या कायमस्वरूपी गोष्टींवर केंद्रित केलं पाहिजे. सारांश असा : पाहुण्यांकडे फार लक्ष देऊ नये, यजमानाला कायम धरून राहावे.

अर्थातच, काही पाहुणे वाईट असतात, तर काही चांगले, पण आपण त्याची काळजी करण्याची गरज नाही. एक चांगला यजमान सगळ्या पाहुण्यांना सारखीच वागणूक देतो, कोणताही भेद करत नाही. चांगला यजमान नेहमीच फक्त चांगला असतो : एखादा वाईट विचार येतो, तेव्हा तो त्या वाईट विचारालाही चांगल्या विचाराला द्यावी तीच वागणूक देतो. त्याची सदसद्विवेकबुद्धी त्याला तेच सांगते. विचारांना कोणतंही मूळ नसतं, त्यांना घर नसतं; ते इतस्तत: भटकणाऱ्या ढगांसारखे असतात. त्यामुळे आपण त्यांच्याशी झगडण्याची गरज नाही, त्यांना विरोध करण्याची गरज नाही, त्यांना थांबवण्याचीही गरज नाही.

ही आपल्यातली एक खोल अंतर्दृष्टी झाली पाहिजे. कारण, एखादी व्यक्ती

जेव्हा ध्यानधारणेत रस घेऊ  लागते,

तेव्हा ती विचारांचं चक्र थांबवण्याचा प्रयत्न करू लागते. आणि आपण विचार थांबवण्याचा प्रयत्न केला, तर ते कधीच थांबणार नाहीत, कारण विचार थांबवण्याचा प्रयत्न हा एक विचारच आहे, बुद्धत्व साध्य करण्याचा प्रत्येक प्रयत्न हा एक विचारच आहे. आणि एक विचार दुसऱ्या विचाराने कसा थांबवणार? एक दुसरं मन तयार करून मनाला कसं थांबवणार? अशाने आपण दुसऱ्या कशाला तरी चिकटतो. आणि हे चक्र सुरूच राहतं. थकवून टाकणारं पुनरावृत्तीचं चक्र; मग त्याला अंतच राहात नाही.

झगडू नका– कारण कोण झगडणार? आपण कोण आहोत? केवळ एक विचार. त्यामुळे एक विचार दुसऱ्याशी लढतोय, अशा युद्धभूमीमध्ये स्वत:चं रूपांतर करणं योग्य नाही. त्यापेक्षा केवळ एक साक्षीदार व्हावं, या तरंगणाऱ्या विचारांकडे नुसतं बघत राहावं. ते थांबतात, पण आपण थांबत नाही. ते थांबले की आपण अधिक जागरूक होतो.

मनाकडे लक्ष देऊन बघू या ते कुठे आहे, काय आहे. तुम्हाला जाणवेल, विचार तरंगताहेत आणि त्यांच्यामध्ये अंतर आहे. आणि बराच काळ बघितलं, तर लक्षात येतं की ही अंतरं विचारांहून मोठी आहेत. कारण, प्रत्येक विचार दुसऱ्यापासून स्वतंत्र असावा लागतो; खरं तर प्रत्येक शब्द दुसऱ्यापासून स्वतंत्र असला पाहिजे. जसजसं खोलात जाल, तसतसं तुमच्या लक्षात येईल की, विचारांमधील अंतर वाढतंय, आणखी वाढतंय. एक विचार तरंगतोय, मग एक रिकामी जागा येते, जिथे कोणताच विचार नाही; मग पुन्हा एक विचार, पुन्हा मोकळी जागा.

आपण बेसावध असू, तर आपल्याला या रिकाम्या जागा दिसणार नाहीत; मग आपण एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उडी मारू, रिकाम्या जागा दिसणारच नाहीत. आपण जागरूक असू, तर जास्तीत जास्त रिकाम्या जागा दिसतील. आपण पूर्ण जागरूक असू, तर विचारांमधल्या अंतरांचे मैलच्या मैल दिसतील. आणि या अंतरांमधूनच जागृततेची प्रक्रिया घडते.

या रिकाम्या जागांतूनच सत्य आपला दरवाजा ठोठावतं..

तंत्रा, द सुप्रीम अंडरस्टॅण्डिंग या लेखाचा सारांश/ ओशो टाइम्स इंटरनॅशनल/सौजन्य ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन/www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2018 1:01 am

Web Title: article from osho times international
Next Stories
1 आनंदी आनंद चोहीकडे
2 लक्ष, जाणीव आणि एकाग्रता
3 अवलंबित्व आणि स्वातंत्र्य
Just Now!
X