News Flash

जिवाभावाची मैत्रीण

तिच्यामुळे अनेक सुखद क्षण अनुभवता आले..

आईबाबांशिवाय मुलांना एखादा का होईना, जिवाभावाचा सवंगडी असावा. कधीकधी मुले आईबाबांजवळ सगळ्याच भावना व्यक्त करू शकतील असं होत नाही, त्या वेळेस प्रत्येक मुलासाठी असे मित्रमैत्रिणी नक्कीच मोठा आधार बनतात. जान्हवीलाही तिच्या दत्तक प्रवासात रिद्धीमुळे आधार मिळाला. तिच्यामुळे अनेक सुखद क्षण अनुभवता आले..

जान्हवी ही नेहा आणि आशीष यांची १८ वर्षांची लेक. जान्हवी जेव्हा चार महिन्यांची होती तेव्हा दत्तकविधीतून ती घरी आली. नेहा आणि आशीष यांनी लग्नानंतर सहा वर्षांनी दत्तक प्रक्रियेतून आपलं मूल घरी आणण्याचा निर्णय घेतला. तशी बरीच वाट बघून या दोघांना जान्हवी भेटली आणि कुटुंब पूर्ण झाल्याचा आनंद दोघेही अनुभवू लागले. नेहा आणि आशीष या दोघांच्या घरच्यांनी जान्हवीला आपलंसं केलं आणि भरभरून प्रेम दिलं. घरातील वातावरण एकदम पोषक आणि पालकही सुजाण आहेत. जान्हवी अशा वातावरणात छान फुलत गेली.

नेहा म्हणाली, ‘‘बरेच र्वष वाट बघून पिल्लू घरी आल्याने, तिचे खूप कौतुक आणि लाड झालेत. जान्हवीला कुठल्याही गोष्टीसाठी आम्हाला ‘नाही’ म्हणायला त्रास होतो. मी नोकरी करणारी आणि आशीष व्यवसाय. परंतु तिला भरपूर वेळ देता येईल याची आम्ही दोघांनी नेहमीच काळजी घेतली. जेव्हा मी घरात नसेन तेव्हा आशीष वेळ काढून तिच्यासोबत असतो. त्यामुळे जान्हवीला आम्ही पाळणाघरामध्ये कधी ठेवलं नाही. लहानपणी संस्थेतून घरी आल्यावर पहिले वर्ष तिचं वजन वाढणे, तिचे छोटेछोटे आजार यातच गेलं. त्यामुळे आम्ही ठरवलं हिला पाळणाघरात न ठेवता घरीच आपण वेळ देऊ या.

जान्हवी जशी तीन वर्षांची झाली, आम्ही तिला एका नामांकित शाळेत दाखल केलं. शाळेचे दिवस सुरू झाले आणि आपल्या पिल्लूला मोठं होताना पाहून आम्ही सुखावत होतो. शाळेत थोडय़ाच दिवसात जान्हवी रमू लागली. जान्हवी तशी स्वभावाने शांत, त्यामुळे लगेच मित्रमैत्रिणी जमवणं हा तिचा पिंड नाही. थोडा वेळ घेऊन, आपल्याला पटेल असे तिचे थोडकेच मित्रमैत्रिणी आहेत. आम्हाला नेहमीच वाटत आलं, जान्हवीला खूप मित्रमैत्रिणी असाव्यात, परंतु तसं कधी आम्हाला होताना दिसलं नाही.

जान्हवी पहिलीत गेली आणि तिला एक तिची जिवाभावाची मैत्रीण भेटली, रिद्धी. रिद्धी आणि जान्हवी दोघींची अजूनही खूप छान मैत्री आहे.

मी जेव्हा जान्हवीला म्हणाले, ‘‘बेटा, मी, तू आणि रिद्धी एकदा गप्पा मारायला आपण भेटू या का?’’ दोघीही आनंदाने तयार झाल्यात. रिद्धी प्रचंड बडबडी आणि जान्हवी शांत. पहिलाच विचार मनात डोकावला, ‘खरंच एकमेकींना पूरक आहेत या!’

जान्हवीने सुरुवात केली, ‘‘मावशी, आम्ही पहिल्यांदा जेव्हा शाळेत भेटलो, त्या वेळेस हिची बडबड ऐकून मला वाटलं, हिच्यासोबत आपण बोलणार पण नाही फारसं. परंतु आम्ही शाळेत एकाच बाकावर बसायचो, हळूहळू, आमची गट्टी झाली. खरं सांगू का? आता तर असं आहे, आम्ही एकमेकींना काही सांगितलं नाही तर अस्वस्थ व्हायला होतं. माझ्या दत्तक प्रवासात मला हिचा नेहमीच आधार वाटतो, किती छान समजून घेते मला ही!’’

‘‘एकदा असंच शाळेत एका शिक्षिकेनं वर्गात सांगितलं, जान्हवी ‘दत्तक’ आहे. खूप राग आला मला. माझ्या आयुष्यातली एवढी व्यक्तिगत गोष्ट जगजाहीर करायचा यांना कुणी दिला अधिकार? खूप मनस्ताप झाला त्यावेळेस, काय करावं सुचेना. आईबाबांना सांगावं की नाही, किती विचार करून त्यांनी मला या शाळेत घातलं, काय वाटेल त्यांना? आधीच ते किती कष्ट घेतात माझ्यासाठी, कशाची कमी पडू देत नाहीत मला. बरेच दिवस मी आतल्या आत कुढत राहिले, शाळेत अजिबात लक्ष लागेना. आईबाबांना पण जाणवलं मला काहीतरी त्रास होत आहे, परंतु मी ठरवलं की त्यांना या गोष्टी नाही सांगायच्या. मग विचार केला रिद्धीला सांगू या. रिद्धीला सांगितलं तर ती भडकलीच आणि म्हणाली, ‘एक तर एवढे दिवस सांगितलं नाहीस, चल बोलू या शिक्षिकेसोबत.’ आम्ही दोघी लगेच मधल्या सुट्टीत शिक्षिकेकडे गेलो, त्यांना रिद्धीने विचारलं, ‘तुम्ही वर्गात, ‘दत्तक’ म्हणून जान्हवीचा उल्लेख का केलात?’ हिचा होरा बघून मी घाबरलेच, म्हटलं काही खरं नाही आता, त्या आता चिडणार आणि लागली आपली वाट. परंतु आमच्या शिक्षिकेने आमची बाजू समजून घेतली, त्यांनाही जाणवलं आपण जे नकळत बोललो त्यामुळे या मुलीच्या मनावर खोलवर त्याचे परिणाम झालेत. त्यांनी माझी माफी मागितली आणि म्हणाल्या, ‘बेटा, यापुढे मी नेहमी काळजी घेईन बोलताना. तुम्ही मला आज येऊन बोललात म्हणून मला जाणीव झाली, ‘दत्तक’ याविषयी बोलताना प्रत्येकाने थोडा संयम ठेवावा. याविषयी बोलण्याचा अधिकार मला काय कुणालाही नाही.’ मला त्या दिवशी हा सुखद अनुभव फक्त रिद्धीमुळे अनुभवायला मिळाला.

एकदा असंच मी आईबाबांसोबत टेलिव्हिजन बघत बसले होते. जनुकांबद्दल माहिती देत होते. मुलांची जनुके हे आईबाबांसोबत जुळतात आणि आनुवंशिकतेबद्दल माहिती सांगत होते. मला लगेच वाटलं, ‘आपली जनुके आईबाबांसोबत जुळत नाहीत.’ मी जेव्हा रिद्धीला हे सांगितले, ‘तुला माहीत आहे, माझी जनुकं माझ्या आईबाबांसोबत जुळत नाही.’ लगेच मला म्हणाली, ‘आपली जुळतात का जनुकं? आहोत ना आपण छान मैत्रिणी? कशाला तू एवढा विचार करतेस गं? तुझे आईबाबा फक्त तुझेच आहेत आणि तू त्यांची. बाकी सगळं नाममात्र आहे गं.’ मला ना मावशी, नेहमीच हिच्याशी बोललं की हलकं वाटतं, किती छान समजून घेते मला रिद्धी.’’

‘‘कधी तरी असेही विचार येतात, ‘आईबाबा किती करतात माझ्यासाठी, मी मात्र काहीच करत नाही. कोण कुठली मी? यांनी मात्र माया लावून मला आजपर्यंत साथ दिली. उपकार असं नाही मावशी! पण कळत नाही, कुठे तरी हरवल्यासारखं वाटतं. परंतु या विचारातूनही रिद्धीमुळे मी लगेच बाहेर येते. खरंच मला रिद्धी मैत्रीण म्हणून भेटली नसती तर काय झालं असतं माझं?’’

रिद्धीला खरं तर एवढा वेळ शांत राहणं कठीण झालं होतं, सारखी तिची चुळबुळ चालू होती. मधेच बोलायची, जेव्हा मी तिच्याशी बोलू लागले तेव्हा तिला काय सांगू आणि काय नको, असं झालं होतं.

रिद्धी म्हणजे सळसळता उत्साह पण बोलताना जाणवलं, सालस तर आहेच ही आणि समंजस पण! मला म्हणाली, ‘‘मावशी, आमच्या दोघींचं मस्त जमतं.. बस! अजून काय हवं? मला तर कित्येक वेळा वाटतं, जान्हवीला काही सांगायच्या आधी तिला माझ्या मनातलं सगळंच कळतं.

जान्हवी तुला फक्त तिच्या अडचणी आणि मी तिला कशी मदत केली, एवढंच बोलली, पण खर सांगू का? जान्हवी माझ्याही अडचणी खूप छान समजून घेते आणि मला समजावून सांगत असते. माझेही घरी वाद होतात, दादाशी भांडण होतं, परंतु जान्हवी मला समजून घेऊन मग गप्पा मारते आणि ओघाने तिचे विचार मला सांगते.’’

मी परत रिद्धीला विचारले, ‘‘ज्या वेळेस जान्हवीच्या दत्तक असण्याबद्दल बाहेरचे, शाळेतील लोक बोलतात त्यावेळेस तुला काय वाटतं?’’ लगेच रिद्धी म्हणाली, ‘‘खरंच मावशी, कुणाला काय गं अधिकार जान्हवी किंवा दुसऱ्या कुठल्याही मुलांना त्यांच्या ‘दत्तक’ असण्याबद्दल बोलण्याचा? नाही का आपण फक्त एक व्यक्ती म्हणून बघू शकत त्या व्यक्तीकडे? मला तर नेहमी वाटतं, जान्हवी माझी मैत्रीण नसती तर माझं हे आयुष्य खरंच अपूर्ण असतं. आता आम्ही दोघीही वेगळी शिक्षणाची वाट घेतोय, पण आम्हाला खात्री आहे, आमची मैत्री अतूट आहे. आम्ही दोघीही एकमेकींना नेहमीच साथ देऊ.’’

दोघींशी बोलल्यावर मला जाणवलं, आईबाबांशिवाय मुलांना एखादा का होईना, जिवाभावाचा सवंगडी असावा. कधीकधी मुले आईबाबांजवळ सगळ्याच भावना व्यक्त करू शकतील असं होत नाही, त्या वेळेस प्रत्येक मुलासाठी असे मित्रमैत्रिणी नक्कीच मोठा आधार बनतात.

पालकांच्या आणि त्यांच्या मुलीच्या विनंतीवरून आजच्या कथेतील नावं बदलली आहेत. मला खात्री आहे, या लेखामधून वाचकांना एक नवीन दृष्टी नक्की मिळेल.

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2017 12:10 am

Web Title: article by sangeeta banginwar on friendship
Next Stories
1 पूर्णाकच्या निमित्ताने
2 मातृत्वाचं आगळं दातृत्व
3 जागवलेला स्वाभिमान
Just Now!
X