19 August 2019

News Flash

मातृत्वाचं आगळं दातृत्व

सोलापूरच्या ‘पाखर संकुल’ या संस्थेतल्या पूजाने जगावेगळं मातृत्व अनुभवलंय आणि ती आज कैक मुलांची ‘आई’ झाली आहे.

सोलापूरच्या ‘पाखर संकुल’ या संस्थेतल्या पूजाने जगावेगळं मातृत्व अनुभवलंय आणि ती आज कैक मुलांची ‘आई’ झाली आहे. इथल्या संस्थेत एक दिवस एक बाळ फारच रडत होतं. त्या दिवशी पूजाला आतून वाटलं आता याला पाजलं तर हा शांत होईल आणि खरंच ते बाळ तिचं दूध पिऊन शांत झालं. त्यानंतर पूजाने चार र्वष संस्थेतल्या मुलांची स्तन्यदा माता होत जगावेगळं मातृत्व अनुभवलं.

मे  महिन्यात सोलापुरात एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी दहा दिवस होते, तेव्हा ठरवून ‘पाखर संकुल’ या संस्थेला भेट दिली. तिथल्या सर्वेसर्वा शुभांगीमाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटले. तिथेच पूजा ठाकूरची भेट झाली. पूजाने जगावेगळं मातृत्व अनुभवलंय आणि ती आज कैक मुलांची ‘आई’ झाली आहे. या जगावेगळ्या आईचा हा प्रवास..

‘पाखर संकुल’ची स्थापना २००३ मध्ये झाली. २००४ मध्ये पूजा ‘पाखर संकुल’ परिवारात सामील झाली. तिने माईंना कबूल केल्याप्रमाणे जे पडेल ते काम या परिवारात करू लागली. त्या वेळेस संस्थेत जेमतेम तीन-चार बाळं असायची. पूजा म्हणाली, ‘‘सगळीच कामं आम्ही सगळेच जण आनंदाने करायचो. एकत्र कुटुंबाप्रमाणे सगळं वातावरण असायचं आणि आजही आहे. माझी मुलगी रेवती त्या वेळेस पाच वर्षांची होती, शाळेतून तीही संस्थेत यायची आणि मग माझी कामं संपली की दोघी आम्ही घरी जायचो. मी अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली. वडील लहान असताना गेले. आईने आम्हा तिघी बहिणींना कष्टानं शिकवलं. लग्नानंतर परिस्थिती तशी जेमतेमच, त्यामुळे संसाराला मदत म्हणून काम सुरू केलं. माझं शिक्षण पदवीपर्यंत झालेलं. माईंनी मला जेव्हा एम.एस.डब्ल्यू. करून घेण्याचा सल्ला दिला तेव्हा मी लगेच एम.एस.डब्ल्यू.साठी प्रवेश घेतला. त्याच वेळेस मी गरोदर होते. २००५ मध्ये समर्थ झाला आणि लगेच तीन महिन्यांत मी कामावर रुजू झाले. इथे संस्थेत एक दिवस आमचं एक बाळ फारच रडत होतं. त्या दिवशी मला आतून वाटलं, आता मी याला पाजलं तर हा शांत होईल. खरं तर मी फार विचार केलाच नाही आणि त्याला उचललं आणि मांडीवर घेतलं. एकदा वाटलं, याला अजिबात सवय नाही, जमेल की नाही याला? पण त्यानं लगेच प्यायला सुरुवात केली आणि शांत झाला. वाटलं आपण खरंच या मुलांसाठी काही तरी नक्की करू या.

घरी आल्यावर नवऱ्याला सगळं सांगितलं. त्यांनाही हे ऐकून समाधान वाटलं आणि म्हणाले, ‘पूजा, तू महान काम करते आहेस आणि माझी तुला साथ आहे.’ असा जोडीदार मिळाला म्हणून भरून पावले मी ताई त्या दिवशी!’’ पूजाला मी जेव्हा विचारलं, ‘‘तुला भीती नाही वाटली का? घरचे काय म्हणतील? समाज काय म्हणेल? तुझ्या मुलांना काय वाटेल?’’ तेव्हा अगदी सहजपणे हसून पूजा म्हणाली, ‘‘ताई, आपण सगळे समाजाचं देणं लागतो आणि खरं तर मी धन्य समजते की देवानं मला अशा कामाकरिता निवडलं. घरातून मला सगळ्यांची साथ मिळाली. माझ्या सासूबाई तशा जुन्या विचारांच्या, परंतु त्यांना जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा त्यांनाही कौतुकच वाटलं माझं. म्हणाल्या, ‘पूजा, छान काम करते आहेस, भाग्यवान आहोत आपण सगळेच.’ अजून काय हवंय ताई मला? आजही मी माझ्या लेकीशी याविषयी बोलले तर तीसुद्धा म्हणते, ‘आई, त्या वेळेस तुझ्यामुळे त्यांना आईचं दूध मिळालं.’ तिलासुद्धा माझा आणि माझ्या या कामाचा अभिमान आहे. अशा पूजा प्रत्येक संस्थेत तयार झाल्या तर माझ्या प्रयत्नांचं सार्थक झालं असं वाटेल मला.’’

माई अगदी प्रेमाने पूजाची ओळख करून देतात, ‘‘ही आमची पूजा आणि इथल्या मुलांची आई. जे काम पूजानं चार र्वष कशाचीही अपेक्षा न बाळगता, कोण काय म्हणेल याचा विचार न करता केलं त्यासाठी माझा तिला दंडवत! एक अनुभव मला नक्की सांगावासा वाटतो, आमच्या इथे एक नवजात बालकाला सोडायला त्याची जन्मदात्री आणि तिचे आईबाबा आले होते. सकाळची वेळ होती. मी त्या तिघांसोबत बोलत होते. बाळ खाली ठेवलेलं होतं. बाळाला बहुतेक त्या आईनं पाजलंच नसावं. ते खूप जोरजोरात रडत होतं; पण बाळाची आई, तिचे आईबाबा मात्र जागेवरून हलले नाहीत. ढिम्म बसून राहिले. मला तर शंका आली, यांना काही वाटतंय की बाळाला सोडून कधी एकदाचं येथून जातोय असं झालय त्यांना?  तितक्यात पूजा कामावर आली. तिनं क्षणभरही विचार केला नाही. बाळाला उचललं आणि मी खाली राहते तिथं खोलीत घेऊन गेली. तिनं बाळाला पाजलं आणि बाळ एकदम शांत झालं. सांगायचा उद्देश हा की, पूजानं कधीही विचार केला नाही, ‘बाळ कोण? त्याची वैद्यकीय तपासणी झाली की नाही?’ तिच्या मातृत्वाला अशी बंधनं कधीच नव्हती. नंतर मीच तिला म्हणाले, ‘पूजा, बाळ आल्यानंतर आधी तपासणी होऊ देत जा बेटा.’ मी परमेश्वराचे आभार मानते त्याने पूजाला आमच्या परिवारात आणलं. माझा तिला शतश: प्रणाम!’’

मी माईंना म्हणाले, ‘‘तुम्ही कधी दत्तक प्रक्रियेच्या वेळी होणाऱ्या आईबाबांना पूजाच्या मातृत्वाबद्दल सांगितलं का?’’ त्या म्हणाल्या, ‘‘कधी जाणीवपूर्वक असं नाही सांगितलं.’’ ज्या वेळेस मी त्यांना म्हणाले, ‘‘घरी आल्यावर काही माता आपल्या या बाळांना फक्त स्तन्यपानाचा आनंद मिळावा आणि स्वत:ला मातृत्वाचं पूर्णत्व अनुभवता यावं म्हणून बऱ्याचदा स्तन्यपानाचा त्या प्रयत्न करतात. काही अनुभव तर असेही आहेत की, अशा प्रयत्नांमुळे आईला पान्हाही फुटतो; पण जर बाळाला त्याची सवय नसेल आणि संस्थेत बाटलीनं दूध पीत असेल तर ते मूल आळशीपणाही करतं आणि आईचं दूध नाकारतं; पण जर माई तुम्ही आईबाबांना हे सांगितलं की, इथं संस्थेत असे प्रयत्न होतात आणि मुलांना स्तन्यपानाची सवय आहे, तर त्या पालकांना घरी जाऊन नक्की प्रयत्न करायला आवडेल. स्तन्यपानाचे फायदे हे फक्त त्या कालावधीपुरते मर्यादित नसून, मुलाचं आईबाबांसोबतचं नातं दृढ व्हायला केवढा मोठा हातभार लागतो.’’

मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही प्रयत्न करा आणि सोलापुरात ‘स्तन्यपेढी’ (ब्रेस्ट मिल्क बँक) स्थापन करा.’’ माईंना ही कल्पना एवढी आवडली, की त्यांनी मला लगेच आश्वासन दिलं, ‘‘संगीता, पुढील काही महिन्यांत तुझी ही संकल्पना आपण सगळे मिळून अमलात आणूयात.’’ त्या दिवशी आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांविषयी बोलत होतो आणि माईंनी तर त्यानंतर ४ पर्यंत जागून पुढचे बेत लिहूनदेखील काढले. कदाचित काही संस्थांमध्ये असे उपक्रम आधीही झाले असतील किंवा अजूनही होत असतील. माझा प्रयत्न एवढाच आहे, हे उपक्रम लोकांपर्यंत पोचावेत, कारण संस्थेत मुलांना आई बनून दूध पाजणारी ही आपल्यामधलीच कुणी तरी स्त्री असू शकते.

या लेखाद्वारे पूजाचा प्रवास हे एक निमित्त आहे, संस्थेतील मुलांना आणि नंतर ते दत्तक प्रक्रियेतून घरी आल्यावर स्तन्यपान कशा प्रकारे होऊ  शकतं याविषयी थोडीफार माहिती सगळ्यांपर्यंत पोचावी यासाठी. मला खात्री आहे आपल्या प्रगल्भ वाचकांना आणि काही संस्थांना या विषयात अजून सखोल अभ्यास करून काम करायची नक्की इच्छा होईल.

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org

First Published on July 22, 2017 12:48 am

Web Title: loksatta chaturang marathi articles on pakhar sankul