पालघर : माजी आदिवासी मंत्री दिवंगत विष्णू सवरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सवरा यांना भाजपातर्फे पालघर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा मुंबईतल्या तीन खासदारांप्रमाणे पत्ता कट झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पालघर जागेच्या वाटणीमध्ये महायुतीमध्ये चढाओढ सुरू होती. दोन दिवसांपूर्वी ठाण्याची जागा शिवसेनेकडे दिली गेल्यानंतर पालघरचा उमेदवार भाजपा ठरवेल हे जवळपास निश्चित झाले होते. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये विशेष स्पर्धा नसताना देखील महायुतीतर्फे पालघर लोकसभेची उमेदवारी सर्वात अखेरीस घोषित करण्यात आली.

हेही वाचा – पाकिस्तान कैदेतून सुटका होणाऱ्या ३५ कैदींमध्ये डहाणू मधील पाच खलाशांचा समावेश

विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे काही महिन्यांपासून भाजपाच्या राज्यातील तसेच केंद्रातील नेत्यांच्या संपर्कात होते. मात्र निवडणूक पूर्व चाचणी अहवाल विद्यमान खासदार यांच्या अनुकूल नसल्याचे वारंवार दिसून आल्याने भाजपाने इतर उमेदवारांची चाचपणी सुरू ठेवली होती.

भाजपातर्फे डॉ. हेमंत सवरा, भाजपाचे लोकसभा प्रभारी संतोष जनाठे, बोईसरचे माजी आमदार विलास तरे यांची नावं चर्चेला होती. तर शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या नावावर देखील विचार सुरू होता. विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यासह सर्व इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज व त्यासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र तयार करून ठेवण्याच्या गुप्त सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा – सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवारी दाखल होईपर्यंत महायुतीने दगा फटका होईल या भीतीपोटी उमेदवारी जाहीर करण्याचे टाळले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कामडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच भाजपातर्फे डॉ. हेमंत सवरा यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. उद्या शुक्रवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल असे भाजपाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

ऑर्थोपेडिक सर्जन असणारे डॉ. हेमंत हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे. विष्णु सवरा यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रिय झाले असून त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करला होता.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ticket to hemant sawra from palghar ssb