नितीन बोंबाडे

डहाणू : वाणगाव रेल्वे मार्गाखालून  कापशी येथून जाणाऱ्या खाडीचा पारंपरिक मार्गात माती भराव केल्याने खाडीचे मुख पुलाऐवजी रेल्वे मार्गासमोर वळल्याने पाण्याची धडक रेल्वेमार्गाला बसत असल्याने रेल्वे मार्गाखालचा भराव कमकुवत होण्याची भीती आहे. त्यामुळे रेल्वे पुलाला धोका निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन खाडीचा पारंपरिक मार्ग मोकळा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

वाणगाव रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कापशी गावातून जाणाऱ्याखाडी लगत तिवरीच्या झाडांची बेसुमार कत्तल आणि मातीचा भराव यामुळे खाडीची प्रचंड धूप झाली आहे. तर वाणगाव रेल्वे मार्गाच्या मुखाजवळ कापशी खाडीने पारंपरिक मार्ग बदलला असल्याने पावसाळ्यात रेल्वे खाडी पूल क्रमांक १६१ जवळ जीर्ण पुलाला धोका वाढला आहे. तर पुला लगतचा भराव कमकुवत होण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वेमार्गाखाली  खडीचा भराव कोसळल्यास रेल्वे वाहतुकीस धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वाणगाव परिसरात अनेक मोक्याच्या जागी खाजण जागेत मातीचा भराव केल्याने  भरतीच्या पाण्याला  मज्जाव झाला आहे. परिणामी   पावसाचे पाणी तुंबून वाणगाव शहराला  रेल्वे पुलाला धोका पुरपरिस्थिचा सामना करावा लागत आहे.  तलाईपाडा, कासपाडा, स्टेशन पाडा , अत्री अपार्टमेट, दुबलपाडा भाग दरसाल पाण्याखाली बुडतो. डहाणू समुद्राच्या भरतीचे पाणी माटगाव, धूमकेत, आसनगाव, वाणगाव, कापशी, डेहणे, पळे, येथे खाडीमार्गाने आजूबाजूच्या खाजण परिसरात पसरते. तर मातीच्या भरवामुळे कापशी गावाजवळील खाडीत भराव होऊ लागल्याने खाडीचा मार्ग बदलला आहे. परिणामी पुरामध्ये खाडीचा प्रवाह थेट  रेल्वे पूल क्रमांक १६१ च्या बाजूच्या ढिगार्यावर आदळतो. त्यानंतर  प्रवाह बोगद्यातून जातो. परिणामी  रेल्वे मार्गाला धोका निर्माण झाला आहे.

वाणगाव खाडीचा मार्ग बदलल्याने  रेल्वे पूल क्रमांक १६१ जवळ पुलाला धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासनाने खाडीचा मार्ग मोकळा करुन पुरपरिस्थीवर मार्ग काढावा.

-कॅप्टन सत्यम ठाकूर, वाणगाव