पालघर : पालघर जिल्ह्यात सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसल्याने जव्हार, विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. वादळी वाऱ्याने काही ठिकाणी विद्युत खांब जमिनीवर कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला तर काही रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

वादळी पावसाने तलासरी तालुक्यातील कोचाई पाटील पाड्यात चार घरांची पडझड झाली. या दुर्घटनेत एक वृद्ध महिला जखमी झाली असून घरांच्या भिंती आणि छप्पर कोसळल्याने घरांसह घरातील साहित्याचे मोठ नुकसान झाले आहे. जव्हार आणि विक्रमगड परिसरात देखील वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून नागरिकांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे.

हेही वाचा – तारापूर अणुभट्टीतून वीजनिर्मितीस विलंब; दुरुस्तीनंतर पुढील किमान १० वर्षे वीज मिळण्याची अपेक्षा

वादळी पावसाचा तलासरी तालुक्याला फटका

तलासरी परीसरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अवकाळी पावसाने तलासरी आठवडी बाजारात मात्र व्यापाऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. तालुक्यातील करजगाव, मानपाडा, कोदाड, कोचाई, बोरमाळ, अनविर, सावरोली, कूर्झे, झाई, सुत्रकार येथील अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या घरावरचे पत्रे उडून नुकसान झाले, तसेच मोठ्या प्रमाणात झाडेही उन्मळून पडली.

हेही वाचा – राज्याचे भविष्य पालघरमध्येच; वाढवण बंदरामुळे १० लाख रोजगारनिर्मिती, ‘जेएनपीए’च्या अध्यक्षांचा विश्वास

जोरदार वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून त्यांच्या घरांचे नुकसान झाले, याबाबत तलासरी तहसीलदार अमोल पाठक यांनी महसूल कर्मचाऱ्यांना तत्काळ नुकसानग्रस्त गावात जाऊन नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.