News Flash

जातवास्तवाचं आव्हान

‘जात’ ही आजही व्यक्तीची ओळख म्हणून उभी आहेच.

|| उत्पल व. बा.

‘जात’ ही आजही व्यक्तीची ओळख म्हणून उभी आहेच. तेव्हा जातीसमोर हार मानायची की जातिअंतासाठीचे मार्ग शोधत राहायचं? ‘आपण’ काय करायचं? जात ही चीज नावाव्यतिरिक्त खाणं-पिणं, कपडे, भाषा, काही सवयी यामुळे वास्तवात अजूनही आहेच. त्यामुळे आव्हान मोठं आहेच. ती मनात सतत जिवंत असते. आपल्याकडे विवाहसंस्था ही जातीसंस्थेची रक्षक आहे, असं म्हणणं वावगं होणार नाही. मग या पहिलवानाला लोळवायचं कसं?

एक जुना प्रसंग आठवतो. महाविद्यालय पूर्ण करून मी नोकरीला लागलो होतो. आमच्या कॉलनीतील एका परिचितांकडे काही कामानं जाणं व्हायचं. त्यांचा मुलगा त्या वेळी बहुधा सहावी-सातवीत होता. एके दिवशी त्यानं मला अचानक विचारलं, ‘‘तू कोण आहेस?’’ मला आधी कळेना, पण नंतर लक्षात आलं की तो माझी जात विचारत होता. एका शाळकरी मुलानं मला असं विचारावं याची मला मौज वाटली. आज इतक्या वर्षांनी हे आठवल्यावर पुन्हा मौज वाटलीच, पण उद्विग्नही व्हायला झालं.

‘मी विचार करू शकतो, लिहितो’ यातला एक (मोठा) वाटा माझ्या वर्गीय स्थानाचा असतो आणि भारतीय संदर्भात तो जातीचाही असतो हे जाणवणं तसं विषण्ण करणारं आहे. आपल्या समाजातील जातवास्तवाचा विचार करताना मला विलास सारंगांच्या ‘मॅनहोलमधला माणूस’ या पुस्तकाची आठवण होते. मराठी साहित्य, समाज आणि जातवास्तव हा या पुस्तकाचा विषय आहे. सारंग एके ठिकाणी लिहितात, ‘अनेक शतकं समाजाने जातिव्यवस्था राबवलेली आहे. पिढय़ान्पिढय़ा हे ज्ञान मेंदूत संक्रमित झालेलं आहे आणि ते भारतीय माणसाच्या मनात नेणिवेचा भाग बनलेलं आहे. याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की जातिभान हा घटक भारतीय माणसाच्या जनुकांचा भाग बनलेलं आहे. जातिवास्तवाचं प्रदीर्घ सातत्य लक्षात घेता जातियंत्रणा ही भारतीय माणसाच्या जनुकसंचिताचा भाग बनलेली असणं शक्य आहे. पुढल्या विसेक वर्षांत मेंदूतील जातिज्ञानाचं शरीरशास्त्रीय अस्तित्व पडताळून पाहता येणं शक्य आहे.’

‘जात ही भारतीय समाजमनाच्या नेणिवेचा भाग बनली आहे’ हे सारंगांचं विधान माझ्या मनातील विचार प्रतिबिंबित करणारं होतं. जातवास्तवाकडे मी ‘आधुनिकतेतला अडसर’ म्हणून तर बघतोच; पण त्याच्याही आधी समाजाचं ‘गुणवत्तापूर्ण जगणं’ रोखणारा घटक म्हणूनही बघतो. जात या मुद्दय़ाबरोबर ओघाने येणारा मुद्दा म्हणजे आरक्षण. सामाजिक विषमता दूर व्हायला मदत व्हावी म्हणून आरक्षणाची कल्पना अमलात आणली गेली आणि ते स्वागतार्हच आहे. जन्माधिष्ठित विभागणीमुळे ज्यांच्यावर पिढय़ान्पिढय़ा अन्याय झाला त्यांना आता समान संधी मिळाव्यात म्हणून केलेलं हे ‘पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन’ होतं. आज या विषयातील गुंते वाढले आहेत आणि खरं सांगायचं तर त्यावर बोलण्याइतका माझा अभ्यास नाही. काही गोष्टी अगदीच जाणवतात, पण त्यावर निर्णायक काही म्हणता येईल असं वाटत नाही. (जात जायला हवी हे निर्णायकपणे वाटतं!) त्यामुळे आरक्षण हा मुद्दा बाजूला ठेवून आपण ‘जात’ या आरक्षणाच्या पुष्कळ आधीपासूनच्या वास्तवाबद्दल, आपण त्यावर काय करू शकतो याबद्दल बोलणार आहोत.

याबाबत एक किस्सा सांगतो. काही महिन्यांपूर्वी भीमा- कोरेगावला जे घडलं त्या संदर्भाने मला एका परिचितांनी काही ‘फॉरवर्डेड मेसेजेस’ पाठवले. दलित संघटनांनी पुकारलेला बंद अनाठायी होता असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना मी एक मोठा रिप्लाय दिला. त्यातला एक मुद्दा असा होता – ‘भीमा-कोरेगावला जे घडलं’ आणि ‘भीमा-कोरेगावला जे घडलं त्यामुळे पुढे जे घडलं’ यातील दुसऱ्या प्रकारामुळे अस्वस्थ, संतप्त होऊन बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तुमचे मेसेजेस त्याच धर्तीचे आहेत. पण पहिल्या प्रकाराबाबत, म्हणजे ‘भीमा कोरेगावला जे घडलं’ त्याबाबत तुमची प्रतिक्रिया समजली नाही. ती समजून घ्यायला मला आवडेल. एकूणच सवर्ण-दलित संघर्षांबाबत तुम्हाला काय वाटतं, फार पूर्वी नाही तर अगदी अलीकडील काळापर्यंत दलितांवर जे अत्याचार झाले त्याबाबत तुम्हाला काय वाटतं, खैरलांजी-खर्डा आणि इतर घटनांबाबत तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्यायला मला आवडेल. या घटना भयंकर होत्या आणि दोषींना शिक्षा व्हायला हवी, असं तुम्ही म्हणाल याची मला कल्पना आहे. पण त्याच्यापुढे जाऊन, जातीवर आधारित आपल्या सामाजिक रचनेबाबत तुम्हाला काय वाटतं, सवर्ण आणि मुख्य म्हणजे शिक्षित, बुद्धिमान, शहरी विकासाचे लाभार्थी म्हणून आपली काही विशेष जबाबदारी आहे की नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्यायला मला आवडेल.’

आपली जन्मदत्त जात, तिने प्रभावित केलेलं आपलं सांस्कृतिक जगणं, आपलं विचारविश्व आणि संथपणे, सूक्ष्मपणे, तर कधी बऱ्याच भडकपणे समाजामध्ये कळेल न कळेल अशी दरी निर्माण करत जाणारा जातिभेदाचा प्रवाह याचं आपलं आकलन काय आहे? आपल्याला या भेदासह जगणं मान्य आहे, नाइलाजानं मान्य आहे, आपण यावर काही करू इच्छितो का असे बरेच प्रश्न मनात उभे राहतात आणि अशा वेळी मला अटळपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘अनाहिलेशन ऑफ कास्ट’ या दीर्घ निबंधाची आठवण होते.

१९३६ मध्ये लाहोरमधील जात-पात-तोडक-मंडळ या सुधारणावादी संस्थेनं आंबेडकरांना वार्षिक कार्यक्रमात व्याख्यानासाठी बोलावलं होतं. त्यांचं लिखित स्वरूपातील व्याख्यान मंडळाकडे आधी पोचलं आणि ते वाचल्यावर मंडळातील मंडळींच्या लक्षात आलं की हे प्रकरण आपल्याला झेपणारं नाही. कारण व्याख्यानात आंबेडकरांनी जातिव्यवस्थेची कठोर चिकित्सा केली होतीच, पण त्याचबरोबर त्यांनी हिंदू धर्माचीही चिकित्सा केली होती. मंडळाने कार्यक्रम रद्द केला. हे भाषण होऊ शकलं नाही. मग आंबेडकरांनी या व्याख्यानाच्या प्रती स्वत: छापून वितरित केल्या आणि हे छोटं पुस्तक परिवर्तनवादी चळवळीचं एक धारदार हत्यार बनलं.

आंबेडकरांचं लेखन वाचताना तुम्हाला सावरून बसायला लागतं. कारण ‘बॅरिस्टर’ आंबेडकर जो तार्किक युक्तिवाद करतात त्यांनी तुम्ही गारद व्हायची शक्यता असते. ‘अनाहिलेशन ऑफ कास्ट’ इंग्लिशमध्ये तर उपलब्ध आहेच; पण त्याचे बऱ्याच भाषांमधून अनुवाद झाले आहेत. सुगावा प्रकाशनाने ‘जातिप्रथेचे विध्वंसन’ या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. (अनुवादक : गौतम शिंदे) ‘भारतात सामाजिक सुधारणांना मित्र थोडे आणि टीकाकार फार’ हे अधोरेखित करत आंबेडकरांच्या विवेचनाची सुरुवात होते आणि पुढे वाचताना आपण केवळ गुंगत जातो. मी हे पुस्तक वाचताना अनेक विधानं, काही परिच्छेद अधोरेखित करून ठेवले होते. वानगीदाखल काही उदाहरणं पहा – ‘जात ही केवळ कामांची विभागणी नसून कामकऱ्यांची विभागणी आहे.’ ‘जातीचे अस्तित्व आणि जातीची जाणीव भूतकाळातील वैराची आठवण कायम ठेवण्याचं काम करते.’ ‘जातिपद्धती ही सामूहिक कृतीला प्रतिबंध करते.’ ‘चातुर्वण्र्याच्या पद्धतीमुळे प्रत्यक्ष कृती करण्यास हिंदूंचे खालचे वर्ग असमर्थ बनवले होते.’ ‘बिगरहिंदूंमध्ये जातीला कोणतेही धार्मिक पावित्र्य नाही, परंतु हिंदूंमध्ये जातीला नि:संदिग्धपणे पावित्र्य दिलेले आहे. हिंदूंना त्यांचा धर्म जातींचा अलगपणा आणि विभक्तपणा एक सद्गुण म्हणून पाळण्यास भाग पाडतो. परंतु बिगरहिंदूंना त्यांचा धर्म जातींविषयी तोच दृष्टिकोन पाळण्यास भाग पाडत नाही.’

आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी कामगार वर्गाला चेतावण्याकरता कार्ल मार्क्‍स म्हणाला होता, ‘तुम्हाला तुमच्या बेडय़ांशिवाय काहीच गमवावे लागणार नाही.’ परंतु काहींना अधिक तर काहींना कमी असे वेगवेगळ्या जातींमध्ये सामाजिक व धार्मिक अधिकार अशा कौशल्यपूर्ण रीतीने विभागलेले आहेत की त्यामुळे मार्क्‍सची घोषणा हिंदूंना जातीपद्धतीविरुद्ध चेतवण्यास निरुपयोगी ठरते.’ या पुस्तकात आंबेडकरांनी धर्माबद्दल जी मांडणी केली आहे त्यातील एक परिच्छेद तर जसाच्या तसा द्यायचा मोह होतो आहे, पण जागेअभावी तो टाळतो.

आंबेडकरांचे विचार खरेखुरे क्रांतिकारक आहेत. त्यांनी हिंदू धर्म आणि जातिव्यवस्था याचं नीट विच्छेदन केलं आहे. कुठल्याही मांडणीवर – विशेषत: सामाजिक संरचनेबाबतच्या मांडणीवर – चर्चा होऊ शकते. कारण काही धागे सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आंबेडकरांच्या मांडणीबाबतही संभवू शकेल. परंतु कनिष्ठ जातीत जन्मल्याचे अनेक चटके भोगत, त्यातून स्वत:ला निग्रहपूर्वक उचलून घेत, सततच्या अभ्यासाने तर्कशक्ती विकसित करत परिवर्तनाचा पाया रचणाऱ्या आंबेडकरांचं विचारदर्शन थक्ककरणारं आहे, त्यांच्याविषयी आदर जागवणारं आहे. या पुस्तकाच्या अखेरीस गांधीजींनी ‘हरिजन’मध्ये आंबेडकरांच्या निबंधावर केलेल्या दोन टिप्पण्या आणि आंबेडकरांचं त्यावरील उत्तरही समाविष्ट करण्यात आलं आहे. ही चर्चाही वाचण्यासारखी आहे.

इथवर सगळं ठीक आहे. जात व धर्म यांबाबतचं आकलन वाढवण्यासाठी आंबेडकरांचं वाचन टाळणं अशक्यच आहे, पण प्रश्न पुढे आहे. प्रश्न ‘आपला’ आहे. ‘जात’ ही आजही व्यक्तीची ओळख म्हणून उभी आहेच. तेव्हा जातीसमोर हार मानायची की जातिअंतासाठीचे मार्ग शोधत राहायचं? ‘आपण’ काय करायचं? मी जेव्हा माझं आडनाव लावणं बंद केलं तेव्हा आईचं नाव पुढे यायच्या आनंदाबरोबरच आपण जातीला किंचितसा-अगदी किंचितसा धक्का दिला हाही आनंद होता. पण जात ही चीज नावाव्यतिरिक्त खाणं-पिणं, कपडे, भाषा, काही सवयी अशा रूपांनीसुद्धा जिवंत असतेच. ती मनात जिवंत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती लग्नामुळे जिवंत ठेवली जाते. आपल्याकडे विवाहसंस्था ही जातिसंस्थेची रक्षक आहे असं म्हणणं वावगं होणार नाही. मग या पहिलवानाला लोळवायचं कसं?

जातिव्यवस्थेने केलेली गोची अशी आहे की तिने व्यक्तीला समूहभान दिलं आहे. जे आदिम टोळीसमूहाशी मिळतंजुळतं आहे. आधुनिक काळातील व्यापक समाजभान, राष्ट्रभान आणि अंतिम म्हणजे वैश्विक मनुष्यभान या सगळ्यावर ते कडी करतं. त्यामुळे आपली ओळख, अस्मिता या बाबींशी जोडलं गेलेलं हे भान काढणं फार अवघड आहे. इतर अनेक महत्त्वाच्या बाबतीत भानावर नसणारे आपण जातीबाबत मात्र फारच भानावर असतो! यातली व्यावहारिक बाजू हीच आहे की जात ही एक ‘फंक्शनल’ (कार्यशील, ज्याचा परिणाम रोजच्या जगण्यावर होतो अशी) गोष्ट आहे. जातीशी जोडलेली ‘विवाह’ हीदेखील एक ‘फंक्शनल’ गोष्ट आहे. व्यवस्था सुरळीत चालवायची तर मग खाणं-पिणं, सवयी, साधारण वृत्ती, श्रद्धा याबाबत आपल्यासारख्याच समूहातील मुलगा किंवा मुलगी निवडणं लोकांना श्रेयस्कर वाटतं. (इंग्लिशमध्ये ‘नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन एंजल’ असा एक वाक्प्रचार आहे. त्याची आठवण झाली.) पण या सोयीबरोबर संकुचितताही येते, वृथा अभिमान येतो आणि समाज विखुरला जातो.

मला असं वाटू लागलं आहे की एकूण विचार करता, जातीच्या पहिलवानाची ताकद लक्षात घेता त्याच्याशी थेट दोन हात करणं जिथे जड जात असेल तिथे त्याला अशक्त कसं करता येईल हे पाहावं. त्याला जो खुराक लागतो तो कमी करत न्यावा. मग एके दिवशी तो संपेल. विलास सारंग म्हणतात तसं ‘जात ही नेणिवेचा भाग बनली असेल, जातिभान हे आपल्या जनुकांचा भाग बनलं असेल तर काही शे – हजार वर्षांच्या या जाणिवेच्या अंगवळणी पडलेल्या भागाला काढून टाकायला कदाचित तेवढाच काळ जावा लागेल.

आज जातवास्तव राजकीय कारणांमुळे आणि सामाजिक वैरभाव म्हणूनही प्रखर होत असलं तरी जातींच्या आघाडीवर अगदीच अंधार आहे असंही नाही. विशेषत: तांत्रिक, आर्थिक आघाडीवरील बदल जातवास्तवाला थोडं थोडं हलवत आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याची कक्षाही विस्तारते आहे. आंतरजातीय विवाह होत आहेत. त्यामुळे आशेच्या जागा दिसतात. पण नवतेला रोखण्याची ताकद जातवास्तवात अजूनही आहे. त्यामुळे आव्हान मोठं आहेच. त्यासाठी वेगवेगळ्या व्यूहरचना हव्या आहेत आणि मुख्य म्हणजे जात-धर्माच्या पोलादी पकडीतून येणारा हळवेपणा, व्यक्तिस्वातंत्र्याविषयीची भीती/तिरस्कार/अढी हे सगळं नाकारू शकणारं मन हवं आहे. सोबतीला आंबेडकर आहेतच!

utpalvb@gmail.com

chaturang@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 12:03 am

Web Title: caste system in india
Next Stories
1 गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा
2 गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा
3 मध्यंतरातील संवाद
Just Now!
X