आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल‘ माधुरी दीक्षित आज ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. १५ मे १९६७ साली माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते. तिला लहाणपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण, ती पूर्ण न झाल्याने तिने आपला जीवनसाथी डॉक्टरच निवडला. माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला. १७ ऑक्टोबर १९९९ साली माधुरी विवाहबद्ध झाली. माधुरी आणि श्रीराम यांना अरिन व रयान ही दोन मुले आहेत. लग्नानंतर भारत सोडून गेलेली माधुरी २०११ साली पुन्हा एकदा मुंबईत स्थायिक झाली. वय हा माझ्यासाठी एक निव्वळ आकडा आहे, असे माधुरी म्हणते. माधुरीचे लाखो चाहते आहेत आणि त्यापैकीचं एक म्हणजे एम.एफ.हुसैन. बॉलीवूडमध्ये सुरुवातीच्या काळात माधुरी आणि संजय दत्त यांच्यात प्रेमसंबंध असल्याची अफवा होती. माधुरीने १९८४ साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. माधुरीला बॉलीवूडमध्ये स्थान मिळवून देणारा सिनेमा म्हणजे १९८८ साली प्रदर्शित झालेला तेजाब. बॉक्स ऑफिसवर माधुरीचा हा पहिला हिट चित्रपट होता. या चित्रपटाकरिता तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९८९ साली तिने सुभाष घईंचा राम लखन चित्रपट केला. यात ती पुन्हा एकदा अनिल कपूरसोबत दिसली. यानंतर तिने मिथुन चक्रवर्तीसह प्रेम प्रतिज्ञा हा चित्रपट केला. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली."परिंदा" (१९८९), "त्रिदेव" ( १९८९), "किशन कन्हय्या" (१९९०) आणि "प्रहार" (१९९१), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. माधुरी आणि संजय दत्तने खलनायक, साजन, महानता, खतरो के खिलाडी, ठाणेदार, इलाका या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. २००० साली प्रदर्शित झालेल्या पुकार चित्रपटात माधुरीने खलनायिकेची भूमिका स्वीकारली. माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान ही बॉलीवूडमधील एक यशस्वी जोडी आहे. २००२ साली देवदास प्रदर्शित झाल्यानंतर आपल्या मुलांची देखभाल करण्याकरिता तिने चित्रपटसृष्टीपासून लांब राहणे पसंत केले. चार वर्षांच्या मध्यांतरानंतर माधुरीने २००७ साली आजा नचले चित्रपटाने पुनर्पदार्पण केले. देढ इश्किया आणि गुलाब गँग या चित्रपटांमध्येही ती झळकली. गुलाब गँगमध्ये माधुरीसह जुही चावलाने काम केले होते. माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक ), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील तिने केलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली. प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार बिरजू महाराज यांनी माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट नृत्यांगणा असल्याचे म्हटले आहे. माधुरीने झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोचे परिक्षक पदही भूषविले. ये जवानी है दिवानी चित्रपटात तिने रणबीरसह आयटम नंबरही केला होता. माधुरीने यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यात तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”