महत्त्वकांक्षी ‘कोस्टल रोड’चं काम कसं सुरूये?, पहा फोटो
- 1 / 10
कोस्टल रोड हा शब्द मुंबईकरांसाठी नवीन राहिलेला नाही. मराठीत सांगायचं झालं, तर सागरी किनारा मार्ग. समुद्रात भराव टाकून हा रस्ता तयार केला जात असून, वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तर या प्रकल्पाचं काम कुठपर्यंत आलंय असा प्रश्नही अनेकांना पडलेला आहे. (सर्व फोटो : गणेश शिर्सेकर)
- 2 / 10
महापालिकेचा बहुचर्चित प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम आतापर्यंत १७ टक्के पूर्ण झाले असून, या कामासाठी आतापर्यंत १,२८१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. न्यायालयीन प्रकरणं आणि टाळेबंदी यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत पुढे गेली आहे.
- 3 / 10
हा प्रकल्प आता जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.
- 4 / 10
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत महापालिके तर्फे हा सागरी किनारा मार्ग तयार केला जात आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर असणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रचंड मोठा व गुंतागुंतीचा प्रकल्प गेल्या वर्षभरात रखडला होता.
- 5 / 10
कामाच्या सुरूवातीलाच पाच वर्षांत म्हणजेच २०२२ पर्यंत या प्रकल्पाचं काम पूर्ण होण्याचा उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. मात्र जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे सात महिने या प्रकल्पाचे काम पूर्ण थांबले होते. तसेच त्यानंतर टाळेबंदीमुळे हे काम रखडले होते.
- 6 / 10
मागील दोन महिन्यांपासून या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर समुद्रात भराव टाकून जमीन तयार केली जात आहे. त्यापैकी १७५ एकर (७०.८२ हेक्टर) जमीन आतापर्यंत भराव घालून तयार करण्यात आली आहे.
- 7 / 10
या मार्गासाठी अजून १०२ एकर (४१.२८ हेक्टर) पर्यंत भराव घालावा लागणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सध्या प्रकल्पासाठी भराव टाकणे, पाइलिंग, बोगदा खणणारी मशीन जमिनीखाली उतरवणे, गर्डरची कास्टिंग आदी कामे सुरू आहेत.
- 8 / 10
प्रस्तावित कोस्टल रोड ४ + ४ लेन भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत. प्रकल्प तीन पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे.
- 9 / 10
पॅकेज ४ प्रिंसेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते प्रियदर्शिनी पार्क (४.०५ कि.मी.) यादरम्यान उभारण्यात येणार आहेत. पॅकेज १ मध्ये प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस (३.८२ कि.मी.), पॅकेज २ बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक (२.७१ कि.मी ), कोस्टल रोडची एकूण लांबी १०.५८ कि.मी. इतकी असणार आहे. या मार्गावरील बोगद्याची लांबी प्रत्येकी २.०७२ कि.मी. आहे. त्याचबरोबर भूमिगत कार पार्कसाठी ४ जागा आरक्षित आहेत. बोगदा खणण्याचे काम ७ जानेवारीपासून सुरू झालेलं आहे.
- 10 / 10
या प्रकल्पासाठी मलबार हिल टेकडी, गिरगाव चौपाटी खालून समांतर असे दोन सर्वात मोठे भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्याकरीता खास चीनहून बोगदा खणणारे यंत्र (टीबीएमचा) आणण्यात आले असून, ती ४०० मीटर लांब व १२.१९ मीटर (३९.६ फू ट) व्यासची आहे. जो भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचा टीबीएम आहे. १०० सुट्या भागांमध्ये असलेल्या या अवाढव्य यंत्राची जुळवणी पूर्ण झाली असून, भराव घातलेल्या जमीनीवर हे यंत्र उभे आहे. या यंत्राचे मावळा असे नामकरण करण्यात आले आहे.