
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे बहुमत गमावलेल्या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीसाठी स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर रात्री ९.३० वाजता फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याची घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला असल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून शक्तीपरीक्षा टळली आहे. जाणून घेऊयात यासंबंधी १२ महत्वाचे मुद्दे…

१) “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आपण आदर करतो. लोकशाहीचं पालन झालंच पाहिजे,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी आपण मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यानंतर त्यांनी राजभवन गाठलं आणि राज्यपालांकडे राजीनामा सोपवला.

२) बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेकडे फक्त १५ आमदारांचं संख्याबळ राहिलं होतं. ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याच्या भाजपाच्या पत्रानुसार राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. या बहुमत चाचणीस शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत स्थगितीची किंवा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.

३) सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना बहुमत चाचणीचा निकाल ११ जुलै रोजी आपल्या निकालाच्या अधीन असेल असं स्पष्ट केलं होतं. ११ जुलैला सुप्रीम कोर्ट बंडखोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय देणार आहे.

४) बहुमत चाचणीला स्थगिती मिळवत उद्धव ठाकरे सरकार टिकवण्यासाठी अजून वेळ मिळवण्याचा प्रयत्न करत होते. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात त्यांच्याच पक्षातील ५५ पैकी ३९ आमदारांनी बंड पुकारलं आहे.

५) शिंदे गटाकडून आपल्याकडे बहुमत असून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जात आहे. तसंच सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडावं अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते.

६) सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेचा दाव करणार असून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली जाणार आहे.

७) आठ दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि काही आमदारांसोबत मुंबईहून सूरत गाठलं. यानंतर दुसऱ्या दिवशी ते गुवाहाटीसाठी रवाना झाले. भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये बंडखोर आमदार वास्तव्यास असल्याने या बंडामागे भाजपाच असल्याची शंका उपस्थित होऊ लागली. सूरतमध्ये असताना मिलिंद नार्वेकर बंडखोर आमदारांच्या भेटीसाठी पोहोचले होते.

८) गुवाहाटीत पोहोचल्यानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदारांची संख्या ३९ वर पोहोचली. यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याचं स्पष्ट झालं होतं.

९) भाजपा आणि काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळून शिंदे गटाचं संख्याबळ महाविकास आघाडीपेक्षा जास्त आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेली युती ही विचारसरणीच्या विरोधात असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे. याशिवाय उद्धव ठाकरे कधीही पक्षातील नेते, आमदारांसाठी उपलब्ध होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. यावर आदित्य ठाकरेंनी प्रकृती ठीक नसतानाही सतत काम केल्याचा युक्तिवाद केला होता.

१०) बंड पुकारण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला होता. यावेळी त्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची हाव नसल्याचं बंडखोरांना उद्देशून म्हटलं होतं. उद्धव ठाकरे त्याच दिवशी राजीनाम्याची घोषणा करणार होते, पण शरद पवार यांनी त्यांना रोखलं होतं अशी माहिती आहे.

११) “कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू,” अशी भावनिक साद उद्धव ठाकरेंनी आमदारांना केली होती.

१२) यावर एकनाथ शिंदे यांनी “एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?,” असा प्रश्न विचारला होता.