-
सुरेश कलमाडी हे नाव जवळपास १० ते १२ वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याला कारण ठरले आहेत सुरेश कलमाडी यांचे पुण्यातील काही फोटो.
-
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांनी नुकतीच पुणे महानगर पालिकेला भेट दिली. यावेळचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
हे फोटो व्हायरल होण्यामागे सुरेश कलमाडी यांचा कमालीचा बदललेला लुक आणि मोठ्या कालखंडानंतर त्यांच्या राजकीय पुनरागमनाच्या चर्चा कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे.
-
पुणे महानगर पालिका निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आधी करोना आणि नंतर ओबीसी आरक्षणासारख्या मुद्द्यांमध्ये अडकलेल्या निवडणुकांना मुहूर्त सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश कलमाडींनी पुणे महानगर पालिकेला दिलेली भेट चांगलीच चर्चेत आली आहे.
-
कधीकाळी पुणे महानगर पालिका म्हणजे सुरेश कलमाडी असंच समीकरण मांडलं जायचं. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडींचं नाव मोठं होतं. पण २०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील भ्रष्टाचार प्रकरणात सुरेश कलमाडींचं नाव आलं आणि सगळी गणितंच बदलली.
-
सुरेश कलमाडींना या प्रकरणी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने कारावासाची शिक्षा देखील सुनावली होती. या प्रकरणी कलमाडींनी ९ महिने कारावास देखील भोगला होता.
-
या प्रकरणामुळे तत्कालीन यूपीए अर्थात काँग्रेस प्रणीत आघाडी सरकारची बरीच नाचक्की देखील झाली. त्यानंतर अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान सुरेश कलमाडींचं नाव आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा भ्रष्टाचार प्रकरणावरून तत्कालीन केंद्र सरकारला लक्ष्य देखील करण्यात आलं होतं.
-
या सगळ्या प्रकरणानंतर कलमाडी जणूकाही राजकीय विजनवासातच गेल्याचं बोललं जाऊ लागलं. सक्रीय राजकारणातून जवळपास सुरेश कलमाडींनी काढता पाय घेतला होता. मात्र, शुक्रवारी अर्थात ५ ऑगस्ट रोजी अचानक कलमाडी पुणे महानगर पालिकेत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
-
पांढरे झालेले केस, हातात आधारासाठी काठी अशा पूर्णपणे बदललेल्या रुपात सुरेश कलमाडी पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले.
-
गेल्या काही वर्षांपासून ते शहराच्या राजकारणापासून अलिप्त राहिले होते. मात्र कलमाडी यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतल्याने ते पुन्हा सक्रिय होतील, अशी चर्चा शहराच्या राजकारणात सुरू झाली आहे.
-
कलमाडी यांच्याकडून दरवर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान पुणे फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. काही दिवसांपूर्वी फेस्टिव्हलच्या नियोजन बैठकीतही कलमाडी उपस्थित होते. या फेस्टिव्हलचे निमंत्रण आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी कलमाडी महापालिकेत आले होते.
-
दहा वर्षानंतर महापालिकेत आल्याने प्रदीर्घ वर्षानंतर महापालिकेत आलात, असा प्रश्न कलमाडी यांना विचारण्यात आला तेंव्हा आता मी कायम येत राहीन, असे उत्तर त्यांनी यावेळी दिल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
-
कधीकाळी कलमाडी यांच्या आदेशानुसारच काँग्रेस पदाधिकारी, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत होत्या. कलमाडी हाऊस हे सत्ता केंद्र झाले होते. पुण्याचे कारभारी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धा प्रकरणानंतर पुण्यावरील त्यांची पकड पूर्णपणे संपुष्टात आली.
-
काही वर्षांपूर्वी कलमाडी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत गणपती विसर्जन मिरवणुकीला उपस्थित होते. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या पुणे पालिकेतील उपस्थितीमुळे ते चर्चेत आले आहेत.
-
सुरेश कलमाडी यांच्या रुपाने काँग्रेस पुणे महानगर पालिकेमध्ये पुन्हा एकदा राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान