
क्रिकेट या खेळाने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत क्रिकेटर म्हणून नावारुपाला आलेले अनेक क्रिकेटपटू आहेत.

पृथ्वी शॉदेखील त्यापैकीच एक आहे. त्याने क्रिकेटर म्हणून नावारुपाला येण्यापूर्वी खूप मेहनत घेतलेली आहे.

लहानपणीच आईचे निधन झाल्यामुळे वडील पंकज शॉ यांनीच पृथ्वी शॉला सांभाळले.

क्रिकेटची आवड असल्यामुळे पृथ्वी शॉ विरार ते चर्चगेट असा प्रवास करुन क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव करायचा.

सध्या पृथ्वी शॉने त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत.

यातील एका फोटोमध्ये पृथ्वी शॉचे वडील दुचाकी चालवताना दिसत आहेत. तर वडिलांच्या मागे पृथ्वी शॉ बसलेला दिसतोय. पृथ्वीचे वडील त्याला क्रिकेटच्या सरावासाठी घेऊन जात असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.

तर दुसऱ्या फोटोमध्ये पृथ्वी शॉने एका अलिशान कारचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचे वडीलही दिसत आहेत.

म्हणजेच जुन्या दुचाकीपासून सुरु झालेला पृथ्वी शॉचा प्रवास महागड्या बीएमडब्ल्यू कारपर्यंत येऊन पोहोचला आहे.

पृथ्वी शॉच्या वडिलांनी मोठी मेहनत घेतल्यामुळेच हे शक्य झाले. याच कारणामुळे पृथ्वी शॉने एक लहाणपणीचा आणि एक सध्याचा फोटो शेअर करत त्याच्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

तसेच त्याने आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पृथ्वी शॉचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. सध्या तो आयपीएल २०२२ या पर्वात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असून विषमज्वरमुळे काही सामने खेळू शकलेला नाही.

त्याने या हंगामात ९ सामन्यांमध्ये २५९ धावा केल्या आहेत.