
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात उत्तर सभा घेतली.

शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून लक्ष्य ठरलेल्या राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली़ त्यात त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद बोकाळला, या वक्तव्याचा राज यांनी पुनरुच्चार केला.

भोंग्याविरोधातील आपल्या भूमिकेला अधोरेखित करत ३ मे रोजी ईद आहे तोपर्यंत भोंगे उतरवण्याचा इशारा राज यांनी दिलाय.

या भाषणामध्ये राज यांनी प्रामुख्याने शरद पवारांवर टीका केल्याचं दिसून आलं. ते शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊय़ात…

‘शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, असे म्हणतात पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

“मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत’’, अशी टीका राज यांनी केली़.

छत्रपतींच्या नावाने राजकारण करण्यासाठी आणि माथी भडकाविण्यासाठी राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांची निर्मिती केल्याचा आरोपही राज यांनी यावेळी केला.

शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत. ते धर्म, देव मानत नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले.

देव, धर्म मानत नाहीत या पद्धतीनेच ते (पवार) राजकारण करण्याचा प्रयत्न करतात़ त्यामुळे मी जातीवाद भडकवतो आणि भूमिका बदलतो, यावर पवारांनी बोलावे का, असा सवाल राज यांनी केला.

विदेशी व्यक्ती पंतप्रधान नको, या मुद्यावर शरद पवार हे १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर मात्र ते काँग्रेसबरोबर जाऊन कृषीमंत्री झाले, अशी आठवण राज यांनी करुन दिली.

पवारांनी आतापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या, असेही राज म्हणाले.

हिंदूत्वाचा मुद्दा मनसेने आधीपासूनच घेतला होता, असे सांगत राज यांनी पाकिस्तानी कलाकारांविरोधातील भूमिका आणि रझा अकादमीविरोधातील सभेची आठवण करून दिली.

‘पवार खूश झाल्यावर भीती वाटते, हे मी यापूर्वीच म्हणालो होतो,” असंही राज म्हणाले.

“संजय राऊत यांच्यावर पवार आता खूश आहेत. त्यामुळे ते त्यांना कधी टांगतील हे कळणार नाही,’’ असे राज म्हणाले.

‘‘ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅ्क बदलला असा माझ्यावर आरोप होत आहे. पण मी ट्रॅ्क बदललेला नाही. कोणत्याही नोटिसा येऊद्या, मी त्यांना भीक घालत नाही’’ असेही ते म्हणाले.

यापूर्वीच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज यांनी शरद पवारांवर जातीपातीचं राजकारण केल्याचा आरोप केला होता.

१९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण वाढल्याची टीका राज यांनी केली होती.

शऱद पवार हे जातीपातीचं राजकारण करत असल्याचा आरोप करताना या असल्या राजकारणामुळे राज्याचं नुकसान होत असल्याचा दावा राज यांनी केला होता.

जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत असून त्यातून त्याला बाहेर काढण्याची वेळ आली आहे, असं राज पवारांवर निशाणा साधताना म्हणाले.

अन्य राज्ये प्रगती करत असताना महाराष्ट्र मात्र जातीच्या राजकारणात खितपत पडला आहे, असा टोलाही राज यांनी शरद पवारांसंदर्भात टीका करताना लगावला होता.