Bihar Loksabha Election 2024 बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत ४० पैकी ३९ जागा एनडीएने जिंकल्या होत्या. बिहारमध्ये जातीआधारित राजकारण आहे. प्रत्येक पक्ष जातीय समीकरणानुसार आपल्या उमेदवाराला तिकीट देतो. विशेष म्हणजे याच जातीय समीकरणामुळे २००९ पासून, बिहारच्या ४० लोकसभा जागांपैकी किमान १७ जागांवर एकाच जातीचे उमेदवार निवडून येत आहेत. या १७ लोकसभा जागांवरील आठ जागांवर राजपूत, भूमिहार, ब्राह्मण आणि कायस्थ या उच्च जातींमधील उमेदवार निवडून येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहारमधील जातीय समीकरण

-महाराजगंज, वैशाली, औरंगाबाद आणि आरा

महाराजगंज, वैशाली, औरंगाबाद आणि आरा या तीन जागा गेल्या निवडणुकांमध्ये राजपूत उमेदवारांनी जिंकल्या. महाराजगंज या जागेवर २००९ मध्ये आरजेडीचे उमाशंकर सिंह आणि २०१४ व २०१९ मध्ये भाजपाचे जनार्दन सिंह सिग्रीवाल निवडून आले. यंदादेखील भाजपाने सिग्रीवाल यांना उमेदवारी दिली आहे. वैशालीची जागा २००९ मध्ये आरजेडीच्या रघुवंश प्रसाद सिंह यांनी जिंकली होती. २०१४ मध्ये ही जागा भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या एलजेपीच्या रमा किशोर सिंह आणि २०१९ मध्ये वीणा देवी यांनी जिंकली होती. या जागेवरून वीणा देवी पुन्हा एकदा एनडीएच्या उमेदवार आहेत. आरा जागा २००९ मध्ये जेडी(यू) च्या मीना सिंह यांनी जिंकली होती, तर २०१४ पासून, भाजपाचे आर.के. सिंह यांनी या जागेवर प्रतिनिधित्व केले आहे. यंदादेखील भाजपाने आर.के. सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा : ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?

बिहारचे चित्तोडगड (राजस्थानमधील पूर्वीचा राजपूत बालेकिल्ला) म्हणून ओळखली जाणारी औरंगाबादची जागा एकेकाळी प्रख्यात राजपूत नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्या कुटुंबाशी संबंधित होती. सत्येंद्र नारायण सिन्हा १९५२, १९७१, १९७७, १९८० आणि १९८४ मध्ये ही जागा जिंकली होती. त्यांची सून श्यामा सिन्हा यांनी १९९९ मध्ये ही जागा जिंकली आणि त्यांचा मुलगा आणि दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त निखिल कुमार यांनी २००४ मध्ये या जागेवरून विजय मिळवला होता. २००९ पासून सुशील सिंह या जागेवर प्रतिनिधित्व करत आहेत.

-नवादा आणि मुंगेर

नवादा आणि मुंगेर या जागेवर भूमिहारांनी तीन वेळा विजय मिळवला आहे. २००९ मध्ये भाजपाचे भोला सिंह यांनी नवादा या जागेवरून विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपाचे गिरीराज सिंह आणि २०१९ मध्ये एलजेपीचे चंदन सिंह यांनी ही जागा जिंकली. यावेळी एनडीएने भाजपा नेते विवेक ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे, जे भूमिहार समाजाचे आहेत. मुंगेरमध्ये, २००९ साली जेडी(यू) चे लालन सिंह विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये एलजेपीच्या वीणा देवी यांनी ही जागा जिंकली. २०१९ मध्ये लालन सिंह यांनी ही जागा परत जिंकली आणि यंदा ते एनडीए चे उमेदवार आहेत.

-दरभंगा आणि पटना साहिब

दरभंगा या जागेवरून भाजपाचे ब्राह्मण उमेदवार गेल्या तीन वेळा विजयी झाले आहेत. २००९ आणि २०१४ मध्ये ही जागा कीर्ती आझाद यांनी जिंकली. त्यानंतर २०१९ मध्ये गोपालजी ठाकूर या जागेवरून निवडून आले. यंदाही ते दरभंगामधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पटना साहिब या जागेवर उच्चवर्णीय कायस्थांनी प्रतिनिधित्व केले आहे. २००९ आणि २०१४ मध्ये शत्रुघ्न सिन्हा (तत्कालीन भाजपाचे उमेदवार), तर २०१९ मध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान उमेदवार रविशंकर प्रसाद यांनी ही जागा जिंकली. एका ज्येष्ठ जेडी(यू) नेत्याने सांगितले की, पक्षांनी जातीय समिकरणावरून मतदारसंघ निवडणे स्वाभाविक आहे. मात्र, राज्यात उच्चवर्णीयांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येपैकी ११ टक्के असूनही आठ मतदारसंघांवर उच्चवर्णीयांचे वर्चस्व आहे.”

-मधेपुरा, मधुबनी आणि पाटलीपुत्र यादवांचे

जेडी(यू) च्या शरद यादव यांनी २००९ मध्ये मधेपुरा ही जागा जिंकली होती, तर आरजेडीचे पप्पू यादव यांनी २०१४ मध्ये जेडी(यू) मध्ये प्रवेश करण्यापूर्वी या जागेवर विजय मिळवला होता. २०१९ मध्ये, जेडी(यू) चे दिनेश चंद्र यादव यांनी ही जागा जिंकली. “रोम पोप का, मधेपुरा गोप का (जसे रोम पोपचे आहे, तसे मधेपुरा यादवांचे आहे)” अशा घोषणेने मधेपुराचा संदर्भ दिला जातो.

मधुबनीची जागा २००९ आणि २०१४ मध्ये भाजपाचे हुकुमदेव नारायण यादव आणि २०१९ मध्ये त्यांचा मुलगा अशोक यांनी जिंकली होती. अशोक यांना भाजपाने पुन्हा रिंगणात उतरवले आहे. २००९ मध्ये लालू यादव यांचा पराभव करत जेडी(यू)चे रंजन यादव यांनी पाटलीपुत्र या जागेवर विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये लालू यांची मोठी कन्या मीसा भारती यांचा पराभव करून भाजपाचे राम कृपाल यादव यांनी ही जागा जिंकली होती.

-नालंदा, काराकाट आणि चंपारण

मोठ्या प्रमाणात ओबीसी कुर्मी लोकसंख्येमुळे नालंदाला कुर्मिस्तान म्हणून ओळखले जाते. नालंदा जागा २००४ मध्ये जेडी(यू) चे सर्वेसर्वा आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जिंकली होती. त्यानंतर जेडी(यू) कौशलेंद्र कुमार सलग तीनवेळा या जागेवरून विजयी झाले आहेत आणि यंदाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कुशवाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओबीसी कोइरी यांचे २००९ पासून काराकाट जागेवर वर्चस्व आहे. जेडी(यू) चे महाबली सिंह २००९ आणि २०१९ मध्ये या जागेवरून निवडून आले, तर २०१४ मध्ये ही जागा राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी जिंकली होती. कुशवाह हे आगामी निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार आहेत. ओबीसी जयस्वाल २००९ पासून पश्चिम चंपारण जागा जिंकत आले आहेत. भाजपाच्या संजय जयस्वाल यांनी सलग तीनदा ही जागा जिंकली. यावेळी चौथ्यांदा ते निवडून येण्याची अपेक्षा पक्षाला आहे.

-मुझफ्फरपूर

मुझफ्फरपूरमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) मल्लांचे वर्चस्व आहे; ज्यांना निषाद असेही म्हणतात. २००९ मध्ये ही जागा जेडी(यू) चे कॅप्टन जयनारायण निषाद यांनी जागा जिंकली. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांचा मुलगा आणि भाजपाचे उमेदवार अजय निषाद या जागेवरून निवडून आले. यंदा भाजपाने राजभूषण निषाद यांना उमेदवारी दिली. भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अजय यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मुझफ्फरपूरमध्ये यंदा निषाद विरुद्ध निषाद अशी लढत रंगणार आहे.

-समस्तीपूर आणि गया

अनुसूचीत जातीच्या उमेदवारांमध्ये पासवानांनी २००९ पासून अनुसूचीत जातीसाठी राखीव असलेली समस्तीपूर जागा जिंकली आहे. जेडी(यू) चे महेश्वर हजारी यांनी २००९ मध्ये ही जागा जिंकली होती. तर एलजेपी चे रामचंद्र पासवान (माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू) यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये या जागेवरून विजय मिळवला. रामचंद्र यांच्या मृत्यूनंतर, मुलगा प्रिन्स राज २०१९ मध्ये या जागेवरून निवडून आला. यावेळी, एलजेपीने जेडी(यू) मंत्री अशोक कुमार चौधरी यांची मुलगी संभवी चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांचा सामना काँग्रेसचे सानी हजारी यांच्याशी होण्याची शक्यता आहे, राज्यमंत्री महेश्वर हजारी यांचे पुत्र आहेत.

हेही वाचा : काश्मिरी पंडितांना आता ‘फॉर्म एम’शिवाय करता येणार मतदान; आजवर का होती याची आवश्यकता?

अनुसूचीत जातीसाठी राखीव असलेल्या गया जागेवर, २००९ पासून मांझी यांनी विजय मिळवला आहे. २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत या जागेवरून, भाजपाचे हरी मांझी विजयी झाले होते, त्यानंतर २०१९ मध्ये जेडी(यू) चे विजय कुमार मांझी यांनी ही जागा जिंकली. यावेळी एनडीएने जीतन राम मांझी यांना उमेदवारी दिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 loksabha seat bihar won by same caste rac