मुंबई : वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा पुढील आठवड्यात रोड शो आयोजित करण्यात आला आहे तर शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार असल्याचे सांगण्यात आले.

वायव्य मुंबईत दोन्ही सेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. कीर्तीकरांच्या प्रचारात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते तर वायकरांच्या प्रचारात भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. वायकर यांच्या उमेदवारीला सुरुवातीला विरोध करणाऱ्या मनसेच्या शालिनी ठाकरे वर्सोव्यातील प्रचारफेरीत सामील झाल्या होत्या. अलीकडेच शिंदे गटात गेलेले काँग्रेसचे नेते संजय निरुपम हेही सहभागी झाले होते. वायकर यांनी प्रामुख्याने भाजप आमदार असलेल्या अंधेरी पश्चिम, वर्सोवा आणि गोरेगाव या विधानसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. जोगेश्वरी या स्वत:च्या मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात प्रचार करण्याचे ठरविले आहे. वायकर यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वायव्य लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे हजर होते. आपण वायकर यांचा प्रचार करणार असे ते सांगत असले तरी प्रचारात ते दिसत नाहीत. त्यांचे वय झाले असल्यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन आम्हीच त्यांना आराम करण्यास सांगत आहोत, असे वायकर यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘मोकळ्या’ केजरीवालांच्या तावडीत आता भाजपचे सावज!

हेही वाचा – रायबरेलीत प्रचार करताना प्रियांका गांधी का काढत आहेत १९२१ च्या हत्याकांडाची आठवण?

कीर्तीकर यांच्या आतापर्यंत दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम व पूर्वेतील प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. अंधेरी पूर्वेतील प्रचारसभेत ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके, सुनील प्रभू यांच्यासह अलीकडेच ठाकरे गटात आलेले दिलीप माने आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कीर्तीकर यांनी प्रामुख्याने प्रचार फेरी आणि बैठकांवर भर दिला आहे. त्यांच्यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे रोड शो करणार आहेत तर आपण विजयी मेळाव्याला येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करुन टाकल्याचे कीर्तीकर यांनी सांगितले.