“स्मृती इराणींना माझ्याविरुद्ध जे काही अपमानास्पद बोलायचे असेल, ते त्यांनी बोलावे; मात्र, मी त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद बोलणार नाही”, असे मत अमेठी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा यांनी व्यक्त केले आहे. सोनिया गांधींचे पीए असल्याच्या आरोपांवरही त्यांनी उत्तर दिले आहे. आतापर्यंत पडद्यामागे काम करणाऱ्या किशोरी लाल यांना अमेठीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधला आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये स्मृती इराणींकडून राहुल गांधींचा पराभव का झाला आणि त्यावेळी काँग्रेसचे नक्की काय चुकले, याबाबतही त्यांनी आपली मते मांडली आहेत.

अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने बराच वेळ घेतला. हे दोन्ही मतदारसंघ गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ मानले जातात. रायबरेलीतून प्रियांका गांधी यांना आणि अमेठीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी चर्चा होती. सरतेशेवटी रायबरेलीतून राहुल गांधी यांना; तर अमेठीमधून किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. किशोरी लाल शर्मा ४० वर्षांपासून अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांमधील निवडणुकांची रणनीती ठरविण्यामध्ये योगदान देत आले आहेत. ४० वर्षांपासून तुम्ही गांधी घराण्यासाठी या मतदारसंघातील प्रचाराचे नियोजन पाहत आहात, यावेळी काय वेगळेपण आहे, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, “माझ्यासाठी तरी काहीच नवीन नाही. यंत्रणा तीच आहे. मी एकट्याने आजवर काही केलेले नाही. मी माझ्या टीमबरोबर काम केले आहे. याच टीमने आताही जबाबदारी घेतलेली आहे. २५-३० वर्षांपासून ही टीम माझ्याबरोबर काम करते आहे. माझी टीम तीच आहे आणि त्यांना अनुभवही खूप मोठा आहे. काही वेळा ते असेही सांगतात की, यावेळी परिस्थिती वेगळी आहे आणि आपल्याला काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. जे योग्य असेल ते करण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे आणि मला त्यांच्या निर्णयांवर विश्वास आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये माझ्यासाठी काहीही बदललेले नाही.”

nashik lok sabha marathi newsnashik lok sabha marathi news
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही नाशिक जिल्ह्यात महायुतीत धुसफूस कायम
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Haryana BJP Congress Independent MLA BJP government in Haryana about to collapse
हरियाणात सरकार अल्पमतात येऊनही भाजपा एवढी निर्धास्त का?
sharad pawar raj thackeray
“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”, शरद पवारांचा टोला, ‘त्या’ टीकेवर दोन वाक्यात प्रत्युत्तर
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
richest loksabha candidate
५,७०५ कोटींची संपत्ती, ब्रँडेड गाड्या अन् बरंच काही! कोण आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार?

हेही वाचा : राहुल गांधींचे निवडणुकीच्या घोषणेपासून अदाणी-अंबानींवर मौन, पंतप्रधान मोदींच्या या दाव्यात किती सत्य?

या निवडणुकीमधील परिस्थिती वेगळी असण्याबाबत त्यांनी भाष्य केले. तसेच उमेदवारीही नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणींच्या तुलनेत त्यांना प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला. पाच वर्षांपूर्वी स्मृती इराणींनी राहुल गांधींचा पराभव केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे कसे पाहता, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, “अमेठीच्या लोकांना गेल्या निवडणुकीमध्ये आपण चूक केली असून, ती आता सुधारण्याची गरज असल्याची जाणीव झाली आहे. आपण कुठे कमी पडलो आहोत वा लोक आपल्यावर नाराज आहेत का, याचा शोध घेण्यासाठी अमेठीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी मला या मतदारसंघाचा आढावा घेण्यास सांगितले होते. त्यामध्ये मला दोन गोष्टी आढळून आल्या. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे भाजपा सरकारकडून प्रचंड दबाव होता आणि आमच्या कार्यकर्त्यांचा छळही झाला. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडूनही काही त्रुटी राहिल्या होत्या.”

२०१९ च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या त्रुटी कोणत्या, या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “आम्ही त्या निवडणुकीमध्ये देखरेख करण्यात कमी पडलो. कार्यकर्ते कुठे गेले आहेत आणि काय काम करत आहेत, याची चौकशी करणारे कुणीही नव्हते, असे कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने प्रचार केला असता, तर ५५ हजारचे मताधिक्य आम्ही सहज भरून काढू शकलो असतो.”

या निवडणुकीमध्ये किशोरी लाल शर्मा यांच्यावर विविध प्रकारचे आरोप भाजपाकडून करण्यात येत आहेत. ज्यांच्यामुळे पराभव झाला, त्यांनाच उमेदवार केल्याचा आरोप भाजपाकडून केला जातो आहे. त्याबद्दल मत विचारले असता, ते म्हणाले, “भाजपाने आधी वास्तव समजून घेतले पाहिजे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये मी अमेठीमध्ये नव्हतोच. मी रायबरेलीच्या निवडणुकीमध्ये होतो आणि तिथल्या प्रचाराचे नियोजन करीत होतो. येथे एक स्वतंत्र टीम काम करीत होती.”

गांधी घराण्याचा शिपाई वा नोकर, अशी भाषा तुमच्याबद्दल वापरली गेली आहे. तुम्ही याचा प्रतिवाद कसा करणार आहात, यावर ते म्हणाले, “मी कोण आहे, याची माहिती अमेठी आणि रायबरेलीतील लोकांना आहे. जे अशा भाषेत माझ्याविषयी बोलत आहेत, त्यांनाही याबाबत माहीत आहे. मी पगारी नोकर नसून राजकीय व्यक्ती आहे. मी माझे खर्च स्वत: भागवतो. मी ‘फाईव्ह-स्टार’ पद्धतीचा माणूस नाही; त्यामुळे माझे खर्चही कमी आहेत. मी तळागाळातून काम करीत इथवर आलो आहे. बूथ वर्कर ते लोकसभेचा उमेदवार, असा माझा प्रवास आहे.”

पुढे आपल्या राजकीय प्रवासावर अधिक प्रकाश टाकत ते म्हणाले, “मी राजीव गांधींच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन १९८० साली युवा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी राजकीय कारकीर्द सुरू केली. १९८३ मध्ये राजीवजींनी २० कलमी कार्यक्रमाचे निरीक्षण करण्यासाठी काही युवा नेत्यांची निवड केली होती आणि मी त्यापैकी एक होतो. काही ब्लॉक्सची जबाबदारी माझ्यावर होती. अमेठीमध्येच माझे मन रमले आणि मग मी येथेच राहिलो.”
“काही लोक मला सोनिया गांधींचा पीए म्हणतात. पण, मी लोकप्रतिनिधी आहे; पीए नाही. मी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य असल्याचे फार कमी जणांना माहीत आहे. मी पंजाबचा स्टार प्रचारकही राहिलो आहे. मी २०१३ मध्ये AICC चा सदस्यही होतो. जेव्हा आम्ही बिहारमध्ये युती केली तेव्हा सी. पी. जोशी यांच्याबरोबर बिहारचा सहप्रभारी होतो. आम्ही त्यावेळी २७ जागांवर विजय मिळविला होता. हे लोक जर कोणताही गृहपाठ न करताच बोलत असतील, तर मी काय बोलणार,” असा सवालही त्यांनी केला.

अमेठीतील पक्षांतर्गत कलहाबाबत ते म्हणाले, “पक्षांतर्गत कलह असले तरी जेव्हा ते माझ्यापर्यंत येतात तेव्हा त्यावर मार्ग निघतो. मी त्यांचा मोठा भाऊ असल्यानं ओरडूही शकतो आणि प्रेमाने बोलूही शकतो. मी त्यांना सांगत असतो की, स्पर्धेसाठी गटबाजी ठीक आहे; मात्र त्याचा पक्षाला तोटा होता कामा नये. मी याबाबत त्यांना समजावत असतो. तरुणांबरोबर अधिक बोलावे लागते आणि ते समजूनही घेतात.”

हेही वाचा : ५,७०५ कोटींची संपत्ती, ब्रँडेड गाड्या अन् बरंच काही! कोण आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार?

किशोर लाल शर्मा निवडणूक लढविण्यासाठी तयार नव्हते, असेही म्हटले जात होते. अशा पार्श्वभूमीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय कसा मान्य केला, या प्रश्नावर ते म्हणाले, “अमेठीमधील लोकांच्या भावनांचा विचार करता, कार्यकर्त्यांना जे वाटत होते, तेच मलाही वाटत होते. मात्र, प्रियांका गांधी मला म्हणाल्या की, यावेळी निवडणूक तुम्हाला लढवावी लागेल. त्या मला म्हणाल्या की, किशोरीजी तुम्ही आमच्या परिवाराला अनेक निवडणुका लढवायला लावल्या आहेत. आता एक निवडणूक आम्हाला तुम्हालाही लढवायला लावायची आहे. मी ते मान्य केले. ते सगळेच प्रचार करण्यासाठी येथे येणार आहेत. प्रियांका गांधींनी तारखा दिल्या आहेत. राहुल गांधीही येतील.”

स्मृती इराणींनी फार आधीच प्रचार सुरू केला असून, त्यांच्याकडे तुलनेने कमी वेळ उपलब्ध आहे. त्यांच्याविरोधात काही आरोपही करण्यात आलेले आहेत. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “येथे स्मृती इराणींचे आव्हान नाही. मात्र, लोकांनी निर्णय घ्यायचा आहे. कठोर परिश्रम करणे ही आमची जबाबदारी आहे. आरोपांबाबत बोलायचे झाले, तर मी त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद असे काहीही बोलणार नाही. जर त्यांना माझ्याविरोधात अपमानास्पद काही बोलायचे असेल, तर त्यांनी खुशाल बोलावे. मात्र, मी त्याच पद्धतीची भाषा वापरू इच्छित नाही.”