लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अखेरच्या टप्प्यात सोमवारी मतदान होणाऱ्या मुंबई, ठाण्यातील दहा जागांवर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा समावेश असलेल्या महायुतीची कसोटी लागली आहे. मुंबई महानगरावरच महायुतीची सारी भिस्त अवलंबून आहे.
गेल्या वेळी मुंबईतील सहाही आणि ठाणे जिल्ह्यातील चारही जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबई, ठाण्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसेनेच्या मतांमध्ये आता विभाजन होणार आहे. या विभाजनाचा फटका ठाकरे आण शिंदे या दोन्ही गटांना बसणार आहे. भाजपची ताकद वाढली असली तरी भाजपला मुंबई, ठाण्यात शिवसेनेच्या मदतीची आवश्यकता आहे. यंदा भाजपने शिंदे गटाबरोबर युती केली आहे.
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत किती मुस्लीम उमेदवारांना राष्ट्रीय पक्षांनी दिली उमेदवारी?
मुंबईतील मराठी मते निर्णायक ठरतात. मराठी मते शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस अशी विभागली जात असत. मराठी मतांचा सर्वाधिक टक्का हा शिवसेनेला मिळत होता. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या मराठी मतांमध्ये विभाजन होणार आहे. शिवसेना शिंदे गट मराठी मतांमध्ये किती भागीदार होतो यावरही सारे अवलंबून आहे.
मुंबई, ठाण्यात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये अस्तित्वाची लढाई होत आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ठाणे, कल्याण या मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटात लढत होत आहे. कोण जास्त जागा जिंकेल त्या गटाला लोकांचा अधिक पाठिंबा आहे हे सिद्ध होईल. यामुळेच ठाकरे आणि शिंदे या दोघांनी सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राज्यात १३ मतदारसंघांमध्ये ठाकरे आणि शिंदे समोरासमोर ठाकले आहेत. ठाकरे गटाला अधिक जागा मिळाल्यास शिंदे गटासाठी भवष्यातील राजकारणासाठी ते त्रासदायक ठरू शकते.
हेही वाचा : दोन मुली निवडणूक रिंगणात, पण चर्चा लालू प्रसाद यादवांना ‘किडनी देनेवाली बेटी’ चीच!
मुंबई, ठाण्यातील निकालांवरून मुंबई महानगरात ठाकरे की शिंदे यांचे वर्चस्व अधिक हे स्पष्ट होणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर नेतेमंडळी शिंदे यांच्याबरोबर तर सामान्य शिवसैनिक ठाकरे यांच्या बरोबर, असा दावा केला जातो. शिंदे गटाने अधिक जागा जिंकल्यास ठाकरे गटासाठी तो धोक्याचा इशारा असेल.
हेही वाचा : पलटूराम विरुद्ध एकनिष्ठ! राजकीय हिंसाचारासाठी प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघात चुरशीची लढत
मुंबई, ठाण्यातील प्रचार नागरी समस्या, पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानाशी निगडीत प्रश्नांऐवजी हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणावरच अधिक झाला. मुस्लिमांचा शिवसेनेला मिळणारा पाठिंबा लक्षात घेता भाजपने जाणीवपूर्वक ठाकरे गटाबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या सभेत पाकिस्तानचे झेेंडे फडकविण्यात आल्याचा आरोप भाजपच्या मंडळीनी केला असला तरी त्याचा एकही पुरावा भाजपचे नेते सादर करू शकलेले नाहीत याकडे ठाकरे गटाकडून लक्ष वेधण्यात येत आहे. धार्मिक वळणावर गेलेल्या मुंबई, ठाण्यातील लढतीचा कोणाला फायदा होतो याची उत्सुकता आहे. भर उन्हात मुंबईत मतदान किती होते, लोकांमधील उत्साह हे सारे घटक निकालावर परिणाम करणारे आहेत.