ठाणे : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत भिवंडीत, मतदानाचा वाढलेला टक्का हा कुणाच्या पथ्यावर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर भाजपचा प्राबल्य असलेल्या मुरबाड, बदलापूर आणि शहापूर भागातील कुणबी मतदार कुणाची साथ देतात, यावर मतदार संघाचा निकाल अवलंबून आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघाची २०१९ मध्ये निवडणुक झाली. त्यावेळेस मतदार संख्या १८ लाख ५८ हजार २४७ इतकी होती. या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी १ लाख ५१ हजार मताधिक्याने विजय झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मतदार संख्येत वाढ होऊन ती २० लाख ८७ हजार ६०४ झाली. २ लाख २५ हजार मतदार संख्येत वाढ झाली. यामध्ये भाजपचा प्राबल्य असलेल्या मुरबाड विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच ४ लाख ४३ हजार ५ तर, कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात ४ लाख २७८ मतदारांचा समावेश आहे. शहापूर विधानसभा क्षेत्रात २ लाख ७९ हजार १७६ मतदार आहेत. यातील मुरबाड, शहापूर आणि बदलापूर पट्टयात कुणबी समाज मोठ्याप्रमाणात वास्तव्यास आहे. मुरबाड भागात भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे वर्चस्व असून याच भागातून कपील पाटील यांना मुरबाडमध्ये ६४ हजार ३५४ इतके मताधिक्य मिळाले होते. त्याचबरोबर शहापूरमधून १४ हजार ३८७ इतके मताधिक्य मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पाटिल यांना पाठिंबा दिला असला तरी जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे आहेत. कपिल पाटिल आणि सुरेश म्हात्रे हे दोन्ही उमेदवार आगरी समाजाचे आहेत. सांबरे हे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासुन वैद्यकीय मदत, शैक्षणिक, महिला रोजगार निर्मीती अशी कामे करीत आहेत. याच कामांचा त्यांनी प्रभावीपणे प्रचार करत समाजासह इतर मतदारांना प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुरबाड, शहापूर आणि बदलापूर पट्ट्यात सांबरे यांच्यामुळे कुणबी मतविभाजन होऊन त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुरबाडमध्ये ५९.२० टक्के, शहापूरमध्ये ६३.५७ टक्के मतदान झाले असून येथील कुणबी समाजाने कुणाची साथ दिली, हे निकालानंतरच स्पष्ट होईल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : राष्ट्रीय पक्ष असलेला बसपा या निवडणुकीत आहे कुठे? उत्तर प्रदेशमध्ये काय आहे अवस्था?

गेल्या निवडणुकीत पाटील यांना भिवंडी ग्रामीण भागातून ५७ हजार ८९२ इतके मताधिक्य मिळाले होते. यंदा भाजपचे उमेदवार कपिल पाटिल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे हे दोघे भिवंडी ग्रामीण भागातील असून या ठिकाणी दोन्ही उमेदवारांमध्ये जास्तीतजास्त मत मिळविण्यासाठी स्पर्धा रंगल्याचे दिसून आले. यामुळे येथील मताधिक्य टिकवून ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे होते. याठिकाणी ६५ टक्के मतदान झाले असून येथील दोन्ही उमेदवारांचा बोलबाला आहे. यामुळे या भागातील जनता कुणाच्या मागे उभी राहिली, हे निवडणुक निकालातून स्पष्ट होईल. गेल्या निवडणुकीत पराभुत काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांना भिवंडी पश्चिममधून २५ हजार ५२०, भिवंडी पुर्वमधून २३ हजार ८०७ इतके मताधिक्य मिळाले होते. या दोन्ही मतदार संघांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या मोठी असल्याने मुस्लीम मतांवर भिस्त आहे. या दोन्ही भागांमधील मताधिक्य वाढविण्याचे आव्हान सुरेश म्हात्रे यांच्यापुढे होते. भिवंडी पश्चिमेत ५३.७२ टक्के तर, भिवंडी पुर्व ४८.६० टक्के इतके मतदान झाले आहे. एकूणच भिवंडी लोकसभा मतदार संघातील भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पुर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड याठिकाणी मतदार संख्येत झालेली वाढ आणि त्यात मतदानाचा वाढलेला टक्का हा कुणाच्या पथ्यावर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

भिवंडी मतदान टक्केवारी

मतदार संघ टक्केवारी

भिवंडी ग्रामीण ६५ टक्के
शहापूर ६३.५७ टक्के
भिवंडी पश्चिम ५३.७२ टक्के
भिवंडी पूर्व ४८.६० टक्के
कल्याण पश्चिम ५० टक्के
मुरबाड ५९.२० टक्के
एकूण ५६.४१ टक्के

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi lok sabha 2024 who will be benefited from increased voting rural area print politics news css
Show comments