आम्ही महिला आणि वंचित घटकांना प्रतिनिधित्व देत असल्याचा दावा करीत भारतीय जनता पार्टीने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यानंतर द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्यानंतर भाजपाने अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारीचा मुद्दा प्रचारासाठी वापरला. अगदी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही या मुद्द्यावरून राजकारण होताना दिसत आहे.

भारतीय जनता पार्टीचे अनेक उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करण्याचा उल्लेख आपल्या प्रचारात करतात आणि त्यावरून मते मागताना दिसतात. अगदी पंतप्रधान मोदींनीही ओडिशातील आदिवासी समाजातील एका मुलीला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसविल्याचा उल्लेख हिरिरीने केला आहे. ओडिशामधील मयूरभंज हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जिल्हा आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारामध्ये ‘द्रौपदी मुर्मू’ हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. विशेषत: आदिवासीबहुल मयूरगंज जिल्ह्यामध्ये भाजपाकडून या मुद्द्याचा राजकीय वापर केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (२९ मे) मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा या शहराला भेट देणार आहेत. मुर्मू या संथाल जमातीचे प्रतिनिधित्व करतात. मयूरभंज जिल्ह्यासह झारखंड राज्यामध्येही या जमातीचे प्राबल्य अधिक आहे.

हेही वाचा : “गाय राष्ट्रीय प्राणी व्हावा म्हणून…”; पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्यांची विविध कारणे

बांगिरीपोसी शहरात एक छोटेसे किराणा दुकान चालविणारे स्थानिक धीरेन मरांडी म्हणाले, “आम्हाला द्रौपदी मुर्मू यांचा अभिमान आहे. त्यांनी अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करीत हे स्थान प्राप्त केले आहे. इतर सगळे मुद्दे जाऊ द्या; पण मी फक्त या कारणास्तव भाजपाला मतदान करेन.” द्रौपदी मुर्मू यांनी १९९७ मध्ये मयूरभंजमधूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. रायरंगपूर नगर पंचायतमध्ये त्या पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. नंतर त्यांनी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. मुर्मू २००० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आल्या. त्यांनी नवीन पटनाईक यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले. त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक, तसेच मत्स्यपालन आणि पशुसंपत्ती विकास यांसारखी खाती सांभाळली. २००४ च्या निवडणुकीतही त्या आमदार म्हणून निवडून आल्या.

भारतीय जनता पार्टी आणि इंडिया आघाडी

१९९८ मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने मयूरभंज लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला. हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव करण्यात आला होता. त्यानंतर १९९९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार सालखान मुर्मू यांनी विजय प्राप्त केला. सालखान मुर्मू यांनी नंतर झारखंड डिसम पार्टीची स्थापनाही केली. २००४ मध्ये सुदाम मरांडी यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या तिकिटावर या मतदारसंघामध्ये विजय मिळविला. ते आता बिजू जनता दलामध्ये आहेत. त्यानंतर २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिजू जनता दलाने या मतदारसंघावर आपले वर्चस्व राखले. त्यानंतर २०१९ मध्ये भाजपाचे उमेदवार बिश्वेश्वर तुडू या जागेवर विजयी झाले. मयूरभंज लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सात विधानसभा मतदासंघांपैकी पाच जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे.

मात्र, या मतदारसंघामध्ये भाजपाविरोधी जनमताचा कौल दिसून येतो आहे. त्यामुळे भाजपाने यावेळी विद्यमान खासदार तुडू यांना डावलून रायरंगपूरचे विद्यमान आमदार नबा चरण माझी यांना उमेदवारी दिली आहे. माझी यांची सुदाम मरांडी यांच्याशी लढत होत आहे. सुदाम मरांडी सध्या पटनाईक मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि बांगिरीपोसी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ओडिशामध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्ष करीत आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बहीण आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांची मुलगी अंजनी या मतदारसंघातून लढत आहेत. पण, अनेक मतदारांना अंजनी सोरेन यांचा पर्याय योग्य वाटत नाही. कारण- त्या सारसकणा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरलेल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीमध्ये ११.७८ टक्के मतांसह त्या तिसऱ्या स्थानी राहिल्या होत्या. बारीपाडा शहरातील टॅक्सीचालक फकिरा हेमब्रम यांनी म्हटले, “शिबू सोरेन यांच्या मुलीने गेल्या वेळीही निवडणूक लढवली होती. मात्र, त्या तेवढ्या प्रभावी ठरल्या नव्हत्या. सुदाम मरांडी यांच्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाची मयूरभंजमध्ये ताकद होती. मात्र, त्यांनी पक्षाला राम राम केल्यामुळे त्यांची ताकद कमी झाली आहे.”

हेही वाचा : “‘४०० पार’ ही भाजपाची घोषणा नाहीच,” भाजपा खासदार आरपीएन सिंह असे का म्हणाले?

बिजू जनता दलाची रणनीती

२०१९ मध्ये पराभव पत्कारावा लागल्यानंतर बिजू जनता दलाने झालेल्या चुका सुधारण्यास सुरुवात केली. त्यांनी संघटनात्मक सचिव प्रणव प्रकाश दास यांची मयूरभंज लोकसभा मतदारसंघामध्ये निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीमुळे मयूरभंजमध्ये आपली ताकद वाढविण्यात बिजू जनता दलाला यश आले आहे. २०२२ साली झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये बिजू जनता दलाला चांगला विजय मिळाला आहे. यावेळी बिजू जनता दल पटनाईक सरकारने आदिवासी समाजासाठी अमलात आणलेल्या कल्याणकारी उपक्रमांच्या जोरावर प्रचार करीत आहे. दुसरीकडे भाजपा द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर मते मागताना दिसतो आहे. मयूरभंज लोकसभा मतदारसंघामध्ये २४ मे रोजी झालेल्या एका प्रचारसभेत नवीन पटनाईक यांनी मुर्मू यांचा बहीण म्हणून उल्लेख केला आणि बिजू जनता दलाने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचेही आवर्जून सांगितले.