पूर्व उत्तर प्रदेशातील पडरौनाच्या पूर्वीच्या राजघराण्याचे वंशज आरपीएन सिंह यांनी जानेवारी २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या एक महिना अगोदर भाजपामध्ये जाण्यासाठी काँग्रेस सोडली. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली होती. २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सलग पराभव झाल्यानंतर त्यांना झारखंड आणि छत्तीसगडचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) प्रभारी करण्यात आले होते. या वर्षी भाजपाने राज्यसभा निवडणुकीत त्यांचे नाव पुढे केले. नुकतीच ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीमधील मतभेद, विरोधकांचे आरोप, पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी आणि १ जून रोजी होणार्‍या मतदानावर आपली भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशमध्ये सपा-काँग्रेस आघाडीचे आव्हान किती मोठे?

उत्तर प्रदेशमध्ये सपा-काँग्रेस आघाडीच्या आव्हानाबद्दल बोलताना आरपीएन सिंह म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस निवडून येणार नाही हे स्पष्ट आहे. काँग्रेसकडे जे काही होतं, ते विधानसभा निवडणुकीत उद्ध्वस्त झालं. समाजवादी पक्षाबद्दल बोलायचं झाल्यास, २०१९ मध्ये त्यांनी जेव्हा बसपाबरोबर युती केली तेव्हा त्यांना फक्त पाच जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्येही ते पाचपेक्षा जास्त जागा जिंकू शकले नव्हते. आता सपा आणि बसपा स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे भाजपा उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी ८० जागा जिंकण्यास तयार आहे, असे आम्हाला वाटते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी मणिपूरला का गेले नाहीत? अमित शाहांनी सांगितले खरे कारण

तसेच, मी काँग्रेस सोडलेल्या शेकडो लोकांची नावे सांगू शकतो; ज्यांच्यावर एकाही केसची नोंद नाही. जसे की, ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद. इतर पक्षांत सामील झालेले किंवा स्वतःचे पक्ष स्थापन करणारे अनेक जण आहेत. त्यामुळे खटले असल्याने प्रत्येक जण भाजपामध्ये सामील होत आहे, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. पक्षात कोणतीही विचारधारा शिल्लक नसल्याने लोक काँग्रेस सोडत आहेत. ज्येष्ठ नेत्यांनाही पक्ष सोडावा लागला आहे. त्यामुळे इतरांकडे बोटे दाखविण्यापेक्षा काँग्रेसने स्वतःकडे पाहिले पाहिजे आणि काँग्रेस सत्तेत असताना झालेल्या भ्रष्टाचाराचे चिंतन केले पाहिजे.

“सत्तेत परत आल्यास योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्रिपद नाही?”

केजरीवाल म्हणाले की, भाजपा सत्तेत परत आल्यास योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद देणार नाही. त्यावर आरपीएन सिंह म्हणाले की, केजरीवाल आपल्याच पक्षाबद्दल बोलत असावेत. त्यांच्याकडे कोणतीच योजना नाही. ते सत्तेवर आल्यास काय करतील हे सांगण्याऐवजी ते लोकांचे लक्ष वळविण्यासाठी अशा गोष्टी बोलत आहेत. हे स्पष्टपणे दर्शवते की, इंडिया आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे भारतासाठी कोणताही रोडमॅप नाही. ते भाजपाबद्दल बोलत राहतात. आमच्याकडे पंतप्रधान स्पष्टपणे स्वावलंबनाबद्दल बोलत आहेत. त्यांना पुढील २० वर्षांत भारताला कोठे पाहायचे आहे, याबद्दल ते बोलत आहेत. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष कुटुंबाच्या जागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. संपूर्ण देशात होत असलेले परिवर्तन पाहा. भारत सॉफ्ट ग्लोबल पॉवर ठरत आहे. जगाच्या नजरेत भारत बदलत आहे; पण इंडिया आघाडीच्या नजरेत नाही आणि उत्तर प्रदेशातील लोकांना ते समजले आहे.

भाजपाच्या प्रचाराने नकारात्मक वळण का घेतले?

आरपीएन सिंह म्हणाले की, काँग्रेस आणि इंडिया आघाडीने अर्धसत्य बोलून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक मुद्द्यांवर मौन बाळगले. तुम्ही त्यांची भाषणे ऐकलीत किंवा इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याशी बोलल्यास ते पंतप्रधानांना शिव्या देऊन भाषणाची सुरुवात करतात. ‘४०० पार’ घोषणा भाजपाची नाही, तर तो लोकांचा विश्वास आहे. जेव्हा ‘४०० पार’च्या घोषणेने जोर धरला, तेव्हा इंडिया आघाडी अस्वस्थ झाली. त्यानंतरच त्यांनी भाजपावर कोणत्याही आधाराविना आरोप करणे सुरू केले.

भाजपा संविधान बदलेल, अनुसूचित जाती-जमातींचे आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करील, असे इंडिया आघाडीतील नेते बोलू लागले. संविधान हेच ​​आमचे मार्गदर्शक तत्त्व राहील आणि जोपर्यंत संविधान आहे, तोपर्यंत आरक्षण रद्द होणार नाही, असे पंतप्रधानांनी वारंवार सांगितले आहे. खरे तर पंतप्रधानांच्या प्रतिप्रश्नावर काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष अजूनही मौन आहेत. त्यामुळे विरोधी पक्षच खोटे बोलत आहेत. पंतप्रधानांना मोठा जनादेश मिळावा, अशी जनतेची इच्छा आहे.

हेही वाचा : इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा निवडणुकीतील प्रचारामुळे चर्चेत; कारण काय?

बेरोजगारी, महागाईचे मुद्दे

आकडेवारी पाहिली, तर कोविडनंतर प्रत्येक देशात प्रचंड महागाई होती. आज जग एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे जोडले गेले आहे. विकसित देशांसह जगभरात महागाई मोठ्या प्रमाणावर आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जगात आपला विकास दर सर्वाधिक आहे. त्यामुळे साहजिकच सरकार आणि पंतप्रधान काहीतरी योग्यच करीत आहेत. आज कोविड संकटानंतरही आपला विकास दर सर्वाधिक आहे आणि महागाई कमी आहे. जर तुम्ही रोजगाराच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर इतर देशांच्या तुलनेत भारत चांगले काम करीत आहे. सुधारणेला नेहमीच वाव असतो. आज आपण जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहोत आणि पंतप्रधानांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात आपण तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असू याची हमी दिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp rajyasabha mp r p n singh interview rac
First published on: 28-05-2024 at 12:16 IST