गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. ते शेतकरी, मजूर, महिला, कामगार, वाहनचालक यांची भेट घेत त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका भाजी विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तो रडत रडत माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे सांगताना दिसला होता. दरम्यान, राहुल गांधी यांनी या भाजी विक्रेत्याला त्याच्या पत्नीसह थेट स्वत:च्या घरी आमंत्रित केले. तसेच राहुल गांधी यांनी या दाम्पत्यासोबत जेवण करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

१४ ऑगस्ट रोजी राहुल गांधींकडून निमंत्रण

या भाजीविक्रेत्याचे नाव रामेश्वर असे आहे. राहुल गांधी यांनी रामेश्वर यांना १४ ऑगस्ट रोजी जेवणासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर रामेश्वर यांनी त्यांची पत्नी तसेच मुलीसह राहुल गांधी यांच्या घरी हजेरी लावली. काँग्रेसने याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी रामेश्वर यांना जेवण वाढताना दिसत आहेत. तसेच ते रामेश्वर यांच्याशी महागाई, गरिबी, श्रीमंती अशा विषयावर चर्चा करताना दिसत आहेत.

SM Mushrif Who killed Karkare
‘करकरेंच्या शरीरात नेमक्या कुणाच्या गोळ्या?’ Who Killed Karkare पुस्तकाचे लेखक एसएम मुश्रीफ म्हणाले…
Kiran Mane on Ujjwal Nikam
“दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा…”, किरण मानेंची उज्ज्वल निकम यांच्यावर टीकात्मक पोस्ट
I challenge Modi Said Mallikarjun Kharge
“मोदींमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी ‘हे’ करावं”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं जाहीर आव्हान!
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?

“भारतात अनेक लोक वेगवेगळ्या वेदना, अडचणी, आव्हानांना तोंड देत आहेत. रामेश्वरजी हे अशा लोकांचा चेहरा आहेत. अशा लोकांच्या अडचणी समजून घेणे तसेच त्यांना या लढ्यात साथ देणे आपले नैतिक कर्तव्य आहे,” असे राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ एक्सवर (पूर्वी ट्विटर) शेअर करताना म्हटले आहे.

मला सर म्हणून नका, थेट राहुल बोला- राहुल गांधी

राहुल गांधी या व्हिडीओमध्ये रामेश्वर यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. या संवादादरम्यान, रामेश्वर राहुल गांधी यांना आदराने सर म्हणत आहेत. मात्र ‘मला तुम्ही सर का म्हणत आहात? मला थेट राहुल म्हणा,’ असे राहुल गांधींनी रामेश्वर यांना सांगताना दिसत आहेत. यूट्यूबवरही राहुल गांधींनी या संभाषणाचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. राहुल गांधींनी या संभाषणादरम्यान रामेश्वर यांना ‘तुम्हाला तुमच्या कामाचा किती मोबदला मिळतो?’ असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना “मला काहीही मिळत नाहीये. सरकारमधील एकाही व्यक्तीने माझे ऐकून घेतलेले नाही. तुम्ही माझ्या भावना जाणून घेतल्या. देशात गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत,” असे रामेश्वर म्हणाले आहेत.

…मात्र मी आणखी गरीब झालो- रामेश्वर

“मी एक सामान्य भाजीविक्रेता आहे. समाजमाध्यमावर जो व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यातील प्रत्येक गोष्ट सत्य आहे. त्या दिवशी माझ्याकडे १५०० रुपये होते. मात्र घाऊक बाजारात ज्या दराने टोमॅटो विकले जात होते, ते पाहून मी काहीही खरेदी करू शकणार नाही, असे मला वाटले. दिल्लीमध्ये येणे हे कदाचित माझ्यासाठी चांगले ठरेल, असे मला सुरुवातीला वाटले होते. मात्र कालांतराने परिस्थिती आणखी बिकट होत गेली. मी आणखी गरीब झालो,” असे रामेश्वर या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

श्रीमंतांना पुरेपूर सूट, गरिबांना मात्र काहीही नाही- राहुल गांधी

राहुल गांधी यांनी या भेटीदरम्यान रामेश्वर यांची पत्नी तसेच मुलीशीही चर्चा केली. “लोक काय म्हणतील याची पर्वा करू नका. नेहमी सत्य बोलले पाहिजे आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. काँग्रेसने न्याय (NYAY) योजना मांडली होती. या योजनेंतर्गत गरिबांना वर्षाला ७२ हजार रुपये मिळणार होते. जे लोक कोट्यवधी रुपये कमावतात, त्यांना सूट दिली जाते. मात्र गरिबांना काहीही मिळत नाही,” अशी खंत मांडताना राहुल गांधी दिसत आहेत.

जुलै महिन्यात झाला होता व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, जुलै महिन्यात रामेश्वर यांचा एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ते महागाईबद्दल व्याकुळ होऊन बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चर्चेत आल्यानंतर काँग्रेससह अन्य विरोधकांनी भाजपावर सडकून टीका केली होती.