ठाणे : राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर बाजारपेठ अशी ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने सुरु असलेल्या शह-काटशहाच्या राजकारणाचे मळभ दाटून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या खंद्या आणि आर्थिक आघाडीवर मजबूत समजल्या जाणाऱ्या समर्थकांचा एकगठ्ठा वावर या बाजार समितीवर आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव, सांगली-सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील राजकारणावर पकड असणाऱ्या बडया व्यापारी नेत्यांचा प्रभाव मुंबईतील या बाजारांवर दिसून येतो. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणानंतरही यातील बराचसा टक्का अजूनही थोरल्या पवारांसोबत आहे. सातारा, शिरुर यासारख्या मतदारसंघातील आर्थिक, राजकीय पटावरील सोंगट्या मुंबईतील या बाजारांमधून हलविल्या जात असल्याचे लक्षात येताच गेल्या आठवडाभरापासून येथील पवारनिष्ठांची गुन्हे शाखेने सुरु केलेली धरपडक सध्या लक्षवेधी ठरली आहे.

देशभरातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या हजारो कोटी रुपयांचा कृषी मालाचा व्यापार, त्यानिमीत्ताने होणाऱ्या आर्थिक उलाढाली, बाजार आवाराच्या समक्षमीकरणाच्या निमित्ताने केली जाणारी कोट्यवधी रुपयांची कामे, माथाडी कामगारांच्या नावाने केले जाणारे एकगठ्ठा मतांचे राजकारण हे वाशीतील कृषी मालाच्या बाजारपेठांना तसे नवे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना शरद पवार, अजित पवार, दिलीप ‌वळसे पाटील, छगन भुजबळ यासारख्या दिग्गज नेत्यांच्या मांडवाखाली वावरणाऱ्या अनेक व्यापारी नेत्यांचा या बाजारांवर प्रभाव राहीला आहे. शशिकांत शिंदे, रविंद्र इथापे, संजय पानसरे, अशोक वाळुंज, अशोक गावडे, शंकर पिंगळे, बाळासाहेब बेंडे, नरेंद्र पाटील, विलास हांडे, अशोक हांडे यासारख्या व्यापारी, माथाडी असलेल्या मात्र पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांवर काही प्रमाणात प्रभाव राखणाऱ्या नेत्यांचा या बाजारांवर अंकुश असल्याचे पहायला मिळते.

हेही वाचा – राजपूत, जाट समुदाय भाजपावर नाराज आहेत का? राजस्थान भाजपा प्रमुख सांगतात…

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर मुंबईतून पाच संचालक निवडून जातात. राज्यभरातून या बाजार समितीवर शेतकरी गटातून १६ संचालक निवडून येतात. मात्र हजारो कोटी रुपयांच्या उलाढालीचे केंद्र असणाऱ्या या बाजारांवर मुंबईतील पाच आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या रुपाने एक माथाडी अशा सहा संचालकांचा दबदबा असल्याचे नेहमीच पहायला मिळाले. बाजार समितीच्या कारभारावर राज्यातील पणन विभाग, त्यानिमित्ताने पणन मंत्री, मुख्यमंत्र्यांचा प्रभाव असतो. मात्र, पणन मंत्री कुणीही असोत वाशीची बाजारपेठ चालते ती याच पाच-सहा संचालकांच्या बळावर.

पवारांसाठी दुखरी नस ?

गेल्या काही वर्षांत या बाजारपेठेत शेकडो कोटी रुपयांची वेगवेगळी कंत्राटे काढण्यात आली आहेत. बेकायदा व्यापार, यानिमित्ताने होणारी शेतकऱ्यांची पिळवणुकीच्या तक्रारी येथील बाजारपेठांना नव्या नाहीत. या बाजारपेठांमध्ये बस्तान बसवून असलेले बेकायदा व्यापारी, बेसुमार पद्धतीने झालेली अनधिकृत बांधकामे, पुर्नविकासाच्या नावाखाली सुरु असलेली दबंगगिरी, माथाडी टोळ्यांमधून होणारी घुसखोरी, त्यामागील अर्थकारण कधी दबक्या तर कधी उघडपणे येथे चर्चिले जात असते. या बाजारांमधील आर्थिक व्यवहारांवर वचक ठेवणारे काही व्यापारी आहेत. कोट्यवधी रुपयांच्या रकमा येथे व्याजाने द्यायच्या आणि निवडणुका आल्या की मतांमधून व्याज वसूल करण्याची पद्धतही येथे रुजली आहे. कांदा-बटाट आवारात तर मनमानेल तसा कारभार गेल्या तीन दशकांपासून सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र या तक्रारींकडे सरकारमधील यंत्रणांनीही याकडे डोळेझाक केल्याचे पहायला मिळाले. काही वर्षांपूर्वी या बाजारात स्वच्छतागृहांची उभारणीचे कंत्राट दिले गेले. या कंत्राटात घोटाळा झाल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या. शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समितीमधील अधिकारी आणि इतरही काही संचालकांविरोधात तक्रारी पुढे आल्या होत्या. मात्र सुरुवातीला याकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान उमेदवार शशिकांत शिंदे थोरल्या पवारांसोबत राहिले आणि येथील राजकीय गणिते बदलल्याचे पहायला मिळते.

शिंदे हेच लक्ष्य ?

अजित पवार यांचे निकटवर्तीय असूनही शशिकांत शिंदे हे थोरल्या पवारांसोबत राहिले कारण सातारा जिल्ह्यावर त्यांची असलेली पकड. शिवाय बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांमध्ये थोरल्या पवारांविषयी नेहमीच आपुलकीची भावना राहिली आहे. राज्यात केंद्रात सरकार कुणाचेही असो थोरल्या पवारांची पकड या बाजारांमधून सुटलेली नाही. राज्यातील शिरुर आणि सातारा या दोन लोकसभा मतदारसंघावर प्रभाव पाडणाऱ्या व्यापाऱ्यांचा एक मोठा टक्का मुंबईतील या बाजारात आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील साखर कारखाने, बागायती पट्ट्यांवर या व्यापाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे यांना हवी ती रसद या बाजारांमधून पुरवली जात असल्याच्या तक्रारी त्यांचे विरोधक करु लागले होते. सातारा मतदारसंघात तर शौचालय घोट्यांवरुन शशिकांत शिंदे यांचे विरोधक असलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील जाहीर वक्तव्य करत होते. शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा माथाडी भवनात त्यांचा सत्कार करण्याचे सोपस्कार पाटील यांनी उरकले खरे मात्र साताऱ्यात प्रवेश करताच त्यांनी शिंदे यांच्याविरोधात आघाडी उघडली.

हेही वाचा – सॅम पित्रोदा आणि गांधी घराण्याचं नेमकं काय कनेक्शन?

पाच वर्षांपूर्वी याच साताऱ्यात महाराजांविरोधात नरेंद्र पाटील रिंगणात होते. तेव्हा शशिकांत शिंदे महाराजांसोबत होते. यानिमित्ताने अंतर्गत विरोधाचे एक वर्तुळ नरेंद्र पाटील यांनीही पूर्ण केले. नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने या बाजारातील तगडे व्यापारी संजय पानसरे यांना अटक करताना अशोक वाळुंजे आणि शंकर पिंगळे यांचीही चौकशी केल्याचे समजते. शिरुर, साताऱ्याची थोरल्या पवारांची रसद तोडण्याची खेळी यानिमित्ताने खेळली गेल्याची चर्चा आता या बाजारात सुरु झाली आहे. पानसरे यांना अटक होत असेल तर आपले काय या भितीचे मळभ सध्या बाजारावर दाटून आले आहे.