scorecardresearch

हर्षवर्धन पाटील यांची फडणवीसांकडून ५ मिनिटांत बोळवण; इंदापूरच्या सभेत फडणवीसांच्या जुजबी हजेरीमुळे पाटील यांची तगमग!

हर्षवर्धन यांचे भाजप नेत्यांच्यादृष्टीने स्थान काय याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आगामी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीकडे डोळे लावून बसलेल्या हर्षवर्धन यांची राजकीय तगमग वाढली आहे.

devendra fadnavis harshvardhan patil

पावलस मुगुटमल

भाजपत प्रवेश केल्यापासून हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागत असली तरी त्यांची राजकीय तगमग काही संपलेली नाही. मतदारसंघात आपली ताकद दाखवण्यासाठी जंगी सभेचा घाट घातल्यानंतरही भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खरी मोठी सभा टेंभुर्णीला असल्याने, मी माझे मुद्दे तिथेच मांडणार आहे, असे सांगत या सभेतून काढता पाय घेतल्याने फडणवीस यांनी केवळ पाच मिनिटांत बोळवण केल्याची चर्चा इंदापूर-पुण्यात सुरू झाली आहे. त्यातून हर्षवर्धन यांचे भाजप नेत्यांच्यादृष्टीने स्थान काय याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आगामी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीकडे डोळे लावून बसलेल्या हर्षवर्धन यांची राजकीय तगमग वाढली आहे.

मागील अनेक दशके काँग्रेस पक्षाशी नाळ जोडलेले, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमधून भाजपवासी झाले. भाजपने त्यांना इंदापूरमधून विधानसभेची उमेदवारी दिली. भाजपच्या ताकदीच्या जोरावर इंदापूर विधानसभा मतदारसंघ या आपल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी २०१४ च्या निवडणुकीत केलेल्या पराभवाचा वचपा काढून बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी हर्षवर्धन यांनी ही खेळी केली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूरची जागा पुन्हा आपल्या पदरात पाडून घेण्यात यश मिळवले आणि हर्षवर्धन यांचा सलग दुसरा पराभव झाला. इतकेच नव्हे तर भाजपची सत्ताही गेली आणि महाविकास आघाडी सत्तेवर आली. आपले दोन्ही डाव फसल्याचे शल्य मनामध्ये बोचत ठेवत त्या पक्षाच्या विचारधारेशी जुळवून घेण्याचे प्रयत्न हर्षवर्धन पाटील यांनी केले. त्यातूनच राज्यातील सहकाराबाबत केंद्रातील नवे सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सहकारातील गणित उलगडून सांगितले.

महाविकास आघाडी सरकार पडण्याची चिन्हे नसल्याने हर्षवर्धन अधिक अस्वस्थ झाल्याची चर्चा सुरूच होती. अमित शहा किंवा फडणवीस असतील अशा कार्यक्रमात पाटील उपस्थिती लावतात पण त्यांचा वावर बुजल्यासारखा दिसून येतो, असे इंदापूर-पुण्यातील राजकीय मंडळींचे निरीक्षण आहे. ही कोंडी फोडण्यासाठीची आणि इंदापूरमधील आपली ताकद दाखवण्याची संधी त्यांना शुक्रवारी मिळाली.

इंदापूरजवळील टेंभुर्णीतील सभेपूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आपल्या कुलदैवताला दर्शन घेण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे आले. त्यानिमित्त हर्षवर्धन यांनी स्वागताच्या निमित्ताने आपल्या शक्तीप्रदर्शनाचा आणि फडणवीस यांच्या सभेचा घाट घातला. आठवडाभर तयारी करत, वातावरण निर्मिती करत मोठी गर्दी होईल असे नियोजन हर्षवर्धन यांनी केले व सभेत ‘जय श्रीराम’ही म्हटले. मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंगपूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरासाठी १६४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. या कामाला आता काही निधी कमी पडत असल्याची तक्रार करत मंदिर-हिंदुत्वाच्या राजकारणाची री ओढली. मात्र मी टेंभुर्णी येथील मुख्य सभेत राज्याला संदेश देईन असे सांगून फडणवीस यांनी इंदापूर येथे सविस्तर बोलण्याचे टाळले.

फडणवीस यांच्या या कृतीमुळे त्यांनी हर्षवर्धन पाटील यांची ५ मिनिटांत बोळवण केल्याचे व त्यामुळे हर्षवर्धन यांच्या शक्तीप्रदर्शनावर बोळा फिरल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना फडणवीस ताकद देण्याचा प्रयत्न करतात असे चित्र असताना फडणवीस यांच्या इंदापुरातील कृतीमुळे त्यातून वेगळाच राजकीय संदेश दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीकडे डोळे लावून बसलेल्या हर्षवर्धन यांची राजकीय तगमग संपण्याऐवजी उलट वाढली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harshvardhan patil rally in indapur devendra fadnavis bjp politics pmw

ताज्या बातम्या