नांदेड : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा नांदेडमध्ये पराभव करण्याचा ‘विडा’ अशोक चव्हाण यांनी आधी काँग्रेस पक्षाच्यावतीने उचलला होता. ते व त्यांचे सहकारी त्या दिशेने पुढे जात असताना चव्हाण यांना अचानक हा ‘विडा’ सोडावा लागला असून आता याच मतदारसंघात भाजपाला निवडून आणण्याचा ‘विडा’ त्यांना उचलावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडकर भाजपच्या अशोक चव्हाणांना किती पाठिंबा देतात याची उत्सुकता असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ह्या दोन विड्यांतला तसेच चव्हाणांच्या नव्या कार्यशैलीतला फरक राजकीय निरीक्षकांच्या नजरेत आला आहे. काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयाच्या वास्तूत घेणार्‍या अशोकरावांनी भाजपा प्रवेशानंतर या पक्षाच्या स्थानिक सहकार्‍यांसोबतच्या पहिल्या बैठकीसाठी शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहाची निवड केली. शंकररावांनी राजकीय जीवनात घेतलेली भूमिका पाहता पुढील काळातही भाजपाच्या बैठकांसाठी वरील संग्रहालयाचे प्रवेशद्वार बंदच ठेवावे लागणार आहे.

हेही वाचा : महाविकास आघाडीत मोठा भाऊ शिवसेना की काँग्रेस ?

भाजपातर्फे राज्यसभेवर निवडून आल्यानंतर अशोक चव्हाण शुक्रवारी दुपारी नांदेडमध्ये दाखल झाल्यावर भाजपा कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षातील समर्थकांनी त्यांची मिरवणूक काढून अभूतपूर्व स्वागत केले. याप्रसंगी झालेली गर्दी नंतर चर्चेचा विषय बनली. नांदेडमध्ये येण्यापूर्वीच चव्हाण यांना भाजपातील क्रिया-प्रतिक्रियांचा अंदाज आला होता. मुंबईहून विमानाने येताना त्यांनी पक्षाचे आमदार राम पाटील रातोळीकर यांना सोबत आणत पक्षातील चिखलीकर विरोधी गटाला चांगला संदेश दिला.

आगमनानंतरच्या छोटेखानी सभेत त्यांनी नव्या पक्षाच्या कामकाजात सहभागी होण्याचे पहिले पाऊल टाकत भाजपमधील आमदार-खासदार आणि प्रमुख आजी-माजी पदाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. शारदा भवन शिक्षण संस्थेच्या परिसरातील ‘शंकर स्मृती’ इमारतीत त्यांनी काँग्रेसच्या अनेक बैठका घेतल्या. त्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे.

हेही वाचा : दिल्लीत तळ ठोकून बसलेले झारखंड काँग्रेसचे आठ आमदार परतले, राजकीय समीकरण बदलणार?

शंकररावांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात भाजपाचे राजकारण आणि कार्यशैलीला प्राणपणाने विरोध केला. १९९१ ते ९६ दरम्यान संसदेत त्यांनी केलेल्या भाषणांत त्याचे अनेक दाखले सापडतात, पण शंकररावांच्या पश्चात अशोक चव्हाण यांनी नाही म्हणत भाजपाची वाट धरल्यानंतर नव्या राजकीय डावात शंकररावांची प्रतिमा न वापरता त्यांना पुढे जावे लागणार आहे. शुक्रवारी ते नांदेडला आले, पण नव्या राजकीय भूमिकेत त्यांना शंकररावांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करता आले नाही.

नांदेड शहरामध्ये भाजपाच्या जिल्हा आणि महानगर कार्यालयासाठी तसेच पक्षाच्या बैठका व अन्य कार्यक्रमांसाठी भव्य वास्तू उभी राहत आहे. पण मागील काही वर्षे या पक्षाचे कार्यालय ‘फिरत्या स्वरूपाचे’ राहिले. जिल्हाध्यक्ष किंवा महानगराध्यक्ष बदलला की, कार्यालयाची जागा बदलली, असे बघायला मिळाले. चव्हाणांनी अलिकडे काँग्रेस पक्षाचे कार्यालय सुसज्ज करून घेतले होते. पण १२ फेब्रुवारीपूसन त्यांचा पक्षासोबतच, नांदेडमधील कार्यालयाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध संपला.

हेही वाचा : उत्तर प्रदेशात राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी प्रियांका मैदानात, अखिलेशही भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार

नांदेडमधील काँग्रेसच्या ५५ माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना सााथ देत भाजपमध्ये प्र‌वेश केला. आणखी किती नेतेमंडळी बरोबर येतात याचा अंदाज घेतला जात आहे. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील समीकरण आता भाजपमध्ये कायम राहते का, याकडे साऱ्यांच्या नजरा असतील.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much political support bjp leader ashok chavan will get in nanded after joining bjp print politics news css
First published on: 25-02-2024 at 12:47 IST