कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रण तापले असताना महायुती – महाविकास आघाडीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. कोल्हापुरात सुरुवातीला निश्चितपणे विजयी होणार इतपत असणारा दावा आता लाखाच्या घरात पोहोचला आहे. महायुतीचे संजय मंडलिक अडीच लाखाने विजयी होतील असा दावा केला जात आहे. तर श्रीमंत शाहू महाराज हे तीन लाख अधिक मतांनी विजयी होतील, असा प्रतिदावा केला जात आहे. याउलट, हातकणंगलेत चुरशीची बहुरंगी असताना विजयाचे केवळ दावे केले जात असून ते किती मोठ्या मताधिक्याने असणार याबाबत झाकली मूठ सव्वालाखाची असा मामला दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात प्रचाराल रंग चढला आहे. टीकाटिप्पणी, वार – प्रतिवार, आरोप – पलटवार यामुळे निवडणुकीचे म्हणून वातावरण तापले आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा यासाठी आमचाच उमेदवार विजयी होणार असे छातीठोकपणे सांगितले जात आहे. सुरुवातीला विजय निश्चित होणार इतपत सीमित असणाऱ्या दाव्याला लाखांच्या मताधिक्याचे मजबूत वजन प्राप्त होऊ लागले आहे. याची सुरुवात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर केली. तेव्हा त्यांनी शिंदे सेनेचे संजय मंडलिक यांना या तालुक्यातून लाखाचे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. पाठोपाठ याच तालुक्यातील जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी कोल्हापुरात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश करून शाहू महाराजांना पाठिंबा दिला. तेव्हा त्यांनी तालुक्यातून ५० हजारांचे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. नुकत्याच चंदगड दौऱ्यावर गेलेले संभाजीराजे छत्रपती यांनी २००९ सालच्या निवडणुकीत या तालुक्याने मला मोठे मताधिक्य दिले होते. तीच परंपरा याही वेळी राहील, अशी खात्री व्यक्त केली.

हेही वाचा – मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग

लाखमोलाचे कागल

कागल तालुका हा यावेळच्या लोकसभा निवडणुकीत विशेष चर्चेत आला आहे. संजय मंडलिक हे याच तालुक्याचे आहेत. खेरीज, पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे असे तीन तगडे नेते या तालुक्यात आहेत. ही ताकद एकवटल्याने मुश्रीफ यांनी फक्त या एका तालुक्यातून सव्वालाखाचे मताधिक्य मंडलिक यांना मिळेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मुश्रीफ यांचा दावा असा उंचावत असताना त्यांचे मित्र संजय घाटगे शाहू महाराजांची बाजू तालुक्यात मजबूत असल्याचा दावा करीत आहेत. ठाकरे सेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांनी कागल तालुक्यातून शाहू महाराजांना अभिमान वाटेल असे मताधिक्य देऊ, असे म्हटलेले आहे. अलीकडे मंत्री मुश्रीफ हे मंडलिक या निवडणुकीत अडीच लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील, अशी खात्री देत आहेत. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडे शाहू महाराजांच्या प्रचाराची मुख्य जबाबदारी आहे. त्यांनी तर तीन लाखांच्या मताधिक्याहून महाराज जिंकतील असे आत्मविश्वासपूर्वक सांगायला सुरुवात केली आहे. एकूणच या मतदारसंघात उमेदवार जिंकणार असे सांगताना लाखाच्या खाली आकडा आणायला कोणीच तयार नाही.

हेही वाचा – मतदारसंघाचा आढावा : यवतमाळ-वाशीम- ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा शिंदे गटाला फायदा की तोटा?

हातकणंगलेत सावध पवित्रा

याच्या विपरीत चित्र हातकणंगले मतदारसंघात आहे. येथे शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी. सी. पाटील, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, शिवाजी माने अशी बहुरंगी लढत होत आहे. येथेही प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. सभा, मेळाव्यातून उमेदवाराच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात आहे. एकूण चुरस पाहता मताधिक्याचा आकडा किती मोठा असणार याबाबत सध्या तरी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या पातळीवर लाखाच्या मताधिक्याने विजयी होऊ असे सांगितले जात असले तरी वरिष्ठ नेते मात्र तूर्त तरी बचावात्मक पवित्र्यात आहेत. त्यामुळे एकाच जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या मतदारसंघातील मताधिक्याबाबतच्या भिन्न भूमिका चर्चेचे निमित्त ठरले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur hatkanangle lok sabha the election battle increase print politics news ssb
Show comments