नंदुरबार: नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीतील वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस उफाळून येत आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट प्रचारापासून दूर असल्याने भाजप उमेदवार डाॅ. हिना गावित यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महायुतीमधील वाद मिटविण्यात वरिष्ठांकडूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने वादाला राज्यपातळीवरुनच खतपाणी मिळत असल्याची चर्चा रंगली आहे.

राज्यात सत्तेत असणारे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात नंदुरबारमध्ये कलगीतुऱ्याचे राजकारण सुरु आहे. खासदार गावित यांना उमेदवारी दिल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटाने उघडपणे नाराजी व्यक्त करुन प्रचारापासून दूर राहण्याचे ठरविले आहे. सर्वांना बरोबर न घेणे, शिवसेना कार्यकर्त्यांशी आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये दुजाभाव करणे, या खासदार गावित यांच्याविरोधात जाणाऱ्या गोष्टी ठरत असल्याने शिंदे गटाचे चंद्रकात रघुवंशी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपला विरोध भाजपला नसून डॉ. गावित कुटुंबियाला असून वरिष्ठांचा आदेश मान्य राहील, असे शिंदे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा : पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती

दुसरीकडे, अजित पवार गटाचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्यासमोर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर समन्वय समिती गठीत करण्याचे पाटील यांचे आश्वासन हवेतच विरले. नंदुरबारमधील बेबनाव वाढल्याने भाजपचे संकटमोचक असे म्हटले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनीही नंदुरबारचा आढावा घेतला. परंतु, त्यानंतरही वाद कायमच आहे. शिंदे गटातील काही पदाधिकारी आता छुप्या पद्धतीने थेट काँग्रेसला मदत करत असल्याचे समजते. अजित पवार गटातही प्रचाराच्या पातळीवर शांतता असल्याने राज्यस्तरावरुनच हा वाद दुर्लक्षित करण्यात येत असल्याचा कयास बांधला जात आहे.

हेही वाचा : केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी, आमदाराच्या मुलाच्या विवाहानिमित्त धुळे दौरा केला असता नंदुरबारमधील वादाविषयी त्यांच्यासमोर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. महायुतीच्या उमेदवाराच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २२ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदुरबारमध्ये येणार असून, तेव्हातरी महायुतीमधील वादावर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा : भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक

नंदुरबारमधील महायुतीतील वादावर वरिष्ठ स्तरावरुन लवकरच मार्ग काढला जाईल. महायुतीतील काही नेत्यांचे भाजपशी नव्हे तर, उमेदवारांच्या परिवाराशी मतभेद आहेत. याबाबत वरिष्ठांना कल्पना देण्यात आली आहे.

-नीलेश माळी (भाजप, नंदुरबार जिल्हाध्यक्ष)