सांंगली : महाविकास आघाडीचे नेते आता प्रचारात उतरल्याने सांगलीच्या आखाड्यात होत असलेल्या तिरंगी लढत आता रंगतदार वळणावर पोहचली असून प्रचारात मात्र वैयक्तिक टीकाटिपणी होत असल्याने ही निवडणुक गावातील एखाद्या गीवकीची आहे की लोकसभेची, असा प्रश्‍न पडला आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होत असली तरी या निवडणुकीला अनेक पैलू लाभले आहेत. शिवसेनेला स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची चणचण असताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर मजल गाठायची आहे, तर महायुतीतील सहकार्‍यांच्या मदतीवर विसंबून न राहता भाजप आपल्या स्वत:च्या ताकदीवर रणमैदानात पाय रोवून उभा आहे.

कालपरवापर्यंत महाविकास आघाडीत उमेदवारी काँग्रेसला की शिवसेनेला यातून वादंग निर्माण झाले होते. मविआच्या संयुक्त बैठकीत पैलवान पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले तरी उमेदवारी मागे घेईपर्यंत काँग्रेसला आशा होती. काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्‍वजित कदम यांनी अखेरपर्यंत विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र, आता सर्वच बाजूंने दोर कापले गेल्याने काँग्रेसचा मेळावा घेउन त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीला दृष्ट लागल्याचे आणि आडकाठी आणणार्‍याचा हिशोब पुढच्या काळात पुरा करण्याचे सांगत मविआचा प्रचार करण्याचा निर्णय घेत चंद्रहार पाटील यांना पडणारी मते काँग्रेसचीच असतील असे सांगत आपली तलवार म्यान केली. मात्र, काँग्रेसमध्ये बंडखोरी करून मैदानात उभे ठाकलेले विशाल पाटील यांना मिळत असलेला पाठिंबा पाहता एकसंघ काँग्रेस मविआच्या प्रचारात दिसत नाही. नेते व्यासपीठावर आणि कार्यकर्ते मात्र अपक्षाच्या दिमतीला असा काहींसा प्रकार पाहण्यास मिळत असल्याने मत विभाजनाचा आपुसक लाभ खासदार पाटील यांच्या पथ्यावर पडेल का अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : काँग्रेसविरोधात भाजपाचा खोटा प्रचार केवळ भीतीपोटी; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली असून जाहीर प्रचारास केवळ आठ दिवस उरले असताना सभांचे फड गाजू लागले आहेत. मात्र, जिल्ह्यातील मुख्य प्रश्‍नांचा फारसा उहापोहच या सभामधून होत असल्याचे दिसत नाही. सिंचन योजनांच्या सफलतेचा लाभ खासदार घेत असले तरी भाजपच्याच नेत्यांनी कडेगावच्या सभेत टेंभू योजनेचे श्रेय स्व.संपतराव देशमुखांचे असल्याचे सांगत केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिल्याने या योजनांना गती मिळाल्याचे सांगितले. कुणाच्या कोंबड्याने उजडेना, आता उजाडलं आहे तर पुढचे प्रश्‍न काय आहेत याची चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने अपेक्षित आहे. सांगलीचे ड्रायपोर्टचे घोंगडे अडले आहे, विमानतळाचा प्रश्‍न आहे. महामार्ग तयार झाले पण महामार्गालगतची गावे तुटली, संस्कृती विद्रुप होउ पाहत आहे. जिल्ह्याला सधन बनविणारी द्राक्ष शेती बदलत्या वातावरणात अंतिम घटका मोजत आहे. त्यावर संशोधन केंद्र उभारणे, सांगलीला महामार्गाची संलग्नता मिळवून देणे, शक्तीपीठाला असलेला विरोध आणि त्यांच्या समस्या याची चर्चा या सभामधून होत असल्याचे दिसत नाही. उलट मी कसा कसलेला पैलवान आहे, दोन पैलवानांना अंगावर घेउ शकतो, सहकार कोणी मोडीत काढला, इथंपासून ते यशवंत, तासगाव आणि सांगली साखर कारखान्याची सद्यस्थिती यावरच टीका होत आहे. सांगली म्हणजे हळदीचे शहर, पण हळद संशोधन केंद्र वसमतला मंजूर झाले. सांगलीत का होऊ शकत नाही, सिंचन योजनांचे पाणी शिवारात आले, पण हे उपसा सिंचन योजनेचे पाणी परवडत नाही, मग त्यावर उपाय काय?, उस शेती सर्वत्र वाढत असताना पारंपारिक पिकांची गळचेपी होत आहे. कृष्णा-वारणा नद्यांचे प्रदुषण वाढले असून यावर काय उपाय योजना हव्यात यावर मंथन होत असल्याचे दिसत नाही. यामुळे ही निवडणुक सामाजिक प्रश्‍नासाठी आहे की वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी आहे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.