ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम असताना या जागेवर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी भाजपच्या नेतृत्वालाच एकप्रकारे गुगली टाकल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ठाण्याची जागा भाजपला मिळावी आणि येथून नवी मुंबईतील पक्षाचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव यांना रिंगणात उतरविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याची चर्चा सध्या सुरु आहे. असे असताना नेतृत्वाने विचार केल्यास मी आनंदाने लोकसभा लढवेन असे वक्तव्य करत आमदार केळकर यांनी पक्षातील जुन्या निष्ठावंतांचा विचार उमेदवारीसाठी आधी करावा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला असून महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत यामुळे शिंदेसेनेची कोंडी झाल्याची सध्या चर्चा आहे. सर्वेक्षणाचा दाखला देत या मतदारसंघातून भाजपला अधिक संधी असल्याचा या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून संजीव नाईक यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याचे बोलले जाते. हा मतदारसंघ भाजपला सुटेल असे दावे या पक्षाच्या नेत्यांकडून केले जात असून संजीव नाईक यांनी मिरा-भाईदर तसेच ठाण्यातील काही भागात बैठकांचा सपाटा लावल्याने शिंदेसेनेत कमालिची अस्वस्थता आहे. नाईक यांनी नवी मुंबईतील त्यांच्या निकटवर्तीयांना हा मतदारसंघ आपल्याला सुटेल असा संदेश यापुर्वीच दिला असून तयारीला लागा अशा सूचनाही दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना ठाणे शहराचे पक्षाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा : इराणींनी अमेठीत बांधलं घर; उमेदवाराने मतदारसंघातील रहिवासी असणे आवश्यक आहे का?

भाजपमधील वाद काय आहे?

आमदार संजय केळकर यांचे नाव ठाण्यातून लोकसभेसाठी अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत होते. असे असले तरी स्वत: केळकर यांनी कधीही लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली नव्हती. भाजपकडून लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असताना आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकांमध्येही केळकर फारसे सक्रिय नसत. त्यामुळे केळकर विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजप त्यांच्यासाठी सहज सोडेल अशी सुरुवातीला शक्यता व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मात्र गेल्या महिनाभरात चित्र पुर्णपणे उलट दिसून आले. भाजपने या मतदारसंघासाठी आग्रह धरला असून येथून संजीव नाईक हेच उमेदवार असतील असे दावे केले जात आहेत. नाईकांच्या संभाव्य उमेदवारीमुळे भाजपमधील एका जुना गट अस्वस्थ असून जुन्या, निष्ठावंतांना विचार नेतृत्व करणार की नाही असा सवाल गेल्या काही दिवसांपासून पक्षात दबक्या सुरात उपस्थित केला जात आहे. स्वत: केळकर यांच्यावरही हा दबाव वाढू लागल्याने दोन दिवसांपुर्वी यासंबंधी जाहीर भूमीका मांडत आपणही इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर करुन टाकले. केळकर इच्छुक असताना नाईकांसाठी त्यांना डावलले असा संदेश आता जाण्याची शक्यता असल्याने नेतृत्वाची देखील पंचाईत झाल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे.

हेही वाचा : केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

शिंदेसेनेकडून स्वागत ?

ठाण्यावर दावा करत असताना भाजपकडून संजीव नाईक यांच्या नावाची सतत चर्चा असल्याने शिंदेसेनेत अस्वस्थता वाढू लागली होती. ठाण्यातून मुख्यमंत्र्यांच्या पक्षातून कोण लढणार याविषयी एकवाक्यता नसताना भाजपकडून मात्र नाईकांचे एकमेव नाव पुढे आणले जात होते. या पार्श्वभूमीवर केळकर यांच्या भूमीकेमुळे भाजपमध्येही सर्वकाही आलबेल नाही असे चित्र पुढे आल्याने शिंदेसेनेत केळकर यांच्या भूमीकेचे दबक्या सुरात स्वागतच केले जात आहे. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, प्रकाश परांजपे अशा खासदारांची परंपरा लाभलेल्या भाजपला केळकर नकोत आणि काल-परवा पक्षात आलेले नाईक हवेत हे जुन्या जाणत्या भाजप कार्यकर्त्यांना रुचेल का असा सवाल शिंदेसेनेतील एका मोठया नेत्याने लोकसत्ताशी बोलताना केला. दरम्यान, आमदारांची संख्या आणि पक्षाची वाढलेली ताकद लक्षात घेता ठाणे भाजपलाच मिळायला हवा, असे मत संजय केळकर यांनी व्यक्त केले आहे.