Loksabha Election 2024 माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणार्‍या दोन मारेकऱ्यांपैकी एक असणार्‍या बेअंत सिंग यांचा मुलगा सरबजीत सिंग खालसा फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. यावेळी ते अनुसूचित जाती-आरक्षित फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मते मिळविण्यासाठी त्यांनी २०१५ मध्ये बरगरी गावात घडलेल्या एका प्रकरणाला आपल्या प्रचारात केंद्रस्थानी ठेवले आहे. फरीदकोटमध्ये १ जून रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.

२०१५ मध्ये शीख समुदायाच्या धर्मग्रंथाची विटंबना

२०१५ मध्ये फरीदकोट जिल्ह्यातील बरगरी गावात रस्त्यांवर शीख समुदायाच्या पवित्र धर्मग्रंथाची विटंबना केल्याप्रकरणी निदर्शने करण्यात आली होती; ज्यात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला होता. मात्र, धर्मग्रंथाची विटंबना करणारे गुन्हेगार कधीच पकडले गेले नाहीत. “मी फरीदकोटमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. कारण- मला २०१५ च्या विटंबना प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करायचा होता. सुरुवातीला माझा निवडणूक लढविण्याचा कोणताही विचार नव्हता; पण शीख समुदायाने शिफारस केली,” असे सरबजीत यांनी सांगितले.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी मणिपूरला का गेले नाहीत? अमित शाहांनी सांगितले खरे कारण

सरबजीत यांच्याविरोधात ‘आप’चे उमेदवार अभिनेता व गायक करमजीत अनमोल आणि भाजपाचे उमेदवार गायक हंसराज हंस हे उभे आहेत. काँग्रेसने माजी सरकारी शाळेतील शिक्षिका अमरजीत कौर साहोके यांना उमेदवारी दिली आहे; तर शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) व्यापारी आणि तीन वेळा आमदार राहिलेल्या शीतल सिंग यांचा मुलगा राजविंदर सिंग यांना उमेदवारी दिली आहे. सध्या ही जागा काँग्रेसचे मोहम्मद सादिक यांच्याकडे आहे. ते एक अभिनेता व गायक आहेत.

सरबजीत सांगतात, फरीदकोट मतदारसंघातील ६५० हून अधिक गावांपैकी त्यांनी जवळपास ३५० गावांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी दावा केला आहे की, गावकरी स्वत: त्यांच्यासाठी सार्वजनिक सभा आयोजित करीत आहेत. “लोक मला आमंत्रित करीत आहेत आणि स्वतःहून पाठिंबा देत आहेत. ते आता पारंपरिक पक्षांना कंटाळले आहेत,” असे सरबजीत म्हणाले.

प्रचारसभेने वेधले लक्ष

२३ मे रोजी फरीदकोट आणि कोटकपुरा भागात सरबजीत यांच्या प्रचारसभेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. खंडणीच्या प्रकरणात जामिनावर बाहेर असणारे यूट्यूबर भाना सिद्धू आणि मानसा येथील सामाजिक कार्यकर्ते परविंदर सिंग झोटा हे सरबजीत यांच्या मोहिमेला पाठिंबा देणारे प्रमुख स्थानिक आहेत. शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, फरीदकोट आणि मोगा येथे सरबजीत यांना मिळालेला पाठिंबा पाहता, सरबजीत अपक्ष असूनही शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे.

इंदिरा गांधींच्या दुसर्‍या मारेकर्‍याच्या कुटुंबाचा पाठिंबा

“मला माहीत आहे की, लोकप्रिय गायक व अभिनेते माझ्याविरोधात निवडणूक लढवीत आहेत. परंतु, लोक माझ्या कुटुंबाला व मला १९८४ पासून ओळखत आहेत आणि शीख समुदायात कलाकारांपेक्षा शहिदांचे स्थान खूप वरचे आहे. शेतकरी संघटनाही मला पाठिंबा देत आहेत,” असे सरबजीत म्हणाले. इंदिरा गांधींचे दुसरे मारेकरी सतवंत सिंग यांचे कुटुंबही त्यांच्यासाठी प्रचार करीत असल्याचे ते पुढे म्हणाले.

विरोधकांची भूमिका

आम आदमी पार्टी (आप) उमेदवार करमजीत अनमोल यांचे जवळचे सहकारी मनजीत सिंग सिद्धू म्हणतात की, सोशल मीडियावर समर्थनाची खोटी कथा पसरवली जात आहे. “आम्हाला मिळत असलेला पाठिंबा पाहण्यासाठी कोणीही गावोगावी भेट देऊ शकतात,” असे ते म्हणले. शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार राजविंदर सिंग यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे परमबन्स बंटी रोमाना म्हणतात, “अकाली दल मजबूत झाला, तर पंथ मजबूत होऊ शकतो हे त्यांना माहीत असल्याने लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत. कोणीही निवडणूक लढवू शकतो, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही.”

परंतु, शीख समुदायाच्या पवित्र ग्रंथाच्या विटंबनेचे प्रकरण घडले तेव्हा शिरोमणी अकाली दल सत्तेत होता हे लक्षात घेता, पक्षाने या मुद्द्यावर बचावात्मक भूमिका घेतली आहे. त्याचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी गेल्या डिसेंबरमध्ये त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांना अटक करू न शकल्यामुळे जाहीरपणे माफीही मागितली होती.

“ड्रग्समुळे पंजाबमधील युवकांचे जीवन उद्ध्वस्त”

सरबजीत म्हणाले की, फरीदकोटमध्ये अमली पदार्थांचे सेवन, बेरोजगारी व गरिबांसाठी शिक्षण सुविधा यासह इतरही समस्या आहेत; ज्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. “ड्रग्सची सहज उपलब्धता पंजाबमधील तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहे. तसेच शिक्षणाचा स्तर घसरला असल्यामुळे पंजाबी तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत,” असे ते म्हणाले.

हेही वाचा : भाजपाविरोधात पंजाबमधील शेतकर्‍यांचा रोष, तरीही दुप्पट मतांनी निवडून येण्याचा विश्वास; कारण काय?

१९८९ मध्ये सरबजीतची आई बिमल कौर खालसा व आजोबा सुचा सिंग खालसा यांनी शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे उमेदवार म्हणून रोपर व भटिंडा या मतदारसंघांतून लोकसभा निवडणूक जिंकली होती. २००४ मध्ये सरबजीत यांनी भटिंडा लोकसभा मतदारसंघातून शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती; मात्र त्यांचा पराभव झाला. २००७ मध्ये त्यांनी बर्नालाच्या भदौर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा शिरोमणी अकाली दल (अमृतसर) च्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि पराभूत झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बसपाचे उमेदवार म्हणून फतेहगढ साहिबमधून निवडणूक लढवली; पण त्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. “मी यापूर्वी कधीही कोणत्याही राजकीय पक्षाशी संपर्क साधला नाही. उलट त्यांनी माझ्याशी संपर्क साधला; पण यावेळी मी एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला,” असे सरबजीत यांनी सांगितले.