scorecardresearch

“जो भारताचं अन्न खातो, इथेच राहतो तो हिंदू मग मला लोक…” केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद यांचं वक्तव्य चर्चेत

केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी हिंदू शब्दाची व्याख्या सांगत एक प्रश्न विचारला आहे

Kerala Governor statement
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत

केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. शनिवारी त्यांनी तिरूवनंतपुरमच्या हिंदू कॉनक्लेव्ह मध्ये सहभाग घेतला. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी भारतातल्या हिंदूबाबत एक वक्तव्य केलं आहे ज्याची चर्चा होते आहे. मला या हिंदू कॉनक्लेवमध्ये बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचसोबत त्यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान?

“मला वाटत नाही की हिंदू हा एक धार्मिक शब्द आहे. माझ्या मते हिंदू हा भौगोलिक शब्द आहे. जो भारतात जन्माला आला, भारतातलं अन्न खातो, भारतातल्या नद्यांचं पाणी पितो तो स्वतःला हिंदू म्हणवू शकतो. तो त्याचा हक्क आहे. मलाही हेच म्हणायचं आहे की मला तुम्ही हिंदू का म्हणत नाही?” असं वक्तव्य आरिफ मोहम्मद यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी सर सय्यद अहमद खान यांचंही उदाहरण दिलं. ते म्हणाले की सय्यद अहमद खान हे एक समाजसुधारक होते आणि त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली.

बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरही भाष्य

राज्यपाल आरिफ मोहम्मद यांनी बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरही प्रश्न उपस्थित केला आहे. ब्रिटिश राज्यात कुठली डॉक्युमेंट्री का बनवली गेली नाही? कलाकारांचे हात कलम करण्यात आले तेव्हा का डॉक्युमेंट्री तयार केली गेली नाही? जे लोक हे भविष्य सांगत होते की भारत देश हा धर्माच्या वादात अडकून तुटून जाईल, या देशाची अधोगती होईल त्यांचं भविष्य फोल ठरलं आहे. त्यामुळे असे लोक मानसिकदृष्ट्या नैराश्याने ग्रासले आहेत कारण भारत देश खूप प्रगती करतो आहे. ब्रिटिशांच्या अत्याचारांविषयीही एक डॉक्युमेंट्री का तयार केली जात नाही? मला अशा लोकांविषयी खेद वाटतो की जे लोक न्यायव्यस्थेपेक्षा डॉक्युमेंट्रीवर जास्त विश्वास ठेवतात असंही आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटलं आहे.

भारताकडे आज घडीला G20 देशांचं अध्यक्षपद आहे. त्याचवेळी ही डॉक्युमेंट्री का बाहेर काढली गेली? त्यावरून वाद का निर्माण केला गेला? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार होतं त्यावेळी काही लोक हे म्हणत होते की भारत अद्याप स्वातंत्र्यासाठी तयार नाही. अशाच मानसिकतेच्या लोकांनी ही डॉक्युमेंट्री पुढे आणली आहे असाही आरोप आरिफ मोहम्मद खान यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 21:20 IST
ताज्या बातम्या