मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत सत्ताधारी एनडीएबरोबर जाणे पसंत केल्याने बिहारमधील राजकीय गणिते बदलली आहेत. तिथे लोकसभा निवडणुकीमध्ये एक वेगळीच रंगत पाहायला मिळते आहे. मात्र, तरीही या सगळ्यामध्ये बिहारमधील एका मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. ती म्हणजे सीमांचल प्रदेशातील पूर्णिया जागेवर होणारी लढत होय. शुक्रवारी (२६ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यामध्ये या जागेचेही मतदान पार पडणार आहे. या ठिकाणी जेडीयू, राजद अथवा भाजपाची चर्चा नसून, एका अपक्ष उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू आहे. हा अपक्ष उमेदवार म्हणजे याच जागेवरून तीन वेळा खासदार राहिलेले राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव होय.

अपक्ष उमेदवार पप्पू यादव यांचे आव्हान

पप्पू यादव बिहारच्या राजकारणातील सुप्रसिद्ध नाव आहे. ते एकूण पाच वेळा खासदार राहिले आहेत. त्यापैकी तीन वेळा त्यांनी पूर्णिया मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मागील दोन निवडणुकांपासून हा मतदारसंघ जेडीयूच्या ताब्यात राहिला आहे. राष्ट्रीय जनता दलाने या जागेवरील विजयासाठी कंबर कसलेली असतानाच त्यांच्यासमोर पप्पू यादव यांच्या रूपाने आता एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा : मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ऐन निवडणुकीत शुकशुकाट; मनोज जरांगे दौऱ्यावर

या मतदारसंघातून तिकीट मिळावे यासाठी पप्पू यादव यांनी गेल्या महिन्यामध्येच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, काँग्रेसबरोबरच्या महाआघाडीमध्ये असलेल्या राजदने ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळेच पप्पू यादव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी केली. त्यामुळे पूर्णियात तिहेरी मुकाबला रंगणार आहे. मुस्लीम आणि यादव समाज हा राष्ट्रीय जनता दलाचा पारंपरिक मतदार मानला जातो; तर दुसरीकडे यादवेत्तर ओबीसी आणि अत्यंत मागास या दोन वर्गांतील व्यक्ती या जेडीयूच्या मतदार मानल्या जातात. पप्पू यादव हे पूर्णियामधील लोकप्रिय नेते असल्याने ते मुस्लीम आणि यादव यांची मते मिळवून राजदला अधिक धोका निर्माण करण्याची शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये मुस्लीम आणि यादव यांची एकत्र मिळून सहा लाख मते आहेत. थोडक्यात, त्यांचे प्राबल्य अधिक आहे. अशा परिस्थितीत या मतदारांकडून पप्पू यादव यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राजदचे नेते व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केलेले एक वक्तव्य पप्पू यादव यांच्याकडून राजदला असलेला धोका अधिक अधोरेखित करणारे आहे. ते म्हणाले, “जर तुम्हाला बिमा भारती यांना पाठिंबा द्यायचा नसेल, तर जेडीयूला ही जागा जिंकू द्या.”

हत्येचा आरोप

पप्पू यांनी ९० च्या दशकाच्या सुरुवातीला आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. १९९१ साली झालेल्या निवडणुकीमध्ये ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक जिंकले. मात्र, मतमोजणीत हेराफेरीच्या आरोपामुळे ती निवडणूक रद्द ठरविण्यात आली. त्यानंतर पुन्हा झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा जिंकले. १९९६ मध्ये त्यांनी याच जागेवरून समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली आणि ते पुन्हा जिंकले. त्यानंतर पप्पू यादव यांचे एका हत्या प्रकरणात नाव आले. १९९८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार अजित सरकार यांच्या हत्या प्रकरणातील ते प्रमुख आरोपी होते. हा खटला पुढील १५ वर्षे चालू राहिला. सरतेशेवटी २०१३ मध्ये पाटणा उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

“पप्पू यादव हे संपूर्ण बिहारमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांचा जनसंपर्क, त्यांनी केलेली समाजसेवा आणि त्यांनी विशेषत: गरीब लोकांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत केल्यामुळे ते या निवडणुकीत फार चर्चेत आहेत”, असे पूर्णियामधील राकेश कुमार यांनी म्हटलेय.

पप्पू यादव यांच्या उमेदवारीचा जेडीयूला फायदा?

“पप्पू यादव यांच्या उमेदवारीमुळे जेडीयूलाच फायदा होणार आहे. राजदची अनेक मते पप्पू यादव यांच्याकडे जातील. मात्र, त्यांना जर इतरही समाजांकडून प्रतिसाद मिळाला, तर या निवडणुकीचा निकाल वेगळाही असू शकेल. मुस्लीम व यादव यांच्याव्यतिरिक्त इतर समाजांकडून मिळणाऱ्या मतांवर पप्पू यादव यांचा विजय अवलंबून असेल. जर त्यांना उच्च आणि अनुसूचित जातींची मते मिळाली, तर ते जेडीयूच्या कुशवाह यांचाही पराभव करू शकतात”, असे मत स्थानिक रहिवाशी रघुवर सदा यांनी मांडले आहे. ते अनुसूचित समाजाचे आहेत. “मी पूर्णियाच्या मातीत जन्माला आलो आहे. ज्यांनी मला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला; त्यांनी इथे येऊन या सभेला जमलेली गर्दी पहावी”, असे आव्हान एका प्रचारसभेत बोलताना पप्पू यादव यांनी दिले आहे.

२०१९ मध्ये जेडीयूला ५४.८५ टक्के, तर २०१४ मध्ये ४१.१५ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे जेडीयूने दिलेले आव्हान तगडे आहे. राजपूत-ब्राह्मण या उच्च जातीच्या मतांबरोबरच जेडीयूला बनिया, दलित व यादव नसलेल्या ओबीसींची मतेही मिळण्याची शक्यता आहे. कारण- हा भाजपाप्रणीत एनडीएचा पारंपरिक मतदार आहे. या मतांना आपल्या बाजूने वळविण्यात पप्पू यादव यशस्वी होतील का, हा प्रश्न निर्णायक ठरू शकतो.

हेही वाचा : निवडणूक रणसंग्रामात ‘राम नाम’ नाही, तर ‘या’ नावांची घोषणा; छोट्या पडद्यावरील रामाचा विजय होणार का?

दुसरीकडे राजदच्या बिमा भारती या रूपौलीमधून आमदार आहेत. त्या गंगोटा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. लालू प्रसाद यादव यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर ही निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. सोमवारी (२२ एप्रिल) झालेल्या एका प्रचारसभेत त्या म्हणाल्या, “आमचा मतदार धर्मनिरपेक्ष भारताच्या संकल्पनेवर विश्वास ठेवणारा आहे. काही अफवा पसरवणारे लोक कार्यरत असले तरीही आमचाच विजय निश्चित आहे.” या निवडणुकीमध्ये त्यांच्यासमोर पप्पू यादव यांचेच मोठे आव्हान असणार आहे.